घरमुंबईचार ते सहा आठवड्यात तिसरी लाट?

चार ते सहा आठवड्यात तिसरी लाट?

Subscribe

राज्य सरकारने वर्तवली शक्यता, संपूर्ण राज्यात तिसर्‍या स्तराचे निर्बंध, डेल्टा प्लसच्या धोक्यामुळे नियमावलीत बदल

कोरोनाच्या डेल्टा, डेल्टा प्लस विषाणूचा वेगाने होत असलेला प्रसार आणि कोरोना रुग्णाच्या संख्येत होत असलेली वाढ लक्षात घेता येत्या चार ते सहा आठवड्यात राज्यात अधिक घातक रूपात कोरोनाची तिसरी लाट पसरण्याची दाट शक्यता राज्य सरकारने वर्तवली आहे. तिसर्‍या लाटेचा धोका लक्षात घेऊन राज्य सरकारने शुक्रवारी पंचस्तरीय पद्धतीत बदल केला असून राज्यातील सर्व जिल्ह्यांना तिसर्‍या स्तराचे निर्बंध लागू केले आहेत.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत होत असलेली वाढ आणि काही जिल्ह्यात डेल्टा, डेल्टा प्लसचे आढळून आलेले रुग्ण यामुळे राज्य सरकारने आज नवी नियमावली लागू केली आहे. मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी यासंदर्भात शुक्रवारी आदेश जारी केला.

- Advertisement -

याआधी राज्यातील विविध जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्यासाठी पाच टप्पे जाहीर करण्यात आले होते. मात्र, आता राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार सर्व जिल्ह्यांना तिसर्‍या स्तरातील निर्बंध लागू असतील. याशिवाय जिल्हाधिकार्‍यांना वेळोवेळी राज्य सरकारकडून देण्यात आलेले आदेश आणि कोरोना रुग्णांची संख्या पाहून निर्णय घ्यावा लागणार आहे.

मुख्य सचिवांच्या आदेशानुसार निर्बंधांमध्ये मोठ्या प्रमाणात शिथिलता देणारा पहिला स्तर आणि दुसरा स्तर पुढील आदेशापर्यंत रद्द करण्यात आला आहे. राज्यात आता तिसरा स्तर किंवा त्यापुढील स्तरातील निर्बंध कायम राहणार आहेत. त्यासोबतच जिल्हा आणि महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाला विशेष अधिकार बहाल करण्यात आले आहेत. कोरोना स्थिती नियंत्रणात राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्याअंतर्गत आपत्ती व्यवस्थापनाला आठ महत्वाच्या सूचना करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

जिल्हाधिकार्‍यांना आरटीपीसीआरद्वारे होणार्‍या चाचण्यांच्या आधारे आठवड्याचा पॉझिटीव्हीटी रेट लक्षात घ्यावा लागणार आहे. जिल्हाधिकार्‍यांना तिसर्‍या स्तरापेक्षा कमी म्हणजेच पहिल्या आणि दुसर्‍या स्तराचे निर्बंध लागू करायचे असतील तर त्यांना मागील दोन आठवड्यातील कोरोना रुग्णसंख्येचा अभ्यास करावा लागेल. जर कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असल्याचे दिसत असेल तर वरील स्तरातील निर्बंध लागू करावे लागतील, असे आदेशात नमूद केले आहे.

जिल्ह्यात किंवा महापालिका क्षेत्रामध्ये निर्बंध शिथिल केल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी काही उपाययोजनांवर लक्ष केंद्रीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार पात्र नागरिकांपैकी ७० टक्के लसीकरण पूर्ण करण्यावर भर द्यावा. यासाठी जनजागृतीच्या माध्यमातून प्रयत्न करावा. कामाच्या ठिकाणीच लसीकरणासाठी प्रोत्साहन द्यावे . टेस्ट, ट्रॅक आणि ट्रीट या पद्धतीचा अवलंब करावा. हवेमधून पसरू शकणार्‍या कोरोनाच्या प्रकारांना टाळण्यासाठी आस्थापनांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित आणि हवेशीर वातावरण ठेवण्याची सक्ती करावी. मोठ्या प्रमाणावर आरटीपीसीआर चाचण्या करणे, कोरोनाचे नियम न पाळणार्‍यांवर प्रभावीपणे दंड आकारणे, गर्दी करणारे किंवा होऊ शकणारे कोणतेही कार्यक्रम किंवा घटना टाळणे, कंटेनमेंट झोन तयार करताना काळजीपूर्वक आढावा घेणे, जेणेकरून ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव आहे अशाच ठिकाणी निर्बंध लावता येतील, असे आदेशात म्हटले आहे.

आता तिसर्‍या स्तराचे निर्बंध
नव्या नियमानुसार ४ जूनच्या आदेशातील तिसर्‍या टप्प्याचे निर्बंध लागू करावे लागणार आहेत. त्यानुसार अत्यावश्यक दुकाने सकाळी ७ ते २ आणि इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी ७ ते २ यावेळेत खुली राहतील. मॉल्स आणि थिएटर्स सर्व बंद राहतील. सोमवार ते शुक्रवार हॉटेल्स ५० टक्के याप्रमाणे दुपारी २ पर्यंत खुली राहतील, त्यानंतर पार्सल व्यवस्था असेल. ही सुविधा शनिवार रविवार बंद राहील. सर्वसामान्य प्रवाशांना लोकल आणि रेल्वे बंद राहतील. मॉर्निंग वॉक, मैदाने, सायकलिंग पहाटे ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत मुभा असेल. ५० टक्के क्षमतेने खासगी आणि सरकारी कार्यालये सुरू असतील. स्टुडिओत सोमवार ते शनिवार पर्यंत चित्रीकरण करण्यास परवानगी राहील. लग्नसोहळे ५० टक्के क्षमतेने तर अंत्यविधीला २० लोकांना उपस्थित राहण्याची मुभा असेल. बांधकाम दुपारी दोन पर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. शेतीविषयक सर्व कामे करता येतील. ई कॉमर्स दुपारी २ पर्यंत सुरू असेल. जमावबंदी आणि संचारबंदी कायम राहील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -