घरमुंबईघाटकोपरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांना विषबाधा, दोघांचा मृत्यू

घाटकोपरमध्ये एकाच कुटुंबातील चौघांना विषबाधा, दोघांचा मृत्यू

Subscribe

घाटकोपरमध्ये एकाच कुटुंबातल्या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादाक घटना मंगळवारी सकाळी घडली. ही दोन्ही लहान मुलं असून त्यांचा मृत्यू विषबाधेमुळे झाला असावा असा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याशिवाय याच कुटुंबातल्या अजून दोन मुलांवर सध्या राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

घाटकोपरच्या कामराज नगर विभागातील एकाच कुटुंबातील चार मुलांना तडकाफडकी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेतील दोन चिमुरड्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या चौघांना विषबाधा झाल्याचं बोललं जात आहे. मंगळवारी पहाटे ही घटना घडली. नंदन इंदर यादव ही साडे तीन वर्षांची मुलगी, तर किशोर यादव या साडेचार वर्षाच्या मुलाचा यात मृत्यू झाला आहे. तसेच १२ वर्षीय रोहीत आणि ८ वर्षीय कृष्ण या दोन मुलांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मंगळवारी पहाटे 3 वाजेच्या दरम्यान पहिल्यांदा नंदनला रुग्णालयात आणले होते. तेव्हा तिला डॉक्टर यांनी दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. तर, सकाळी ८ वाजता किशोरला राजावाडीत दाखल केले. त्यावेळी त्याच्यावर उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या दोन चिमुकल्यांचा मृत्यू अन्नामधून विषबाधा झाल्यामुळेच झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तर, आणखी दोघांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

अस्वस्थ वाटू लागल्याने प्रकरण उघडकीस

कामराज नगरचे रहिवासी असलेल्या यादव कुटुंबियांनी सकाळी चहा-पाव खाल्ल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर काही वेळातच कुटुंबातील सदस्यांना अस्वस्थ वाटू लागलं. धक्कादायक बाब म्हणजे यातल्या नंदन यादव ही मुलगी तर, किशोर यादव या मुलाला रुग्णालयाच्या वाटेवरच आपला जीव गमवावा लागला आहे. दोघांच्या मृत्यूप्रकरणी पंत नगर पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर रोहीत आणि कृष्णा यादव यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. नंदन या मुलीला थंडी वाजून ताप येत होता. तर, किशोरला आकडी, मिरगीचा त्रास होत होता.

यादव कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. त्यामुळे, सोमवारी दिवसभरात घरातील सर्व सदस्यांनी जेवणाच्या वेळेस चहा आणि पाव खाल्ला असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे हा भूकबळीचा प्रकार तर नाही ना? तसेच दोघे आजारी असल्याचे सांगत शवविच्छेदन झाल्यावरच मृत्यूचे कारण निश्चित करता येईल.

रोहिणी काळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पंत नगर

- Advertisement -

याविषयी राजावाडी रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. विद्या ठाकूर यांनी सांगितलं की, “यादव या एकाच कुटुंबातील चार जणांना रुग्णालयात आणलं गेलं होतं. पण, त्यातील दोघांचा रुग्णालयात आणत असतानाच मृत्यू झाला होता. तर, त्यापैकी दोघांची प्रकृती स्थिर आहे. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. त्यांचा मृत्यू विषबाधेतून झाला की अन्य काही कारण आहे, हे त्यांच्या पोस्टमार्टम रिपोर्टवरुन स्पष्ट होणार आहे.”


हेही वाचा – भांडुप विषबाधा प्रकरण; पाण्यातील ‘ई कोलाय’मुळे विषबाधा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -