घरमुंबईमतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदार जनजागृती अभियान

मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी मतदार जनजागृती अभियान

Subscribe

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात यंदा मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी मतदार जनजागृती अभियान राबविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघात यंदा मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी मतदार जनजागृती अभियान राबविण्याचे नियोजन करण्यात आले असून मुंबई उपनगर जिल्ह्यातील विविध सहकारी गृहनिर्माण सहकारी संस्था, अंगणवाडी सेविका, कम्युनिटी हेल्थ व्हॉलंटिअर, शाळा-महाविद्यालये, महानगरपालिकेचे वॉर्ड अधिकारी यांची यासाठी मदत घेतली जाणार आहे. २९ एप्रिल, २०१९ रोजी होणाऱ्या मतदानाच्या दिवशी अधिकाधिक मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा सचिन कुर्वे यांनी केले आहे.

मतदारसंघात सरासरी ५१ टक्के मतदान

सिस्टिमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्टोरल पार्टिसिपेशन अर्थात स्वीपच्या झालेल्या बैठकीत कुर्वे बोलत होते. प्रत्येक पात्र नागरिकाचे मतदार यादीत नाव नोंदणी करणे व प्रत्येक नोंदणीकृत मतदाराला मतदान केंद्रापर्यंत मतदान करण्यासाठी प्रवृत्त करणे हे स्वीपचे प्रमुख उद्धिष्ट आहे. मुंबई उपनगर जिल्ह्यातील ४ लोकसभा मतदारसंघात यंदा सुमारे ७० लाख मतदार आहेत. २०१४ च्या निवडणुकीत मुंबई उपनगरातील चारही मतदारसंघात सरासरी ५१ टक्के मतदान झाले होते.

- Advertisement -

विविध संस्थांची मदत घेणार 

यावेळी २९ एप्रिल, २०१९ रोजी होणाऱ्या मतदानाच्या टक्केवारीत वाढ होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून अधिकाधिक मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावणे गरजेचे आहे. या दृष्टीने मतदार जनजागृतीसाठी अभियान राबविण्यात येत आहे. मुंबई उपनगरातील सुमारे २० हजार विविध सहकारी गृहनिर्माण सहकारी संस्थांचे अध्यक्ष, सचिव यांच्याबरोबर बैठक घेऊन या सहकारी गृहनिर्माण सहकारी संस्थांच्या मोकळ्या पॅसेजमध्ये, लिफ्ट जवळ मतदान करण्यासंदर्भातील आवाहन करणारे संदेश, भित्तिपत्रके लावण्याचे निर्देश कुर्वे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. तसेच मुंबई उपनगरातील आरोग्य सेविका, ४ हजार अंगणवाडी सेविका, शाळा-महाविद्यालयांमध्ये कार्यरत पालक-शिक्षक समिती, महिला बचत गट, रोटरी-लायन्स क्लब यांची मदत घेतली जाणार आहे. तसेच बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या १५ वॉर्ड अधिकाऱ्यांना या कामासाठी नोडल अधिकारी म्हणून जबाबदारी देण्यात येणार आहे. या सर्व ठिकाणी मतदारांना आवाहनासाठी संकल्पपत्र तयार करण्यात आले असून मतदारांकडून ते भरून घेतले जाणार आहेत.

जनजागृतीसाठी चित्ररथ

महापालिकेच्या १५ वार्डांमध्ये मतदानाबाबत जनजागृतीसाठी चित्ररथ तयार करण्यात येत असून या चित्ररथाबरोबर पथनाट्यही सादर केले जाणार आहे. लोकल रेल्वेच्या डब्यात मतदारांना श्राव्य (audio) संदेशाद्वारे मतदान करण्यासंदर्भातील आवाहन केले जाणार आहे. तसेच १०० ठिकाणी होंर्डिंग्स लावण्यात येणार आहे. कुठलाही मतदार मतदानापासून वंचित राहू नये याबाबत काळजी घेण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी, मुंबई उपनगर जिल्हा यांनी सांगितले.

  • मुंबई उपनगरात मतदार – सुमारे ७० लाख
  • मुंबई उपनगरात सहकारी गृहनिर्माण संस्था – २०,०००
  • अंगणवाडी सेविका – ४,०००
  • वॉर्ड अधिकारी – १५
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -