अंधेरीत कोसळली भिंत; जीवितहानी नाही

अंधेरीत भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.

Wall collapse in andheri
अंधेरीत कोसळली भिंत

मुसळधार पावसामुळे शनिवारी मालाडमधील बोर्गेस हाऊसची संरक्षक भिंत कोसळल्याची घटना ताजी असतानाच आज पुन्हा एकदा अंधेरीत भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. अंधेरीतील पेपर बॉक्स परिसरात भिंत कोसळल्याची घटना आज सकाळी घडली असून या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, ही भिंत गाड्यांवर कोसळल्याने गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या घटनास्थळी अग्निशमन दल आणि पोलीस दाखल झाले असून बचावकार्य सुरु आहे.

या ठिकाणी कोसळली भिंत

मालपा डोंगरी अंधेरी पूर्व येथील पेपर बॉक्स इंडस्ट्रीयल विभागातील भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून सध्या मदत कार्य सुरु आहे. या ठिकाणी पडलेला ढिगारा उचलवण्याचे काम सुरु असल्याची माहिती समोर आली आहे. या ठिकाणी बघणाऱ्यांची गर्दी खूप असल्याने आणि रस्ता अरुंद असल्याने मदत कार्यात अडथळे येत आहे.

याआधी देखील मुसळधार पावसामुळे मालाडमधील बोर्गेस हाऊसची संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली होती. तर पावसामुळे सोमवारी रात्री मालाडमध्ये संरक्षण भिंत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली होती. या दुर्घटनेत २७ जणांचा हकनाक बळी गेला होता. त्याचबरोबर पुण्याच्या कोंडवा परिसरातही इमारतीची संरक्षण भिंत कोसळून १५ जणांचा बळी गेला होता. तर सोमवारी मध्यरात्री कल्याणच्या नॅशनल उर्दू शाळेची संरक्षण भिंत कोसळल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेतही ३ जणांचा मृत्यू झाला होता.


हेही वाचा – मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे ९ जुलैला राहणार बंद

हेही वाचा – मुंबईत पावसाची जोरदार हजेरी ४ वाजता हायटाईड