घरपालघरग्रामीण भागात सतत चार दिवसांपासून विजेचा खेळ खंडोबा

ग्रामीण भागात सतत चार दिवसांपासून विजेचा खेळ खंडोबा

Subscribe

तसेच याकडे प्रशासन आणि महावितरण विभाग जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

डहाणू : डहाणू तालुक्यातील कासा शहरापासून लगत असलेल्या धरमपूर , बापूगाव , शेनसरी , भोवाडी , निंबापूर , बांधघर , सायवन , चळणी , सुखटआंबा , ते थेट महाराष्ट्राचे शेवटचे टोक गडचिंचले गावापर्यंत विजेचा खेळखंडोबा सुरू असून वीजपुरवठा सतत खंडीत होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. गेल्या चार ते पाच दिवसांपासून रात्री , दिवस अवेळी वीज सतत खंडित होत आहे. वीज बिलाच्या वसुलीसाठी वीजपुरवठा तोडण्याचा इशारा देणार्‍या महावितरण मंडळाची सुरळीतपणे वीजपुरवठा करण्याची जबाबदारी नाही का, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित करण्यात आला आहे. पावसाळ्याअभावी आधीपासूनच मार्च महिन्याच्या उत्तरार्धापासून ग्रामीण भागात विजेचा लपंडाव सुरु झाला आहे. कधी तांत्रिक बिघाड तर कधी देखभालीच्या नावाखाली दिवसभरात अनेक तास वीजपुरवठा खंडित करण्यात येत आहे.

रात्रीच्या वेळेतही वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ग्रामीण भाग अंधारात बुडून जात आहे. ग्रामीण भागातील लघुउद्योजक, विजेवर चालणारे फेब्रिकेशन, पीठगिरणी अशा प्रकारचे व्यवसाय करून आपली उपजीविका करत असतात. या प्रकारांमुळे ग्रामीण भागातील लघुउद्योजकांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर संबंधित आस्थापनेस संपर्क साधला असता महावितरणाचे प्रशासन त्यास प्रतिसाद देत नाही. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याची कारणे, पूर्ववत होण्याचा कालावधी आदी माहिती वीजग्राहकांना मिळत नाहीत,अशी नागरिकांची तक्रार आहे. याच भागात आश्रम शाळा , एकलव्य इंग्लिश स्कूल, कॉलेजेस , बँक , आरोग्य रुग्णालये असून यामुळे सर्वांचे काम ठप्प होत आहेत. या भागातील वीज भार हा एका ट्रान्सफॉर्मरवर चालत असतो. त्यामुळे रात्रीच्या वेळी घरातील पंखे , इतर विजेरी उपकरणे चालत असल्या कारणाने ट्रान्सफॉर्मरवर अति भार येतो. त्याने वीज पुरवठा सारखा खंडित होत असतो असे डहाणू आणि कासा येथील वीज महावितरणच्या अधिकार्‍यांच्याकडून सांगण्यात येत आहे. मात्र विजेचा अति भार हा या ग्रामीण भागातच कसा वाढतो , जवळच असलेल्या कासा , चारोटी या शहरात का अति भार होत नाही? असा प्रश्न देखील नागरिक उपस्थित करत आहेत. तसेच याकडे प्रशासन आणि महावितरण विभाग जाणूनबुजून दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.

- Advertisement -

“गेल्या चार दिवसांपासून आमच्या भागात रात्री , दिवस अवेळी सतत वीज पुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतकरी , शाळा , रुग्णालये व इतर सरकारी कार्यालये यांच्या कामकाजात खंड पडत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. यावर तात्काळ उपाय योजना करावी व या समस्यांचे निवारण करावे ही आमची प्रशासन व महावितरण विभागाला विनंती आहे.”
– रमेश बोरसा , सरपंच, निंबापूर ,बांधघर

“ग्रामीण भागातील वीज खंडित होणे यावर लवकरच उपाय योजना केली जाईल . लवकरच वीज नियमित पुरवण्याचे प्रयत्न करू.”
– गणेश दंडगव्हाळ , डहाणू महावितरण अधिकारी.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -