घरपालघरतारापूर स्फोटप्रकरणी खासदार गावीतांकडून अधिकार्‍यांची कानउघाडणी

तारापूर स्फोटप्रकरणी खासदार गावीतांकडून अधिकार्‍यांची कानउघाडणी

Subscribe

जर यामध्ये काही तृटी आढळल्यास जबाबदार अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचा इशारा गावीत यांनी यावेळी दिला.

पालघर : तारापूर औद्योगिक वसाहतीत २६ ऑक्टबरला भगेरीया इंडस्ट्रीज या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात ३ कामगारांचा मृत्यू झाला होता. तर १२ कामगार गंभीर जखमी झाले आहेत. या स्फोटाप्रकरणी काल खासदार राजेंद्र गावीत यांनी टिमा सभागृह येथे घेतलेल्या बैठकीत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचलनालय या विभागाच्या अधिकार्‍यांची चांगलीच कानउघाडणी केली. या बैठकीत खासदार गावीत यांनी तारापूर औद्योगिक वसाहतीत वारंवार होणारे अपघात आणि त्यामुळे निष्पाप कामगारांचे जाणारे बळी व जखमी होणारे कामगार यांवर संबंधित अधिकार्‍यांना चांगलेच फैलावर घेतले. यापुढे कारखान्यांना परवानगी देताना औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचलनालय,महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या जबाबदार तिन्ही विभागांनी समन्वय साधून परवानगी द्यावी.जर यामध्ये काही तृटी आढळल्यास जबाबदार अधिकार्‍यांवर कारवाई करण्याचा इशारा गावीत यांनी यावेळी दिला.

अप्रशिक्षित कामगारांकडून धोकादायक काम करवून घेणे,जुनाट यंत्रसामुग्रीचा वापर,परवानगी नसलेल्या मालाचे उत्पादन, अग्निसुरक्षा कार्यान्वित नसणे, निश्चित केलेल्या सुरक्षा मानकांचे पालन न करणे या सारख्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणार्‍या कारखान्यांची तपासणी करून दोषी व्यवस्थापनावर कठोर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त कारखान्यांना अचानक भेटी देऊन सुरक्षेसंदर्भात पाहणी करावी, कारखान्याच्या मार्जिन स्पेस जागेत केलेल्या अनधिकृत बांधकामांवर तातडीने कारवाई करण्याचे निर्देश देखील बैठकीत देण्यात आले. या बैठकीला टिमाचे अध्यक्ष वेलजी गोगरी, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचलनालय पालघर विभागाचे सहसंचालक नरेश देवराज, उप संचालक हिम्मतराव शिंदे, म.औ.वि.म.तारापूरचे अधिकारी संखे, म.प्र.नि.मं.ठाणेचे प्रादेशिक अधिकारी रवी आंधळे,तारापूर उपप्रादेशिक अधिकारी प्रशांत गायकवाड,पालघरच्या पोलिस उपविभागीय अधिकारी नीता पाडवी,तहसीलदार सुनील शिंदे,बोईसरचे पोलीस निरीक्षक प्रदीप कसबे,तारापूर अग्निशमन दल अधिकारी आदी उपस्थित होते. यानंतर खासदार राजेंद्र गावीत यांनी भगेरीया इंडस्ट्रीज कारखान्यामधील अपघाताच्या ठिकाणी भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली व त्यानंतर जखमी कामगारांवर उपचार सुरू असलेल्या शिंदे हॉस्पीटल येथे जाऊन त्यांची विचारपूस केली. जखमी कामगारांपैकी ३ जणांना उपचारानंतर घरी सोडण्यात आले असून ९ कामगारांना चांगल्या उपचारासाठी वापी येथील रेनबो बर्न सेंटर या विशेष रुग्णालयात स्थानांतरीत करण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -