घरपालघरदापचरी दुग्ध प्रकल्पातील खैर तस्कर पुष्पा कोण ?

दापचरी दुग्ध प्रकल्पातील खैर तस्कर पुष्पा कोण ?

Subscribe

वनविभागाने कारवाई करत सदरचा साठा आपल्या ताब्यात घेतला असून, वृक्षतोड करून अवैध व्यवसाय करणार्‍या सराईतांचा शोध सुरू असल्याची माहिती वनविभाग अधिकार्‍याकडून मिळाली आहे.

डहाणू: दापचरी दुग्ध प्रकल्प क्षेत्रात अवैधरित्या खैर प्रजातीच्या वृक्षाची लाकडे साठवून ठेवल्याच्या गुप्त माहितीनुसार वनविभागाच्या अधिकार्‍यांनी चौकशी केली असता संशयित ठिकाणच्या परिसरात मोठा खैर साठा आढळून आला आहे. वनविभागाने कारवाई करत सदरचा साठा आपल्या ताब्यात घेतला असून, वृक्षतोड करून अवैध व्यवसाय करणार्‍या सराईतांचा शोध सुरू असल्याची माहिती वनविभाग अधिकार्‍याकडून मिळाली आहे.
शनिवार 1 ऑक्टोबर रोजी वनविभागाला मिळालेल्या गुप्त माहितीनुसार वनविभाग डहाणू अंतर्गत वनक्षेत्रपाल उधवा एस.के.ऐनवाड व वनक्षेत्रपाल कासा सुजय कोळी यांनी आपल्या तुकडी सोबत शोध मोहीम हाती घेतली असता, दुग्ध प्रकल्प दापचरीच्या क्षेत्रात पाटील पाडा येथील स्मशानभूमीच्या जवळ मोठा खैरसाठा आढळून आला आहे. अवैधरित्या लाकूड साठवून ठेवणार्‍या आरोपीचा शोध मात्र अजून सुरू आहे. शनिवारी संध्याकाळी सुरू केलेली शोध मोहीम रात्री 12 वाजता दरम्यान चालली असून, अथक परिश्रमानंतर खैरसाठा हाती आल्याचे वनविभाग कर्मचार्‍यांनी सांगितले आहे.
दुग्ध प्रकल्प दापचरी हे मुंबई -अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाला लागून असून, आढळून आलेला खैरसाठा हा मुख्य रस्त्यापासून जवळपास 1 ते 1.5 किलोमीटर आत निर्जनस्थळी साठवून ठेवण्यात आल्याची माहिती वनविभाग अधिकार्‍यांनी दिली आहे. येथे एकूण 235 नग खैराचे सोलिव ओंडके आढळून आले असून त्यांची किंमत 38 हजार रु. इतकी आहे.

सराईतांना कोणाचा आशीर्वाद ?

- Advertisement -

याआधी देखील दुग्ध प्रकल्प क्षेत्रात अनेक वेळा अवैध खैर तोडी आणि साठवणुकीच्या घटना समोर आल्या आहेत. मात्र, ह्यामध्ये नेमका आरोपी हाताला लागत नसल्यामुळे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. दापचरी दुग्ध प्रकल्पांतर्गत होणार्‍या वृक्ष तोड नेमकी कोणामार्फत सुरू असून ह्यासाठी सराईतांना कोणाचा आशीर्वाद लाभत असावा ह्याची चर्चा सध्या परिसरात सुरू आहे. ह्या परिसरात मोठ्या प्रमाणात खैर प्रजातीच्या लाकडाची तोड करून विक्री केली जाते. मात्र, आरोपी ताब्यात येत नसल्यामुळे पर्यावरणाच्या मुळावर नेमकी कोण घाव घालत आहे हा प्रश्न अनुत्तरितच आहे. तर ह्या परिसरात खैर तोडीच्या घटना कोणाला निदर्शनास आल्यास त्यांनी वनविभागाच्या कर्मचार्‍यांशी संपर्क करून त्यांना ह्याबाबत अवगत करावे असे आवाहन वनविभागाकडून केले जात आहे. अवैध वृक्षतोड करणार्‍या सराईतांविषयी वनविभागाला कळतच त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे एस.के. ऐनवाड यांनी सांगितले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -