घरराजकारणगुजरात निवडणूकGujarat Election 2022 : पहिल्या टप्प्यात मतदानामध्ये 4.4 टक्क्यांची घट

Gujarat Election 2022 : पहिल्या टप्प्यात मतदानामध्ये 4.4 टक्क्यांची घट

Subscribe

अहमदाबाद : गुजरात विधानसभा निवडणुकीचा पहिला टप्पा काल शांततेत पार पडला. दक्षिण गुजरात आणि कच्छ-सौराष्ट्र भागांतील पहिल्या टप्प्यात तब्बल 62.89 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. गतवेळच्या 67.23 टक्क्यांच्या तुलनेत यंदा 4.4 टक्के कमी मतदान झाले आहे. मात्र, मतदानाच्या आकडेवारीत बदल होण्याची शक्यता आहे. यासोबतच 19 जिल्ह्यांतील 89 जागांसाठी निवडणूक लढविणाऱ्या 788 उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएममध्ये सीलबंद झाले आहे.

काल पहिल्या टप्प्यात राजकोट, सुरेंद्रनगर, कच्छ, मोरबी, जामनगर, देवभूमी द्वारका, पोरबंदर, जुनागढ, गीर सोमनाथ, अमरेली, भावनगर, बोताड, नर्मदा, भरूच, सुरत, तापी, डांग्स, नवसारी आणि वलासड या जिल्ह्यांमध्ये मतदान झाले. त्यापैकी सौराष्ट्र-कच्छमध्ये 55 टक्के तर, दक्षिण गुजरातमध्ये 61 टक्के मतदान झाले. दक्षिण गुजरातच्या तुलनेत सौराष्ट्रात 6 टक्के कमी मतदान झाले आहे. येथील 12 जिल्ह्यांपैकी 69.77 टक्के मतदान फक्त मोरबीमध्ये झाले. याच मतदारसंघात पूल दुर्घटना घडली होती. उर्वरित जिल्ह्यांमध्ये गेल्या वेळेच्या तुलनेत फारच कमी मतदान झाले आहे. अशा प्रकारे पाटीदार भागात कमी मतदान झाल्याने उमेदवार संभ्रमात आहेत.

- Advertisement -

पहिल्या टप्प्यातील एकूण 89 जागांपैकी भाजपाकडे सर्वाधिक 58 जागा, काँग्रेसला 26 आणि बीटीपीकडे 2, सीएनपीकडे एक जागा आहे. मायावतींच्या नेतृत्वाखालील बहुजन समाज पक्षाने (BSP) 57, भारतीय ट्रायबल पार्टीने (BTP) 14, समाजवादी पार्टीने 12, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीने चार, भारतीय कम्युनिस्ट पार्टीने दोन उमेदवार रिंगणात उतरवले असून 339 अपक्ष उमेदवार आहेत. एकूण 788 उमेदवारांपैकी 718 पुरुष आणि 70 महिला आहेत. नशीब आजमावणाऱ्यांमध्ये पटेल मंत्रिमंडळातील 9 मंत्र्यांचा समावेश आहे. इतकेच नाही तर, तिकीट न मिळाल्याने अपक्ष म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेणाऱ्या भाजपाच्या 7 बंडखोर नेत्यांचे भवितव्यही ईव्हीएममध्ये सील झाले आहे.

सर्वात कमी आणि जास्त मतदान
निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, बोटाड जिल्ह्यात सर्वात कमी 57.58 टक्के आणि पोरबंदरमध्ये 59.51 टक्के मतदान झाले. तापी जिल्ह्यात सर्वाधिक 76.91 टक्के मतदान झाले. नर्मदा जिल्ह्यात 73.50 टक्के मतदान झाले.

- Advertisement -

प्रथमच मतदान
मिनी आफ्रिका म्हटल्या जाणाऱ्या गुजरातमधील जांबूर गावात पहिल्यांदाच मतदान झाले. त्याच्यासाठी येथे खास आदिवासी बूथ बनवण्यात आला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -