हा संपला तो संपला म्हणणारे स्वतःच संपले… निलेश राणेंची टीका

मुंबई : राज्यातील राजकीय रणधुमाळी आता निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत आणि त्याविरोधात शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. एकूणच शिवसेनेतील बंड लक्षात घेता राज्यातील आघाडी सरकार धोक्यात आले आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेश सचिव निलेश राणे यांनी शिवसेना आणि संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकावल्यानंतर जवळपास 50 आमदार त्यांच्या गटात जाऊन उभे राहिले. त्यांनी पुन्हा शिवसेनेत येण्याचे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. तर, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे व शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. ‘तुमची कसली शिवसेना, जिकडे ठाकरे तिकडे शिवसेना. सामान्य शिवसैनिकांच्या जोरावर ही शिवसेना नव्याने उभी राहील. शिवसेनेला संपवण्याचे अनेक प्रयत्न झाले, ते संपले पण शिवसेना दिमाखाने उभीच आहे, अशी टीका संजय राऊत यांनी अलिबागमध्ये केली. त्याचा समाचार घेताना निलेश ठाकरे म्हणाले, हा संपला तो संपला म्हणणारे स्वतःच संपले…