संभाजीनगरच्या नामकरणाचे निमित्त… उद्याची मंत्रिमंडळ बैठक शेवटची?

मुंबई : राज्यातील सत्तासंघर्ष शिगेला पोहोचला असताना ठाकरे सरकारने लोकप्रिय निर्णय घेण्याचा धडाका लावला आहे. आता शिवसेना नेते व परिवहनमंत्री अनिल परब यांनी मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत, औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्यासंदर्भातील प्रस्ताव उद्या, बुधवारी होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीत आणण्याची मागणी केली. हाच मुद्दा ठाकरे सरकारच्या राजीनाम्याचे निमित्त ठरेल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

शिवसेनेचे दिग्गज नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या आमदारांनी बंड केले असून त्यामुळे सरकार धोक्यात आले आहे. शिंदे गटाकडून हिंदुत्वाचा मुद्दा मांडला जात आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा मांडण्यात आल्याचे समजते. आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर असे करण्याच्या मुद्यावर चर्चा झाल्याची माहिती अनिल परब यांनी दिली.

औरंगाबाद जिल्हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये सेनेचेच वर्चस्व राहिले आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्यंतरीच्या काळात औरंगाबादच्या नामकरणच्या मागणीने पुन्हा जोर धरला होता. परंतु त्याला काँग्रेसने विरोध केल्याने एरवी या मागणीसाठी आग्रही असलेल्या शिवसेनेने हा मुद्दा थंड बस्त्यात गुंडाळून ठेवून दिला.

पण आज मंत्रिमंडळ बैठकीत अनिल परब यांनी या नामांतराची मागणी केली आहे आणि त्याला काँग्रेसचा विरोध अपेक्षित आहे. याच मुद्द्यावरून शिवसेना ताठर भूमिका घेईल आणि राजीनामा देईल, असा अंदाज सूत्रांनी वर्तविला आहे. त्यामुळे उद्याची मंत्रिमंडळ बैठक शेवटची ठरू शकते.