गावठी हातबॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू ; मुलासह महिला जखमी

घटनास्थळी २५ हातबॉम्ब सापडले

One killed in village grenade blast; Woman injured with child
गावठी हातबॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू ; मुलासह महिला जखमी

गावठी हातबॉम्बचा स्फोट होऊन एकाचा जागीच मृत्यू, तर १० वर्षीय मुलगा गंभीर आणि महिला किरकोळ जखमी झाली आहे. घटनास्थळी २५ हातबॉम्ब सापडले आहेत. निजामपूर विभागातील चन्नाट रस्त्यावर मशीदवाडी गावच्या हद्दीत माळरानात शेतावर धामणी नदीजवळ ही घटना मंगळवारी घडली असून, घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

संदेश चौहान (४५), पत्नी मजिनाबाई (४०), मुलगा सत्यम (१०, मूळ रा. मध्यप्रदेश) माळरानात उघड्यावर राहत होते. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास संदेश हातबॉम्ब हाताळत असताना अचानक स्फोट झाला. त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला. तर मुलगा सत्यम यास गंभीर दुखापत झाली. मजिनाबाई हिला किरकोळ दुखापत झाली आहे. जखमी झालेल्या मुलाला तात्काळ येथील उप जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी त्याच्यावर प्राथमिक औषधोपचार केल्यानंतर कळंबोलीच्या एमजीएम रुग्णालयात हलविण्यात आले आहे.

या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनीही उपजिल्हा रुग्णालयाला भेट दिली. तर अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उप विभागीय पोलिस अधिकारी प्रवीण पाटील आणि पोलीस निरीक्षक अश्वनाथ खेडकर यांनी त्वरित आपल्या सहकार्‍यांसमवेत घटनास्थळाला भेट दिली. घटनास्थळी काही अंतरावर एका झाडावर लपवुन ठेवलेले २५ गावठी हातबाँम्ब सापडले असून, मध्यप्रदेशातील हे लोक पारधी समाजाचे असल्याची माहिती झेंडे यांनी प्रसार माध्यमांना दिली.

सदर घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात येऊन आरोपींवर भादंवि कलम २८६, ३३७, ३३८ स्फोटक कायदा कलम ४, ५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सुरू आहे.


हे ही वाचा -संजय पांडेच राहणार पोलीस महासंचालक, राज्य सरकार वापरणार आंध्र प्रदेशचा फॉर्म्युला