घररायगडPen News : पेणमधील हेटवणे धरण्याच्या पाण्यामुळे बहरली उन्हाळी भातशेती

Pen News : पेणमधील हेटवणे धरण्याच्या पाण्यामुळे बहरली उन्हाळी भातशेती

Subscribe

पावसाळी शेती आता आतबट्ट्याचा व्यवसाय झाला आहे. कधी अवकाळी, कधी पूरस्थिती तर कधी दीर्घकाळ पावसाची दडी यामुळे पिकांचे नुकसान होते. त्या तुलनेत धरणाऱ्या पाण्यावरील उन्हाळी भातशेती शेतकऱ्यांची कमाई दुप्पट करते.

पेण : निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय आतबट्ट्याचा झालेला असताना शेतकर्‍यांचा आता उन्हाळी शेती करण्याकडे कल वाढला आहे. एवढेच नाही तर शेतकऱ्यांना यातून चांगल्यापैकी लाभही होत आहे. उन्हाळी भातशेतीचा प्रयोग पेण तालुक्यात हेटवणे धरणाच्या परिसरात केला जात असून, धरणाच्या पाण्यामुळे उन्हाळी भातशेती चांगलीच बहरत आहे. विशेष म्हणजे त्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्नही दुप्पट होऊ लागले आहे.

हेही वाचा… रो-रो शेतकर्‍यांसह फळ-मत्स्यविक्रेतांच्या फायद्याची

- Advertisement -

हेटवणे धरणाच्या कालव्यातून अनेक गावांना सिंचनासाठी पाणी सोडले जात आहे. या पाण्यावर पूर्व भागातील अनेक शेतकरी उन्हाळी भातशेतीबरोबर भाजीपाला, वेलवर्गीय पिकांची लागवड मोठ्या प्रमाणावर करत आहेत. ग्रामीण भागातील शेतकरी कालव्याच्या पाण्याचा फायदा घेत उन्हाळी भातशेती मोठ्या प्रमाणावर करत आहेत. कामार्ली, तळवली, आधारणे, सापोली, शेणे, बोरगाव, तसेच खारेपाट विभागामधील काही भागात शेतकरी उन्हाळी भातशेती करताना दिसतात. तालुक्यातील कृषी विभागाच्या अंतर्गत 6 हजार 668 हेक्टर क्षेत्रापैकी 1700 ते 1800 हेक्टरवर उन्हाळी भातशेतीची लागवड केली जात आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना हेटवणे धरणाचे पाणी दिलासा देणारे ठरत आहे.

हेही वाचा… जास्वदांचे फुल आहे आरोग्यासाठी फायदेशीर

- Advertisement -

पावसाळ्यातील शेती रामभरोसे झाली आहे. त्या तुलनेत उन्हाळ्यातील शेतीमध्ये जास्त फायदा होतो. पावसाळ्यामध्ये रोगराई, तसेच अतिवृष्टी, पूर यांचा शेतकर्‍यांना सामना करावा लागतो. कधी-कधी अवकाळी पावसामुळे कापणीला आलेले भात कुजून वाया जाते. काही वेळेला पाऊस गायब झाला तर उभे पिके करपतात. त्यामुळे धरणाच्या पाण्याचा वापर करत उन्हाळी भातशेती करण्याकडे शेतकर्‍यांचा कल वाढला आहे. सध्या शेकडो शेतकरी उन्हाळी भातशेतीच्या कामात गुंतले आहेत.

पूर्व भागातील हेटवणे सिंचन प्रकल्प निर्मिती झाल्यापासून तालुक्यातील शेतकर्‍यांना फायदा होत आहे. त्यामुळे सध्या भातशेतीमध्ये कणसे डोलत असल्याचे सुखद दृश्य पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी हरभरा, तूर, वाल आणि भाजीपाला यांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. त्यामुळे कालव्याचे पाणी शेतकर्‍यांनासाठी लाभदायक ठरत आहे.

उन्हाळी शेती फायदेशीर

पावसाळी भातशेतीपेक्षा उन्हाळी भातशेतीमध्ये चांगले पीक येते. म्हणून या भागातील अनेक शेतकरी उन्हाळी भातशेती बरोबर भाजीपाला लागवड करीत आहेत. कृषी विभागाच्या मार्गदर्शनाने काही बांधांवरील पिकेदेखील घेण्याचा प्रयत्न करत आहोत. -विनोद बामुगडे, प्रगतशील शेतकरी

कृषी विभागाचा सहकार्याचा हात

पावसाळ्यात होणारे नुकसान पाहता उन्हाळी भातशेती फायदेशीर ठरेल. त्यामुळे शेतकऱ्यांनी पाण्याच्या ठिकाणी भातशेतीसोबतच भाजीपाला, कडधान्य पिके घ्यावे. वेळोवेळी कृषी विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांना माहिती देत आहेत.

– सागर वाडकर, तालुका कृषी अधिकारी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -