घरक्रीडादुश्मन बने दोस्त !

दुश्मन बने दोस्त !

Subscribe

कधी-कधी दोन शत्रुंना तिसर्‍या शत्रूचा काटा काढायचा असेल, तर त्यांना एकत्र येण्याशिवाय पर्याय नसतो. ही गोष्ट आजवर अनेक चित्रपटांत आणि नाटकांत पाहायला मिळली आहे. किंबहूना वास्तविक जीवनातही याचा प्रत्यय येतोच. कट्टर प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांचेही काहीसे असेच झाले आहे. विश्वचषक स्पर्धेत भारत आणि वेस्ट इंडिजकडून पराभूत झाल्यानंतर प्रचंड टिकेला सामोरे जावे लागलेल्या पाकिस्तान संघाची बाद फेरीतील आशा धूसर झाली होती.

मात्र, आता सलग दोन दमदार विजयांमुळे, तसेच इंग्लंडच्या सलग दोन पराभवांमुळे पाकचा उपांत्य फेरीचा मार्ग पुन्हा दिसू लागला आहे. आता रविवारी होणारा भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामना पाकसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. यामुळेच की काय पाकिस्तानी क्रिकेटप्रेमी या सामन्यात भारताला पाठिंबा देतील, यात शंका नाही.

- Advertisement -

भारतीय चाहत्यांनीही असेच केले, बुधवारी झालेल्या पाकिस्तान-न्यूझीलंड सामन्यात! भारतीय चाहत्यांनी पाकला पाठिंबा केला. याचे कारणही मनोरंजकच. भारताची पुन्हा पाकशी गाठ व्हावी आणि दोन्ही देशांतील चाहत्यांना पुन्हा ‘काटे की टक्कर’ बघायला मिळावी, हा त्यामागील हेतू! अर्थात साहेबांच्या देशात होणार्‍या या स्पर्धेत आशिया खंडातील संघांनी बाद फेरी गाठावी, अशी अनेकांना आशा आहे.

सध्या भारत आणि पाकिस्तानी क्रिकेट चाहते आपल्या संघांबरोबरच आपापल्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांनाही पाठिंबा करताना दिसून येत आहेत. सोशल मीडियावरही याची जोरदार चर्चा आहे. शत्रूचा शत्रू हा आपला मित्र हे खरे असले, तरी तिसर्‍या एखाद्या शत्रूला पराभूत करण्यासाठी अन्य दोघा शत्रूंना एकत्र आल्याशिवाय पर्याय नसतो हेही तितकेच खरे. यंदाच्या विश्वचषकात ही गोष्ट पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवत आहे. पाकिस्तानच्या बाद फेरीच्या आशा पल्लवीत झाल्याने त्यांना आता भारताला सपोर्ट करण्यावाचून पर्याय नाही. भारतालाही पाकिस्तानसारखा कट्टर प्रतिस्पर्धी उपांत्य वा त्यापुढील सामन्यात येऊन भिडणार असेल, तर सोन्याहून पिवळेच.

- Advertisement -

यासाठीच दोन्ही देशांच्या पाठराख्यांकडून एकमेकांना पाठिंबा देण्याचे प्रकार दिसत आहेत. याचे मजेशीर फोटो, व्हिडियोही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून जगभरात चर्चेचा विषय ठरत आहेत. आशिया खंडातील भारत हा एकमेव संघ सध्या उपांत्य फेरीच्या शर्यतीत आहे. बांगलादेश आणि पाकिस्तानला काहीशा अपेक्षा आहेत, मात्र त्यांनाही भारताच्याच कामगिरीवर अवलंबून राहावे लागत आहे. यासाठीच चाहत्यांनाही आपापला देश अंतिम चारमध्ये असावा, ही आस लागून आहे. म्हणूनच भारताला पाकिस्तानी आणि पाकिस्तानला भारतीय सपोर्ट करत असल्याचे मजेशीर चित्र सध्या बघायला मिळत आहे.

रविवारच्या महामुकाबल्यावर पाकची वाटचाल अवलंबून
रविवारी होणार्‍या भारत-इंग्लंड यांच्यातील महामुकाबल्यावर पाकिस्तानची वाटचाल अवलंबून असल्याने आतापासूनच सोशल मीडियावर पाकिस्तानी समर्थक भारताला पाठिंबा देत असल्याचे दिसून येत आहे. याचे मजेशीर चित्र, व्हिडियो, संदेश सोशल मीडियावर ‘ट्रोल’ होत आहेत.

कपल्स ठरताय आकर्षण
सामन्यादरम्यान प्रेक्षकांमधील कपल्स आकर्षण ठरत आहेत. अनेक कपल्सने भारत आणि पाकच्या जर्सी घालून आम्ही दोन्ही देशांना समर्थन करीत असल्याचे दर्शवले आहे. शेजारी देशाला पाठिंबा हाही त्यामागील संदेश. काही तरुण-तरुणींनी दोन्ही गालांवर भारत आणि पाकचे चिन्ह काढून लक्ष वेधल्याचे दिसते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -