IPL 2022 : ५ महिन्यांनंतर रंगणार IPL चा रणसंग्राम; २ एप्रिल पासून १० संघासह होणार नव्या हंगामाची सुरुवात

भारतीय क्रिकेट बोर्डाकडून इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या हंगामाचे वेळापत्रक जवळपास निश्चित करण्यात आले आहे

भारतीय क्रिकेट बोर्ड (BCCI) कडून इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL) १५ व्या हंगामाचे वेळापत्रक जवळपास निश्चित करण्यात आले आहे. बीसीसीआयकडून अधिकृतरित्या याबाबत अद्याप घोषणा करण्यात आली नाही. पण सर्व संघाच्या फ्रँचायझीला सांगण्यात आले आहे की २ एप्रिल पासून आगामी हंगामाची सुरुवात होण्याची शक्यता आहे. सोबतच हेदेखील निश्चित आहे की १५ व्या हंगामातील पहिला सामना १४ व्या हंगामातील विजेत्या चेन्नई सुपर किंग्ज सोबत असणार आहे. आगामी येणारा आयपीएलचा हंगाम आणि त्यातील सर्वच ७4 सामने भारतातच होणार असल्याचे बीसीसीआयने यापूर्वीच स्पष्ट केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलच्या १४ व्या हंगामाचे दुसरे सत्र यूएईमध्ये पार पडले होते.

१० संघासह होणार नवीन हंगामाची सुरुवात

एका स्पोर्ट्स वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार पुढील हंगामातील अंतिम सामना ४ किंवा ५ जूनला होऊ शकतो. आयपीएलच्या नव्या हंगामात लखनऊ आणि अहमदाबाद या दोन नवीन संघाचा समावेश असणार आहे. २ नवीन संघाचा समावेश झाल्याने यावेळी ६० च्या जागेवर ७४ सामने होणार आहेत. पाहिल्यासारखेच प्रत्येक संघाला प्रत्येकी १४-१४ सामने खेळावे लागतील. यातील सात सामने घरच्या मैदानावर तर सात सामने घरच्या मैदानावरून बाहेर.

पुढच्या हंगामासाठी खेळांडूच्या लिलाव प्रक्रियेला डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे मात्र याची अद्याप तारीख जाहीर झाली नाही. लखऊ आणि अहमदाबाद या दोन नवीन संघांचा आगामी हंगामात समावेश होणार आहे. दोन्हीही नवीन संघाच्या माध्यमातून बीसीसीआयला १२ हजार कोंटीची कमाई झाली आहे. जी अपेक्षेपेक्षा खूप जास्त आहे.

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे की आयपीएलचा १५ वा हंगाम भारतात होईल. चेन्नईच्या संघाने चौदावा हंगाम जिंकल्यानंतर शहा यांनी सांगितले होते की, “मला माहित आहे आपल्या सगळ्यांना सीएसकेच्या संघाला चेपकमध्ये खेळताना बघायचे आहे, तर आपल्याला ही संधी लवकरच मिळणार आहे. पुढचा हंगाम भारतातच होईल आणि आणखी शानदार होईल”.


हे ही वाचा: IND vs NZ Test series : भारताचे ६ दिग्गज खेळाडू बाहेर, पण विश्वविजेत्याविरूध्द टीम इंडिया प्रबळ दावेदार