घरक्रीडाशतकवीर

शतकवीर

Subscribe

इंग्लंडमधील बाराव्या वर्ल्डकप स्पर्धेत धावांच्या राशी उभारल्या जातील, शतकांची नोंद होईल, असे अंदाज वर्तवले जात होते. आतापर्यंतच्या (भारत-ऑस्ट्रेलिया सामन्याआधी) १३ सामन्यांत ५ शतके नोंदवण्यात आली असून, त्रिशतकी धावसंख्या ६ वेळा पार करण्यात आली आहे. मोसमाच्या पूर्वार्धात काहीशा ढगाळ वातावरणात चेंडू स्विंग होतो. त्यामुळे मोठी धावसंख्या उभारणे तसे कठीणच, परंतु इंग्लंड-बांगलादेश लढतीत कार्डिफच्या सोफिया गार्डन्सवर सलामीवीर जेसन रॉयच्या फटकेबाज शतकामुळे (५ षटकार, १४ चौकारांसह १२१ चेंडूत १५३ धावा) इंग्लंडने ६ बाद ३८६ अशी विक्रमी मजल मारली. वर्ल्डकपमधील इंग्लंडच्या या सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग करताना बांगलादेशने २८० धावा केल्या. शाकिब अल हसनने ११९ चेंडूत १२१ धावा तडकावल्या. एका सामन्यात दोन शतके झळकावली गेली.

भारताच्या रोहित शर्माने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध १४४ चेंडूत २ षटकार आणि १३ चौकारांनिशी नाबाद १२२ धावा फटकावल्यामुळे भारताने विजयी सलामी दिली. रबाडा, मॉरिस, फेहलुकवायो या द.आफ्रिकेच्या तेज त्रिकुटाचा रोझ बॉलच्या खेळपट्टीवर मुकाबला करत रोहितने दमदार शतक झळकावले. त्याच्या संयमी शतकी खेळीमुळे भारताने द.आफ्रिकेचे आव्हान परतवून लावले. रोहितचा अपवाद वगळता या सामन्यात शतक तर दूरच इतरांना अर्धशतकी मजलही मारता आली नाही. वर्ल्डकप स्पर्धेला सुरुवात झाली १९७५ मध्ये. लॉर्ड्सवर ७ जून १९७५ रोजी झालेल्या पहिल्यावहिल्या वर्ल्डकप सामन्यात यजमान इंग्लंडने भारताविरुद्ध त्रिशतकी मजल मारली. सलामीवीर डेनिस एमिसने ६०षटकांच्या या सामन्यात शानदार शतक झळकावले. किथ फ्लेचर आणि क्रिस ओल्ड यांची चांगली साथ त्याला लाभली. ४४ वर्षांच्या वर्ल्डकपच्या इतिहासात आतापर्यंत १७० शतके फटकावली गेली असून, यात दोन द्विशतकांचा (क्रिस गेल, मार्टिन गप्टिल) समावेश आहे.

- Advertisement -

यंदाच्या वर्ल्डकपमध्ये यजमान इंग्लंडला पाकिस्तानने हरवले. जो रूट, जॉस बटलर यांनी शतके फटकावूनदेखील इंग्लंडला पाकच्या ३४८ धावसंख्येचा पाठलाग करताना १४ धावांनी सामना गमवावा लागला. ट्रेंट ब्रिजच्या पाटा खेळपट्टीवर पाक-इंग्लंड यांनी त्रिशतकी मजल मारली. या सामन्यात तब्बल ६८२ धावा फटकावल्या गेल्या आणि २ शतके, ३ अर्धशतके झळकावण्यात आली.

गतवेळच्या उपविजेत्या न्यूझीलंडने तिन्ही सामने जिंकून ६ गुणांसह आघाडी घेतली आहे. प्रतिस्पर्ध्यांना झटपट गुंडाळण्यात (श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान) किवीजचे गोलंदाज यशस्वी ठरले आहेत. हेन्री, बोल्ट, निशम या तेज, मध्यमगती त्रिकुटाने अचूक मारा करून झटपट बळी मिळवले आहेत. न्यूझीलंडची आता कसोटी लागेल भारताविरुद्ध. ट्रेंट ब्रिज, नॉटिंगहॅमला भारत-न्यूझीलंड सामना रंगेल येत्या गुरुवारी १३ जूनला. तीन दुबळ्या आशियाई संघांना सहज नमवणार्‍या केन विल्यमसनच्या न्यूझीलंडला विराट कोहलीच्या भारतीय संघाचे कडवे आव्हान असेल. सुरुवातीला काही सामन्यांत गोलंदाजांचे वर्चस्व दिसून आले. इंग्लंडमधील ढगाळ वातावरणाचा फायदा तेज गोलंदाजांनी उठवला. स्विंग, सीम गोलंदाजीपुढे फलंदाजी ढेपाळली, परंतु नंतर स्वच्छ सूर्यप्रकाशात झालेल्या सामन्यात ठणठणीत खेळपट्ट्यांवर चांगली धावसंख्या रचली गेली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -