Shoaib akhtar : शोएब अख्तरला लाइव्ह शो मध्ये अँकरने झापले; राजीनामा देत केला वॉकआऊट

पाकिस्तानच्या खेळीचे सर्वत्र कौतुक होत असताना पाकिस्तानात मात्र माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला एका लाइव्ह शो मध्ये पाक अँकरने चांगलेच सुनावले आहे

यंदाच्या टी २० विश्वचषकात पाकिस्तानी संघ आपल्या शानदार कामगिरीमुळे चांगलाच चर्चेत आहे. ज्या प्रकारे पाकिस्तानी संघाने आपल्या पहिल्या दोन सामन्यात खेळी केली, त्यामुळे पाकिस्तानी संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे. बाबर आझमच्या संघाने भारतीय संघाचा पहिल्याच सामन्यात पराभव करून विश्वचषकातील एक मोठा विक्रम मोडीत काढला. पाकिस्तानने विश्वचषकाच्या स्पर्धेत भारताचा पहिल्यांदाच पराभव केला, त्यानंतर पाकिस्तानने न्यूझीलंडचा देखील पराभव केला. या पाकिस्तानच्या खेळीचे सर्वत्र कौतुक होत असताना पाकिस्तानात मात्र माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरला एका लाइव्ह शो मध्ये पाक अँकरने चांगलेच सुनावले आहे. लाईव्ह शो मध्ये झालेल्या वादामुळे शोएब अख्तरवर लाईव्ह शो सोडून बाहेर पडण्याची वेळ आली.

पाकिस्तानच्या ‘पीटीव्ही’ वाहिनीवर ‘गेम ऑन’ नावाचा शो चालू होता. त्यात माजी गोलंदाज शोएब अख्तर त्याची बाजू मांडत असताना त्याने पाकिस्तानी गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि हॅरिस राऊफ यांचे कौतुक केले. पाकिस्तानच्या सुपर लीगमधील लाहोर कलंदर्स संघातून हे दोन्ही खेळाडू पुढे आले असल्याचे शोएब अख्तरने सांगितले, यावरून कार्यक्रमात एकच गोंधळ उडाला, कार्यक्रमातील अँकर नौमान नियाज यांनी शोएब अख्तरला बोलण्यापासून थांबवले. अँकर नौमानच्या म्हणण्यानुसार “शाहीन पाकिस्तानच्या अंडर-१९ च्या क्रिकेट संघातून पुढे आलेला खेळाडू आहे. त्यावर शोएब अख्तरने सांगितले “मी हॅरिस राऊफ याच्याबाबत बोलतोय” यावर नौमान यांचा राग अनावर झाला आणि त्यांनी शोएब अख्तरचा अपमान करायला सुरूवात केली.

“तू माझ्याशी असभ्य भाषेत बोलत आहेस, मी तुला सांगतोय की तुला जर जास्त अति शहाणपणा दाखवायचा  असेल तर तू या शो मधून जाऊ शकतोस. हे मी तुला लाइव्ह कार्यक्रमात सांगत आहे” असे नौमान यांनी सांगितले.

एका ब्रेकनंतर कार्यक्रमाला पुन्हा सुरूवात झाली आणि शोएब अख्तरने झालेल्या प्रकरणावर सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्याला अपयश आले, त्यानंतर शोएबने शो मधून जाण्याचा निर्णय घेतला. “मला खूप वाईट वाटले, मी पीटीव्हीमधून राजीनामा देत आहे. एका राष्ट्रीय वाहिनीवर माझ्या सोबत जो व्यवहार झाला आहे तो अत्यंत चुकीचा आहे, त्यामळे मी इथून निघतो आहे. धन्यवाद”, असे म्हणत शोएब अख्तर कार्यक्रमातून निघून गेला. दरम्यान झालेल्या प्रकरणाबद्दल शोएबने त्याच्या ट्विटर अकांउट वरून एक व्हिडिओ पोस्ट करत नेमके काय घडले याची सर्व माहिती दिली आहे.


हेही वाचा – T20 world cup 2021 : पाकिस्तानच्या विजयाचा भारताला होणार फायदा, वाचा समीकरण