घरक्रीडारोहित कसोटीत यशस्वी होणारच!

रोहित कसोटीत यशस्वी होणारच!

Subscribe

अजिंक्य रहाणेला विश्वास

एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणार्‍या भारताच्या रोहित शर्माला कसोटी क्रिकेटमध्ये फारसे यश मिळालेले नाही. त्यातच पाचव्या क्रमांकावर खेळणारा अजिंक्य रहाणे आणि सहाव्या क्रमांकावरील हनुमा विहारी यांनी वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत दमदार कामगिरी केल्याने रोहितला मधल्या फळीत स्थान मिळणे अवघड आहे.

त्यामुळे भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवड समितीने रोहितला कसोटीत सलामीवीर म्हणून खेळवण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित सलामीवीर म्हणून खेळणार याची खात्री नसली तरी कसोटी क्रिकेटमध्ये तो यशस्वी होईल, असा भारताचा उपकर्णधार अजिंक्य रहाणेला विश्वास आहे.

- Advertisement -

रोहित कसोटीत भारताच्या डावाची सुरुवात करणार याची मला खात्री नाही. मात्र, तो जर सलामीवीर म्हणून खेळला, तर मला नक्कीच आनंद होईल. मी वेस्ट इंडिजमध्येही म्हणालो होतो की, रोहितसारख्या उत्कृष्ट खेळाडूला फारकाळ संघाबाहेर ठेवणे अवघड आहे. रोहितने खूप मेहनत घेतली आहे. आता त्याला संधी मिळाल्यास तो चांगली कामगिरी करेल असा मला विश्वास आहे. त्याच्यात किती प्रतिभा आहे, हे सर्वांनाच माहित आहे, असे रहाणे म्हणाला.

तसेच एकदिवसीय आणि कसोटी क्रिकेटमधील फरकाविषयी रहाणेने सांगितले, एकदिवसीय क्रिकेटमध्ये तुम्हाला मैदानात उतरून स्वतःचा खेळ करायचा असतो. परंतु, कसोटी क्रिकेट हा मानसिकतेचा खेळ आहे. कसोटी क्रिकेटमध्ये जर दोन गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असतील, तर तुम्हाला सावधपणे फलंदाजी करणे भाग असते. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्हाला सर्वोत्तम गोलंदाजांचा सामना करायचा असतो. ते फारसे खराब चेंडू टाकत नाहीत. त्यामुळे तुम्ही खूप सराव करणे आवश्यक असते.

- Advertisement -

पुन्हा एकदिवसीय क्रिकेट खेळायचे आहे!

अजिंक्य रहाणे हा कसोटी क्रिकेटमध्ये भारताच्या प्रमुख फलंदाजांपैकी एक आहे. मात्र, त्याने २०१८ नंतर एकही एकदिवसीय सामना खेळलेला नाही. परंतु, तो पुन्हा एकदिवसीय क्रिकेट खेळण्यास उत्सुक आहे. याबाबत त्याने सांगितले, कसोटी व्यतिरिक्त मला एकदिवसीय क्रिकेट खेळायला आवडते. मला पुन्हा एकदिवसीय क्रिकेट खेळायचे आहे. सध्या मी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेवर लक्ष केंद्रित करत आहे. इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकासाठीच्या संघात नाही हे कळल्यावर मी कौंटी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -