‘एमसीए’च्या विविध समित्यांवर नाशिकचा षटकार

किरण जोशी, प्रशांत रॉय, समीर रकटे, शेखर घोष, भगवान काकड, विनोद यादव महत्त्वपूर्ण पदांवर

नाशिक – क्रीडा हब म्हणून नावलौकीक प्राप्त झालेल्या नाशिकच्या क्रीडाविश्वात पुन्हा एकदा मानाचा तुरा रोवला गेला आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेच्या तब्बल सहा पदाधिकार्‍यांची यंदादेखील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर महत्त्वपूर्ण पदांवर निवड झाली आहे.

महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अतिशय महत्त्वाच्या क्रिकेट ऑपरेशन कमिटी-सीओसीवर नाशिकचे रणजीपटू प्रशांत रॉय यांची सलग दुसर्‍यांदा निवड झाली आहे. क्रिकेट ऑपरेशन कमिटी ही महाराष्ट्र क्रिकेटचा विकास होण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे निर्णय घेण्याचे काम करते. रॉय यांनी यापूर्वी महाराष्ट्र रणजी संघाचे निवड समिती सदस्य तसेच २३ वर्षाखालील संघाचे निवड समिती सदस्य आणि १९ व १६ वर्षांखालील संघाचे निवड समितीचे चेअरमनम्हणून काम बघितले आहे. नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेचे सेक्रेटरी समीर रकटे यांची सलग आठव्या वर्षी महाराष्ट्राच्या स्पर्धा समितीवर निवड झाली आहे. किरण जोशी यांची महाराष्ट्र रणजी संघ निवड समिती सदस्यपदी निवड झाली आहे.

जोशी यांनी यापूर्वीदेखील महाराष्ट्र संघाचे १९ वर्षांखालील निवड समितीचे सदस्य म्हणून अनेक वर्षे काम केले आहे. तर नाशिकचे रणजीपटू भगवान काकड यांची सलग दुसर्‍यांदा महाराष्ट्राच्या १९ वर्षाखालील निवड समिती सदस्य म्हणून निवड झाली. रणजीपटू शेखर घोष यांचीदेखील १९ वर्षाखालील महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून पुन्हा नियुक्ती झाली आहे. शेखर घोष यांना यापूर्वीदेखील रणजी २३, १९ व १६ वर्षांखालील महाराष्ट्र संघाचे प्रशिक्षक म्हणून काम केल्याचा अनुभव आहे. तसेच नाशिकच्या विनोद यादव यांची महाराष्ट्राच्या २५ वर्षाखालील क्रिकेट संघासाठी फिजिकल ट्रेनरपदी निवड झाली आहे. यापूर्वीही यादव यांनी १६ व २३ वर्षांखालील संघाचे ट्रेनरपद भूषवले होते. ते गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पुरुष व महिला खेळाडूंना शारीरिक तंदुरुस्तीसाठी मार्गदर्शन करत आहेत. या निवडींबद्दल जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन विनोद शहा व जिल्हा क्रिकेट संघटनेच्या पदाधिकारी, सदस्यांनी सर्वांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.