मुंबई इंडियन्सची ‘पंचरत्ने’!

'मुंबई इंडियन्स' हा आयपीएल स्पर्धेतील सर्वोत्तम संघ का मानला जातो, याचा प्रत्यय यंदाच्या मोसमातही आला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचा तेरावा म्हणजेच यंदाचा मोसम युएईमध्ये पार पडला. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने सलग दुसऱ्यांदा आणि एकूण पाचव्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले. क्रिकेटमधील कोणतीही स्पर्धा जिंकण्यासाठी एखाद-दोन खेळाडूंनी चांगली कामगिरी करून भागत नाही. संघातील प्रत्येक खेळाडूने वेळोवेळी योगदान दिले तरच तो संघ यशस्वी होऊ शकतो. मुंबईलाही सर्व खेळाडूंच्या योगदानांमुळेच हे यश प्राप्त झाले. मात्र, त्यातही पाच खेळाडूंची कामगिरी उल्लेखनीय ठरली.

boult, suryakumar, ishan, qdk, bumrah
ट्रेंट बोल्ट, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, क्विंटन डी कॉक, जसप्रीत बुमराह

आयपीएल या जगातील सर्वात मोठ्या टी-२० च्या मागील काही मोसमांवर नजर टाकल्यास आपल्याला हे जाणवते की, ज्या संघाचे स्थानिक, आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा अनुभव नसलेले (अनकॅप्ड) खेळाडू चांगला खेळ करतात, त्या संघाला जेतेपद पटकवण्याची सर्वाधिक संधी असते. मुंबई इंडियन्सला सुरुवातीच्या पाच मोसमांत आयपीएलच्या चषकाने हुलकावणी दिली होती. मात्र, त्यानंतरच्या आठ पैकी पाच मोसमांत मुंबईचा संघ विजेता ठरला आहे. मुंबईच्या यशात कर्णधार रोहित शर्मा, लसिथ मलिंगा, किरॉन पोलार्ड या अनुभवी खेळाडूंची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. मात्र, त्यांना तितकीच महत्त्वाची साथ लाभली आहे ती युवा भारतीय खेळाडूंची. यंदाच्या मोसमातही सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन या भारतीय स्थानिक खेळाडूंनी मुंबईच्या यशाला हातभार लावला.

‘सूर्यकुमार भविष्यात भारतासाठी खेळू शकेल,’ असे रोहित शर्मा २०११ मध्ये म्हणाला होता. त्याची ही भविष्यवाणी अजून खरी ठरलेली नसली तरी सूर्यकुमार लवकरच भारताच्या निळ्या जर्सीमध्ये दिसला नाही, तरच नवल! सूर्यकुमार सुरुवातीच्या काही मोसमांत मुंबई आणि त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला. २०१८ मध्ये त्याचे मुंबईच्या संघात पुनरागमन झाले आणि त्यानंतर त्याने मागे वळून पाहिलेले नाही. त्याच्या कामगिरीत सातत्याचा अभाव असल्याची वारंवार टीका व्हायची. परंतु, २०१८ मध्ये ५१२ धावा, २०१९ मध्ये ४२४ धावा आणि २०२० मध्ये ४८० धावा ही कामगिरी काही वेगळी कहाणी सांगते.

सूर्यकुमारने यंदाच्या मोसमात १६ सामन्यांत ४८० धावा फटकावत सर्वांनाच प्रभावित केले (भारताच्या निवडकर्त्यांना सोडून)! पुढील आठवड्यात भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याला सुरुवात होणार असून सूर्यकुमारकडे पुन्हा एकदा दुर्लक्ष करण्यात आले आहे. ‘सूर्यकुमारला याचे नक्कीच दुःख झाले असेल. मात्र, तो ज्याप्रकारे खेळतोय ते पाहता लवकरच त्याच्यासाठी भारतीय संघाची दारे उघडतील,’ असा विश्वास किरॉन पोलार्डने आयपीएलदरम्यान व्यक्त केला होता.

सूर्यकुमारप्रमाणेच डावखुऱ्या ईशान किशनची यंदाच्या मोसमातील कामगिरी वाखाणण्याजोगी होती. किशनला २०१८ मध्ये मुंबईने ५.५ कोटी रुपयांत खरेदी केले होते. २०१८ आणि २०१९ मध्ये मुंबईच्या संघ व्यवस्थापनाने दाखवलेला विश्वास त्याला सार्थ ठरवता आला नाही. यंदाचा मोसम मात्र त्याने चांगलाच गाजवला. किशनने १४ सामन्यांत ५७.३३ च्या सरासरीने ५१६ धावा केल्या. सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो पाचव्या स्थानावर राहिला. भारतीय संघ सध्या यष्टीरक्षक-फलंदाजाच्या शोधात आहे. अशात किशनने यंदाच्या मोसमात केलेली कामगिरी त्याच्यासाठी लाभदायी ठरू शकेल.

किशनने मुंबईकडून खेळताना यष्टिरक्षण केले नाही. ती जबाबदारी पार पाडली दक्षिण आफ्रिकेच्या क्विंटन डी कॉकने. मुंबईच्या यशात सलामीवीर डी कॉकची भूमिकाही महत्त्वाची ठरली. डी कॉकने किशननंतर मुंबईकडून सर्वाधिक धावा केल्या. त्याने १६ सामन्यांत ५०३ धावा केल्या, ज्यात चार अर्धशतकांचा समावेश होता. मुंबईचा कर्णधार आणि डी कॉकचा सलामीचा साथीदार रोहित शर्मा काही सामन्यांना मुकला. मात्र, त्याच्या अनुपस्थितीत डी कॉकने अधिक जबाबदारीने खेळत मुंबईला सातत्याने उत्तम सुरुवात मिळवून दिली.

मुंबईची गोलंदाजांची फळी ही आयपीएलमध्ये सर्वोत्तम मानली जाते. श्रीलंकेचा अनुभवी गोलंदाज लसिथ मलिंगाने वैयक्तिक कारणांमुळे यंदाच्या स्पर्धेत न खेळण्याचा निर्णय घेतला. मात्र, मुंबईच्या संघाला त्याची फारशी उणीव भासली नाही असे म्हणता येईल. मलिंगाच्या अनुपस्थितीत मुंबईच्या गोलंदाजीची धुरा सांभाळली ती जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट या तेज जोडीने. यंदा सर्वाधिक विकेट मिळवणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत बुमराह दुसऱ्या, तर बोल्ट तिसऱ्या स्थानावर राहिला.

बुमराह आणि बोल्ट या दोघांनी १५ सामन्यांत अनुक्रमे २७ आणि २५ मोहरे टिपले. २७ विकेट ही बुमराहची आयपीएल स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी ठरली. त्याला बोल्टची उत्तम साथ लाभली. बोल्टने यंदा पॉवर-प्लेमध्ये तब्बल १६ विकेट घेतल्या. त्याने सुरुवातीला भेदक मारा केल्याने मुंबईच्या इतर गोलंदाजांना मधल्या षटकांत धावा रोखणे सोपे गेले. तर अखेरच्या षटकांत बुमराहने त्याची जादू दाखवल्याने प्रतिस्पर्धी संघ चांगलाच अडचणीत सापडायचा. याचाच फायदा मुंबईला झाला आणि त्यांनी विक्रमी पाचव्यांदा आयपीएलच्या चषकावर आपले नाव कोरले.