Eco friendly bappa Competition
घर ठाणे ठाण्यात पावसाचा आणि गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला

ठाण्यात पावसाचा आणि गोविंदा पथकांचा उत्साह शिगेला

Subscribe

हवामान खात्याने हलक्या पावसाच्या सरीचा अंदाज वर्तवला असताना, गुरुवारी सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाचे बरसणे दुपारी बारा वाजेपर्यंत सुरूच राहील्याने गोंविदांच्या आनंदावर विरजण पडले. ठाण्यासह मुंबईतील गोविंदा पथकांनी मानाच्या आणि मोठ्या हंड्यांच्या ठिकाणी हजेरी लावली.

ठाणे: हवामान खात्याने हलक्या पावसाच्या सरीचा अंदाज वर्तवला असताना, गुरुवारी सकाळपासून पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाचे बरसणे दुपारी बारा वाजेपर्यंत सुरूच राहील्याने गोंविदांच्या आनंदावर विरजण पडले. ठाण्यासह मुंबईतील गोविंदा पथकांनी मानाच्या आणि मोठ्या हंड्यांच्या ठिकाणी हजेरी लावली. तर काहींनी मानवी मनोरे उभारण्यास सुरुवात केली होती. दरम्यान दरवर्षी खिडकीतल्या ताई आता वाकू नका… दोन पैसे देतो मला भिजवून टाका. या गाण्याच्या ठेक्यावर गोविंदा पथकांनी ताल धरल्यावर वरूणाराजाने  गोविंदा पथकांना अक्षरशः चिंब करून टाकलं. वरूण राजाच्या आगमनाने मात्र आयोजक आणि गोविंदा पथकांमध्ये नाराजी पाहण्यास मिळाली. परंतु उत्साह मात्र कणभरही कमी झाला नाही.

गुरुवारी हवामान खात्याने पावसाच्या हलक्या तर शुक्रवारीपासून पुढे पावसाची शक्यता वर्तवली होती. मात्र गुरुवारी पहाटे पासून ठाण्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. सकाळी साडेसहा वाजल्यापासून साडेआठ वाजण्याच्या ३० मिमी पावसाची नोंद झाली. त्यानंतर साडेअकरा वाजेपर्यंत पुन्हा ३१.२३ मिमी पाऊस झाला आहे. अशाप्रकारे एकूण ६१.२३ मिमी पावसाने हजेरी लावल्याने दहीकाला आयोजकांसह गोविंदा पथकांमध्ये नाराजीचा सूर उमटल्याचे पाहण्यास मिळत आहे. तरीपण सकाळपासून मुंबईतील गोविंदा पथकांनी ठाण्याकडे येण्यास सुरुवात केली. तर काही पथकांनी ठाण्यात येत, मानाच्या आणि मोठ्या हंड्यांना मानाची सलामी दिल्याचं पाहायला मिळालं. त्याचबरोबर कोसळणाऱ्या पावसात मानवी मनोरे उभारताना पथक दिसत होते. हे मानवी मनोरे उभारताना त्यांचा उत्साह पावसाप्रमाणेच शिगेला गेल्याचे दिसत होते.

ठाण्यात यशस्वी ९ थराची सलामी

- Advertisement -

आमदार प्रताप सरनाईक आयोजित दहीहंडी उत्सवाच्या ठिकाणी ( वर्तक नगर ) मुंबईतील जय जवान गोविंदा पथकाने यशस्वी ९ (थर ) मानवी मनोरे उभारत सलामी दिली.

वर्तकनगर येथील संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या दहीहंडी उत्सवात जोगेश्वरीच्या जय जवान गोविंदा पथकाने सुरुवातीला नऊ थर लावण्याचा केलेला पहिला प्रयत्न अयशस्वी ठरला. परंतु पहिल्या वेळी आलेल्या अपयशानंतर गोविंदा पेटून उठले आणि दुसऱ्याच झटक्यात जय जवान गोविंदा पथकाकडून नऊ थरांची यशस्वी सलामी देण्यात आली.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -