घरठाणेलाकडांची बेकायदा वाहतूक

लाकडांची बेकायदा वाहतूक

Subscribe

वन अधिकार्‍यांची कारवाई

संगमनेर येथून बेकायदेशीर लाकडांची वाहतूक करणारा ट्रक वनाधिकार्‍यांनी मोठ्या शिताफीने पकडला आहे. मुंबई – नाशिक महामार्गावर आसनगाव जवळ मध्यरात्रीच्या सुमारास जंगली लाकडांनी भरलेल्या ट्रकसह सुमारे 15 लाखांचा माल जप्त करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. शहापूर वनविभाग आणि शेतकरी मालकी ठेकेदार संघटनेला लाकडांची बेकायदेशीर वाहतूक होणार असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार वनाधिकारी व शेतकरी मालक ठेकेदार संघटनेचे पदाधिकारी यांनी मुंबई-नाशिक महामार्गावर पाळत ठेवली होती.

मध्यरात्री एकच्या सुमारास लाकडांनी भरलेला ट्रक अडवला असता त्यामध्ये वनविभागाची बाभूळ जातीची परवानगी न लागणारी लाकडे असल्याचे सांगण्यात आले. मात्र संशयित ट्रक ची तपासणी केली असता त्यामध्ये आंबा, जांभूळ, कडुनिंब आदी लाकूड खोडांनी खच्चून भरला असल्याचे आढळून आले. वनाधिकारी सुनील भोंडीवले, वनपथक व संघटनेचे कमलेश कुंदर, शेखर पांडव, आकाश अधिकारी व सहकार्‍यांनी ही धडक कारवाई केली असून आसनगाव येथील वन परिक्षेत्रात ट्रकसह सुमारे 15 लाखांचा लाकडी माल जप्त करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणी इम्रानखान पठाण व रविंद्र चिलप यांना ताब्यात घेण्यात आले असल्याचे शहापुरचे वनपरिक्षेत्र अधिकारी शैलेश गोसावी यांनी माहिती देताना सांगितले. दरम्यान, शेतकरी मालकी ठेकेदार संघटनेने बेकायदेशीर चोरटी वाहतूक होत असल्याची तक्रार वनाधिकार्‍यांकडे केली असून त्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जात असल्याने चोरट्यांचे फावले असून जंगल बेचिराख होत असल्याचे शेतकर्‍यांकडून बोलले जात आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -