घरठाणेऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव विनावापर पडूनच

ऑलिम्पिक दर्जाचा जलतरण तलाव विनावापर पडूनच

Subscribe

प्रशासनाच्या कारभाराविरोधात आमदार केळकर संतप्त

बाळकूम येथील ऑलिम्पिक दर्जाचा तरण तलाव लोकार्पणानंतरही एक वर्ष विनावापर पडूनच असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. आमदार संजय केळकर यांनी शुक्रवारी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करून प्रशासनाला फैलावर घेतले. एप्रिलपासून शाळांना सुट्टी पडणार असल्याने विद्यार्थ्यांसाठी मैदाने, जलतरण तलाव सज्ज ठेवणे गरजेचे असताना बाळकुम येथील २७ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला धर्मवीर आनंद दिघे तरण तलाव अद्याप विनावापर पडून असल्याचे उघडकीस आले आहे. आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसमवेत पाहणी करत प्रशासनाच्या गलथान कारभारावर ताशेरे ओढत एप्रिलआधीच तलाव जलतरणपटू, सर्वसामान्य नागरीक आणि विद्यार्थ्यांसाठी खुले करण्याची मागणी केली. यावेळी ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी रोहित गुप्ते, बांधकाम विभागाचे अधिकारी आनंद नांदगावकर आदी अधिकारी उपस्थित होते.

मागील वर्षी २७ फेब्रुवारीला या तलावाचे लोकार्पण करण्यात आले. तेव्हापासून आजतागायत हा तलाव वापरात नसल्याने ठाणेकरांच्या कररूपी पैशाची उधळपट्टी होत असल्याबाबत केळकर यांनी संताप व्यक्त केला. या तलावात पुढील टप्प्याची काही कामे शिल्लक असून आठ कोटींच्या निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. ही कामे झाल्यानंतरच हा तलाव खुला करण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

- Advertisement -

मग लोकार्पणाची घाई का केली
जर कामे पूर्ण झाली नाहीत तर तलावाचे लोकार्पण करण्याची घाई का केली? एप्रिलपासून शाळेला सुट्ट्या पडणार असताना आता निविदा काढल्यास तलाव आणखी काही महिने रखडणार आहे. यात प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष आणि गलथान कारभार दिसत असून ठाणेकरांच्या पैशाची ही उधळपट्टी असल्याचा आरोप केळकर यांनी केला. एप्रिलआधीच कामे पूर्ण करून तलाव खुला करण्यात यावा, असा सज्जड दमच केळकर यांनी अधिकाऱ्यांना यावेळी भरला.

स्थानिक समस्यांबाबत बोलावली होती बैठक
बाळकुम येथील राम मारुती नगर रस्त्याचे काम गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असून माजिवडे-मानपाडा प्रभाग समिती कार्यालयात स्थानिक समस्यांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत आमदार केळकर यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले. बाळकुम नाका ते माजिवडे-मानपाडा प्रभाग समिती कार्यालयापर्यंत काँक्रीट रस्ता आणि बाळकुम पाडा नंबर ३ भूमिगत गटार आणि रस्त्याच्या कामाचीही केळकर यांनी पाहणी केली. यावेळी अधिकाऱ्यांसमवेत भाजपचे रविराज रेड्डी, हेमंत म्हात्रे, निलेश पाटील, तृप्ती सुर्वे, दत्ता घाडगे रुनवाल सोसायटीचे पंकज कारंडे, सचिन शिंगारे आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -