घरठाणेमहापौरांसह सहा जणांना हव्या नव्या कोऱ्या गाड्या

महापौरांसह सहा जणांना हव्या नव्या कोऱ्या गाड्या

Subscribe

कार खरेदीसाठी ७० लाखांची उधळपट्टी

मालमत्ता आणि पाणीपट्टी वसुलीसाठी विविध योजनांसह थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा उगारला गेला आहे. त्यातच यंदा अर्थसंकल्पाला कात्री लावली असताना, मात्र सत्ताधाऱ्यांनी आपला राजेशाही थाटासाठी चक्क नव्या कोऱ्या गाड्यांची मागणी करत तसा प्रस्ताव येत्या मंगळवारी पार पडणाऱ्या स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी आणला आहे. या गाड्या खरेदीवर ७० लाख रुपये महापालिका तिजोरीतून खर्च होणार आहेत. त्यातच, २०२२ मध्ये महापालिका निवडणुक होणार असल्याने हा थाट म्हणजे आयजीच्या जीवावर बायजी उदार आणि सासूच्या जीवावर जावई सुभेदार असे म्हणण्याची वेळ आणली आहे.
महापालिका हद्दीत २०२० च्या मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यास सुरुवात झाली. तो प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे पालिकेच्या आर्थिक उत्पन्नावर देखील याचा परिणाम झाल्याचे दिसून आले. केवळ मालमत्ता आणि पाणी पुरवठा विभागाने महापालिकेला सावरले आहे. परंतु इतर विभागांचे टार्गेट देखील महापालिका आयुक्तांनी कमी केले आहे. उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसवितांना पालिका आयुक्तांनी अनेक मोठ्या प्रकल्पांना कात्री लावली आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पावरही याचे पडसाद उमटल्याचे दिसून आले आहे.
उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ ठेवण्यासाठी प्रशासनाने काटकसरीचा अर्थसंकल्प सादर केला असून यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदाचा अर्थसंकल्प १२०० कोटी रुपयांनी कमी झाला आहे. टाळेबंदी आणि शिथिलीकरणानंतरही शहराची अर्थव्यवस्था रुळावर अद्यापही पुर्णपणे आली नसून आता ती हळूहळू पुर्वपदावर येताना दिसत आहे. उत्पन्न आणि खर्चाचा ताळमेळ बसविताना प्रशासनाची दमछाक होताना दिसत असून त्याचबरोबर महापालिकेच्या तिजोरीत खडखडात असल्याचे चित्र आहे. त्यातच, ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के, उपमहापौर पल्लवी कदम, सभागृह नेते अशोक वैती, स्थायी समिती सभापती संजय भोईर, महिला व बालकल्याण समिती सभापती, वर्तकनगर आणि माजिवाडा प्रभाग समिती अध्यक्ष अशा सात लोकप्रतिनिधींनी नव्या कोऱ्या गाड्यांची मागणी केली आहे.
मागणीनुसार एकूण ७ नवीन वाहने खरेदी करण्यात येणार आहेत. त्याच्यावर जवळपास ७० लाख रुपये खर्च होणार आहे. यामध्ये महापौरांना १९ लाख ६० हजारांची हुंडाई एलेंट्रा ही कार हवी आहे. तर उपमहापौर, स्थायी समिती सभापती आणि सभागृह नेते यांना १० लाख ९३ हजार रुपये किंमतीची होंडा सिटी कार हवी आहे. त्याचबरोबर, इतर ती प्रभाग समिती सभापतींनी स्विफ्ट डिझायर कार पाहिजेल असून त्या तिन्ही गाड्यांची किंमत १८ लाख ४५ हजारांच्या घरात जात आहे. या वाहन खरेदीला महापालिका आयुक्तांनी मान्यता असल्याने ते प्रस्ताव मंगळवारी होणाऱ्या स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवण्यात आले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -