शिवरायांचा जयघोष करणार्‍यांवर गुन्हा दाखल, असा गुन्हा आपणही करणार -डॉ.जितेंद्र आव्हाड

विनापरवानगी रॅली काढल्याने पोलिसांनी कारवाई केल्याचे केले स्पष्ट

शिवजयंतीच्या दिवशी छत्रपती शिवाजीमहाराज यांचा जयघोष करणार्‍या दोन तरुणांवर कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकाराबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते , आमदार डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून, असा गुन्हा आपणही करू, असे ट्वीट केले आहे. मात्र कळवा पोलिसांनी गुन्हा विनापरवानगी रॅली काढल्याप्रकरणी दाखल केल्याचे स्पष्ट केले आहे. 19 फेब्रुवारी रोजी कळवा परिसरात मोठ्या उत्साहात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी भीम नगर येथे राहणारे तुळशीराम साळवे आणि भीमा साळवे यांनी कळवा नाका येथे दुचाकीवरून जाताना तसेच शिवरायांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरातछत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा दिल्या होत्या. या घोषणांमुळे सार्वजनिक शांततेचा भंग झाल्याचा ठपका ठेऊन या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, याबाबत डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करून संताप व्यक्त केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणा शिवरायांच्या जयंतीलाच देणे, हा जर गुन्हा असेल तर मी पण असा गुन्हा करणार! छत्रपती शिवाजी महाराज की जय ही घोषणा मनामनात आणि मुखामुखात आहे. पोलीस जर अशी अतिरेकी कारवाई करणार असेल आणि शिवरायांवरील प्रेमापासून रोखणार असेल तर ते चालणार नाही. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी आम्ही या अतिरेकी कारवाईस प्रत्युत्तर देणार!! छत्रपती शिवाजी महाराज की जय असे ट्वीट डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.