घरUncategorizedमेट्रो रेल्वेच्या चारही प्रस्तावांना वृक्ष प्राधिकरणाची मंजुरी

मेट्रो रेल्वेच्या चारही प्रस्तावांना वृक्ष प्राधिकरणाची मंजुरी

Subscribe

चार कामांमध्ये एकूण १५९ झाडे कापणार, तर १५१ पुनर्रोपित करणार. मेट्रोसाठी झाडे कापण्यास शिवसेनेचा विरोध मावळला.

मागील दोन महिन्यांपासून वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत राखून ठेवलेले मेट्रो रेल्वेच्या बांधकामांमध्ये बाधित होणारी झाडे कापण्याच्या प्रस्तावाला अखेर मंजुरी दिली. तब्बल चार प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये १५९ झाडे कापण्यास तर १५१ झाडे पुनर्रोपित करण्यास वृक्ष प्राधिकरणाने मंजुरी दिली आहे. मात्र, यापूर्वी मेट्रोच्या कामांमधील बाधित झाडे कापण्यास विरोध करणार्‍या शिवसेनेचा विरोध आता मावळला असून भाजपनेही प्रस्तावाच्या बाजुने मतदान केल्यामुळे रखडलेले हे चारही प्रस्ताव प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रविणसिंह परदेशी यांनी मंजूर केले.

मेट्रो लाईन २ ए या अंधेरी डी.एन.नगर ते ओशिवरा नाला, गोरेगाव पश्चिम ते बांगूर नगर स्टेशनपर्यंतचे बांधकाम, शिवाय कांदिवली पश्चिम लालजी पाडा ते महावीर नगर जंक्शनपर्यंतच्या बांधकामात बाधित होणारी झाडे पुनर्रोपित करण्यात येणार आहे. तसेच मेट्रो लाईन २ या दहिसर पूर्व ते डी.ए.नगरपर्यंतच्या बांधकामांमध्ये बाधित होणारी झाडे ही पुनर्रोपित करण्यात येणार आहेत. या चार ठिकाणचे प्रस्ताव मागील दोन महिन्यांपासून वृक्ष प्राधिकरणापुढे मंजुरीसाठी प्रतीक्षेत होते. मागील अनेक महिन्यांपासून पटलावर ठेवलेले हे प्रस्ताव मंजुरीअभावी राखून ठेवले होते.

- Advertisement -

या चारही प्रस्तावांमध्ये एकूण १५४६ झाडे असून त्यातील १५९ झाडे कापणे आणि १५१ झाडे पुनर्रोपित करणे आदींसाठी परवानगी मागितली होती. परंतु याला काँग्रेसचे जगदीश अमिन कुट्टी वगळता कुणीही विरोध केला नाही. त्यामुळे भाजपसह शिवसेनेच्या सदस्यांनीही प्रस्तावाचे समर्थन केले. विशेष म्हणजे आजवर शिवसेनेच्या विरोधामुळे आजवर मेट्रो कामांचे प्रस्ताव मंजूर होत नव्हते. परंतु महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी हे सत्ताधारी शिवसेनेचे मन वळवण्यात यशस्वी ठरल्याचे या चारही प्रस्तावांच्या मंजुरीमुळे स्पष्ट होत आहे.

मेट्रो रेल्वेची कामे आणि कापण्यात येणारी झाडे
अंधेरी डी.एन.नगर ते ओशिवरा नाला दरम्यानच्या नियोजित मेट्रो लाईन २ए एकूण बाधित होणारी झाडे : ५६७
कापण्यात येणारी झाडे : ३२
पुनर्रोपित करण्यात येणारी झाडे : ९०

- Advertisement -

गोरेगाव पश्चिम ते बांगूर नगर स्टेशनचे मेट्रो लाईन २ एचे बांधकाम
एकूण बाधित होणारी झाडे : २८३
कापण्यात येणारी झाडे : १०
पुनर्रोपित करण्यात येणारी झाडे : ०३

कांदिवली पश्चिम लालजी पाडा ते महावीर नगर जंक्शन येथील मेट्रो लाईन २
एकूण बाधित होणारी झाडे :३००
कापण्यात येणारी झाडे : ५३
पुनर्रोपित करण्यात येणारी झाडे : २१

दहिसर पूर्व ते डी.ए.नगर मेट्रो लाईन-२
एकूण बाधित होणारी झाडे : ३९६
कापण्यात येणारी झाडे : ६४
पुनर्रोपित करण्यात येणारी झाडे : ३७

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -