घरमुंबईदक्षिण मध्य मतदारसंघात मरगळ

दक्षिण मध्य मतदारसंघात मरगळ

Subscribe

माहिममधून जेष्ठ, तरूण मतदारांचा आदर्श कायम

उच्चभ्रू मतदारांपासून ते सर्वसामान्य झोपडीवासीय मतदार असलेल्या दक्षिण मध्य मतदारसंघात आज दिवसभरात सरासरी मतदानाचा प्रतिसाद पहायला मिळाला. सायन, धारावी, चेंबूर यासारख्या भागातून एरव्ही सकाळपासूनच मतदार गर्दी करून असतात. पण यंदाच्या विधानसभेत मात्र मतदारांचा उत्साह ओसरल्याचेच चित्र पहायला मिळाले. एकुणच यंदाच्या मतदानाच्या टक्केवारीवर याचापरिणाम दिसून आला आहे. लोकसभेच्या मतदानाच्या वेळी लागलेल्या लांबच लांब रांगा तसेच मतदारांनी दाखवलेला उत्साहावर विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान मरगळ आलेली दिसली. मतदारांनी जोडून आलेल्या सुट्ट्या आणि दिवाळी वॅकेशन सुरू झाल्याचा फटका हा मतदानाच्या प्रक्रियेवर पहायला मिळाला.

दक्षिण मध्य मतदारसंघातही मतदानाचा टक्का घसरल्याचा परिणाम यंदाच्या विधानसभेत पहायला मिळाला. दक्षिण मध्य मतदारसंघात सकाळपासूनच संथ अशी मतदानाला सुरूवात झालेली पहायला मिळाली. धारावी मतदारसंघात सकाळच्या वेळेत ९ वाजेपर्यंत अवघे ४.०२ टक्के मतदान झाले होते. सकाळी ९ वाजेपर्यंंत सर्वाधिक मतदान हे सायन कोळीवाड्यात ५.३८ टक्के इतके झाले होते. तर सर्वात कमी मतदान हे वडाळ्यात अवघे ३ टक्के इतके झाले होते. शिवडीत ४.४२ इतके मतदान झाले. तर माहीममध्ये सर्वाधिक असे ८ टक्के मतदान झाले होते. माहीममध्ये मतदानासाठी मतदारांनी सकाळच्या वेळेत मोठा उत्साह दाखवला होता. त्यामध्ये जेष्ठ नागरिक आणि तरूण मतदारांचा मोठा प्रतिसाद पहायला मिळाला. मध्यम वर्गीय आणि उच्च मध्यम वर्गीय असलेल्या माहीम मतदारसंघात मतदानासाठी सकाळपासूनच मतदार उतरल्याचे पहायला मिळाले. मात्र तुलनेत धारावी, सायन आणि वडाळा मतदारसंघात मात्र मतदानासाठी मतदारांचा संथ प्रतिसाद पहायला मिळाला.

- Advertisement -

सकाळनंतर मात्र बहुतांश मतदारसंघात मतदारांचा टक्का वाढत असल्याचे चित्र पहायला मिळाले. धारावीत दुपारी १ वाजेपर्यंत २३ टक्के मतदान झाले. तर सायन कोळीवाड्यात हे मतदान २७ टक्क्यांवर पोचले होते. वड्याळ्यात २८ टक्के तर माहीममध्ये ३० टक्के इतके मतदान झाले होते. शिवडीत २६ टक्के मतदान झाले होते. मतदानाचा टक्का दुपारनंतर मात्र काहीच प्रमाणात वाढलेला पहायला मिळाला. सरासरी ३५ टक्के इतके मतदान दुपारी ३ पर्यंत पहायला मिळाले.

दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात ५ वाजेपर्यंत अनेक विधानसभा मतदारसंघात ५० टक्के इतकाही मतदानाचा आकडा गाठता आला नाही. अनेक मतदारसंघात मतदार मतदानाला उतरले नसल्याचाच फटका मतदानाच्या टक्केवारीवर दिसत होता. चेंबुर ४७ टक्के, धारावी ४२ टक्के, शिवडी ४५ टक्के, माहीम ४८ टक्के, शिवडी ४५ टक्के अशी मतदानाची टक्केवारी ५ वाजेपर्यंत पहायला मिळाली. यंदा दक्षिण मुंबईत ६० टक्के मतदानाचे उदिष्ट ठेवण्यात आले होते. पण मतदारांनी मतदानाच्या प्रक्रियेकडे पाठ फिरवल्यानेच यंदाचे उदिष्ठ गाठण्यात अपयश आले. मतदानाची वेळ संपेपर्यंत यामध्ये काही विशेष फरक पडल्याचे दिसले नाही.

- Advertisement -

अणुशक्तीनगर येथे ४९ टक्के इतके मतदान हे सर्वाधिक होते. त्यापाठोपाठ चेंबुरमध्येही ४८ टक्के इतके मतदान झाल्याचे पहायला मिळाले. याठिकाणचा बहुतांश मध्यम वयीन तसेच झोपडी भागातील मतदार हा मतदानासाठी पोहचला होता हेच या आकडेवारीतून दिसून येते. धारावीतूनही अवघे ४२ टक्के मतदान झाल्याने नेमका मताधिक्याचा कल यंदा कोणाकडे आहे याचे चित्र आता मतमोजणीच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे. तर माहीमच्या लढतीकडेही मनसेच्या एंट्रीमुळे यंदाच्या लढतीत चुरस निर्माण झाली आहे. माहीममध्येही सकाळपासूनच मतदार मोठ्या प्रमाणात मतदानासाठी उतरले होते. त्यामुळे माहीमचा निकालही अतिशय उत्सुकतेचा असणार आहे.

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -