सपा-बसपा वैरी झाले मित्र, उत्तर प्रदेशमध्ये आघाडी!

भाजप, काँग्रेस भ्रष्टाचाराच्या एकाच माळेचे मणी- मायावती

Lucknow
mayawati-akhilesh

लखनौ : आगामी लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील राजकीय समीकरणे बदलली असून एकमेकांचे हाडवैरी असलेल्या बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टी यांनी आधाडी करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपप्रमाणे काँग्रेसलाही भ्रष्टाचारी म्हणत आघाडीतून त्यांना बाहेरचा रास्ता दाखवला आहे. फक्त सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या अमेटी तसेच रायबरेली या दोन जागांवर उमेदवार उभे न करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी पत्रकार परिषदेत समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांनी आघाडीची घोषणा केली.

नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची झोप उडवणारी ही पत्रकार परिषद ठरेल, असे सांगत मायावती यांनी भाजपावर टीकेची झोड उठवली. काँग्रेसच्या काळात देशात घोषित आणीबाणी होती, तर आता देशात अघोषित आणीबाणी आहे, अशी टीका त्यांनी केली. स्वातंत्र्यानंतर काँग्रेसकडे अनेक वर्षे सत्ता होती, काँग्रेसच्या काळातही भ्रष्टाचार झाला, गरिबी वाढली. काँग्रेस- भाजपाची अवस्था एकसारखीच आहे, दोन्ही सरकारच्या काळात घोटाळे झाले आहेत, काँग्रेसच्या काळात त्यांना बोफोर्स घोटाळ्यामुळे सत्ता गमवावी लागली होती, तर आता भाजपाला राफेल घोटाळ्यामुळे सत्ता गमवावी लागेल, असा दावा मायावतींनी केला. यापुढे काँग्रेससोबत आघाडी करणार नाही, आम्ही काँग्रेससोबत गेल्याने नेहमी त्यांचा फायदा झाला, पण आम्हाला यातून काहीच मिळाले नाही, याकडे मायावती यांनी लक्ष वेधले.

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी मायावतींना पाठिंबा देताना सांगितले की,ज्या दिवशी भाजपा नेत्याने मायावतींवर आक्षेपार्ह टीका केली होती, त्याच दिवशी महाआघाडीची पायाभरणी झाली होती. मायावतींचा अपमान हा माझा अपमान आहे. पंतप्रधानपदासाठी मायावतींना पाठिंबा देणार का, या प्रश्नाचेही अखिलेश यांनी उत्तर दिले. आम्ही कोणाला पाठिंबा देणार हे सर्वांनाच माहित आहे, असे सूचक उत्तर त्यांनी दिले.

३८-३८ जागांचा फॉर्म्युला

उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या एकूण ८० जागा असून बसपा ३८ आणि सपा ३८ जागांवर निवडणूक लढवणार आहे. रायबरेली आणि अमेठी या दोन मतदारसंघात काँग्रेसविरोधात आम्ही उमेदवार देणार नाही, असेही मायावतींनी सांगितले. तर उर्वरित जागा महाआघाडीत सामील होणार्‍या अन्य पक्षांसाठी सोडल्या आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here