कंगना १४ दिवस होम क्वारंटाईन होणार नाही, BMC ने दिली सूट!

kangana
कंगना

महाराष्ट्रात होणारा कोरोनाचा प्रसार थांबवण्यासाठी महाराष्ट्रात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला १४ दिवसांसाठी क्वारंटाईनमध्ये ठेवलं जातं. मात्र हा नियम अभिनेत्री कंगना राणावतसाठी शिथील करण्यात आला आहे. कंगनाला मुंबईत आल्यावर १४ दिवस क्वारंटाईन व्हावं लागेल असं सांगण्यात आलं होतं. मात्र आता हिमाचल प्रदेशमधून मुंबईत आलेल्या कंगनाला क्वारंटाईनमधून सूट देण्यात आली आहे.

द हिंदूने दिलेल्या वृत्तानुसार कंगना केवळ चारच दिवसांसाठी मुंबईत आली आहे. शिवाय हिमाचलमधून येताना तिने कोरोना चाचणी केली होती. चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्यामुळेच तिला प्रवास करण्याची संमती देण्यात आली. त्यामुळे चार दिवसांसाठी मुंबईत आलेल्या कंगनाला मुंबई महापालिकेने क्वारंटाईनमधून आता सूट दिली आहे.

गेले काही दिवस शिवसेना –कंगनामध्ये सुरू असलेल्या शाब्दिक वादानंतर कंगनाचे मुंबईत येणं हे महत्त्वाचं ठरलं. मी ९ सप्टेंबरला मुंबईत येतेय मला आडवून दाखवा असे आव्हान तीने या आधीच केलं होतं. त्यामुळे कंगनाच्या मुंबईत येण्याकडे लक्ष लागले आहे. कंगना मुंबईत आली आणि तीने येताच पुन्हा एकदा एक व्हिडिओकरून ठाकरे सरकारवर टीका केली. त्यामुळे हा वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

कार्यालयाच्या बांधकामावर केलेली कारवाईनंतर कंगना चांगलीच संतापली आहे. मुंबईत आल्यामिनीटापासून तीने शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका सुरूच ठेवली आहे. आज पुन्हा एकदा ट्वीट करून तिनं उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. त्याचबरोबर आता कंगनाने आपला मोर्चा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांकडे वळवला आहे. कंगनाचा मुंबईतील खार परिसरातील डीबी ब्रीझ इमारतीमध्ये फ्लॅट आहे. या फ्लॅटला २०१८ मध्ये मुंबई महापालिकेने नोटीस बजावली होती. यासंदर्भात एका पत्रकाराने ट्विट केलं होतं. यावर उत्तर देताना कंगनाने शरद पवारांकडे बोट दाखवलं. ही इमारत शरद पवारांच्या भागीदाराने बांधल्याचा दावा कंगनाने केला आहे.


हे ही वाचा – बाळासाहेबांची विचारधारा सत्तेसाठी विकली, आणि ‘सोनिया’ सेना झाली – कंगना