घरमनोरंजनमेरा नंबर कब आयेगा

मेरा नंबर कब आयेगा

Subscribe

जानेवारी महिना उलटला की नाटक, चित्रपटासाठी काम करणार्‍या कलाकार, तंत्रज्ञ यांना वेध लागतात ते पुरस्कार सोहळ्यांचे. पहिलं , दुसरं बक्षीस नंतर फक्त नामांकनांमध्ये जरी आपल्या नावाचा समावेश झाला तर ते कलाकार, तंत्रज्ञ यांना हवे असते. कारण अशा प्रतिष्ठेच्या पुरस्कारांच्या यादीत वर्णी लागल्याने बर्‍याचशा कलाकारांचा मार्ग हा सुखकर झालेला आहे. सांगून पटायचे नाही, या पुरस्कार सोहळ्यात आपल्या नावाची नोंद घेतली जावी यासाठी बरेचसे निर्माते त्या कालावधीत नाटकाची निर्मिती करित असतात. महत्त्वाचं म्हणजे कलाकार, तंत्रज्ञसुद्धा या गोष्टीला वेळ देत असतात. झी चा पुरस्कार सोहळा झाला की सांस्कृतिक कलादर्पण याचे नाव पुढे येते आणि त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक विभागाकडूनही जोरदार तयारी सुरु होऊ लागते. अखिल भारतीय नाट्य परिषद, चित्रपट महामंडळ वेगळे पुरस्कार देतात. एकंदरीत काय तर मेरा नंबर कब आयेगा अशी चर्चा आता कलाकारांमध्ये रंगायला लागलेली आहे.

एखाद दुसरा निर्माता असतो त्याला त्याच्या कलाकृतीवर जबरदस्त विश्वास असतो. चित्रपट चालण्यासाठी कोणत्या स्पर्धेत सहभागी होण्याची तो तयारी दाखवत नाही. जे महाराष्ट्रात पुरस्कार सोहळे होतात, त्यात चित्रपटासाठी पन्नासच्या आसपास प्रवेशिका येत असतात. हेच चित्रपट अन्य ठिकाणीही सहभागी होत असतात. चित्रपट तेच असले तरी परिक्षक मात्र वेगवेगळे असल्याने कोणत्या चित्रपटाला कसा कौल मिळेल हे सांगता येणे कठीण आहे. झी मराठीने सर्वोत्कृष्ठ चित्रपटासाठी जे तीन चित्रपट निवडलेले आहेत त्यात नाळ,… आणि डॉक्टर काशिनाथ घाणेकर, पाणी या चित्रपटांचा अंतर्भाव आहे. मुख्य कार्यक्रमात कोणाची, कशी निवड होईल हे त्यावेळी उलगडणार आहे, परंतु यानिमित्ताने कलाकार, तंत्रज्ञ यांच्याबाबतीत नोंद घ्यावी अशी गोष्ट घडणार आहे.

सर्वोत्कृष्ठ नृत्य दिग्दर्शकाच्याबाबतीत मेनका-उर्वशी या चित्रपटाची निवड केलेली आहे. आजवर कोणत्याही गाण्याचे नृत्य दिग्दर्शन करायचे झाले तर एक किंवा दोन नृत्य दिग्दर्शक असतात, पण या चित्रपटाच्याबाबतीत पाच नृत्य दिग्दर्शक एकत्र आलेले आहेत. किशू पाल, उमेश जाधव, सुबोध आरेकर, प्राची शैलेश, प्रकाश घाडगे ही नावे प्रामुख्याने सांगता येतील. सर्वोत्कृष्ठ संगीतकार, गीतकार आणि गायिका यासाठी सायली खरेची निवड झालेली आहे. असा योग कोणा कलाकाराच्या वाट्याला फारसा येत नाही. सर्वोत्कृष्ठ गायकामध्ये अजय गोगावले याच्या नावाचासुद्धा समावेश आहे. स्वानंद किरकिरे गीतकार म्हणून परिचयाचे आहेत. या नामंकनांमध्ये मात्र सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याच्या यादीत चुंबकसाठी त्यांचे नाव निवडलेले आहे.

- Advertisement -

नाटक विभागासाठी जी पाच नाटके निवडलेली आहेत त्यात अ परफेक्ट मर्डर, सोयरे सकळ, चल तुझी सीट पक्की, दादा एक गुड न्यूज आहे, तीला काही सांगायचे आहे या नाटकांची निवड करण्यात आलेली आहे. नामांकनामध्ये पाच कलाकार, तंत्रज्ञ यांच्या नावाचा विचार झाल्यामुळे त्याचा पसाराही मोठा असणार आहे. नामांकनांमध्ये जी नावे घोषित झाली त्यात काही कलाकार, तंत्रज्ञ यांच्याबाबतीत थोडे वेगळे घडणार आहे. अभिनेत्री म्हणून परिचयाची असलेली मंगल केंकरे हिचे सर्वोत्कृष्ठ वेशभूषेसाठी नाव पुढे आलेले आहे. सर्वोत्कृष्ठ प्रकाश योजनेसाठी जी पाच नावे निवडलेली आहेत, त्यात शितल तळपदेचे दोन वेळा नाव आहे. असा योग त्याच्या वाट्याला बर्‍याचवेळा आलेला आहे. सर्वोत्कृष्ठ संगीताच्याबाबतीतही हेच सांगता येईल. जी पाच नाटके निवडलेली आहेत त्यातील तीन नाटके अजित परब याची आहेत.

प्रथमच हा योग त्याच्या वाट्याला आलेला आहे. वन्स मोअर, आमच्या हिचं प्रकरण, व्हाय सो गंभीर, गलती से मिस्टेक, एका लग्नाची पुढची गोष्ट यांची विनोदी नाटक म्हणून निवड करण्यात आलेली आहे. यास सेलिब्रिटी कलाकारांचा असलेला सहभाग लक्षात घेता हि नाटके बर्‍यापैकी प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलेली आहेत. बक्षीस मिळाल्याने प्रयोगाची संख्या आणखीन वाढणार आहे हे वेगळे सांगायला नको. सर्वोत्कृष्ठ सहाय्य अभिनेता म्हणून ज्या कलाकारांची नावे निवडलेली आहेत, त्यात तुझी सीट पक्की या नाटकासाठी किरण मानेची निवड करण्यात आलेली आहे. योगायोग म्हणजे हिच भूमिका सुरवातीला शरद पोंक्षे हा अभिनेता करत होता. गौरी इंगवले ही नवअभिनेत्री भाग्यवानच म्हणावी लागेल. पहिल्या पदार्पणातच सहाय्य अभिनेत्रीमध्ये तीच्या भूमिकेची दखल घेतली गेलेली आहे. मधल्या काळात ओवी या नाटकाचे प्रयोग थांबले होते. पुढे प्रयोग होणार की नाही या चिंतेत कलाकारांबरोबर प्रेक्षकवर्गही होता.

- Advertisement -

उमेश कामत आणि प्रिया बापट हे उभयते भाग्यवानच म्हणावे लागतील. उमेशची दादा एक गुड न्यूज आहे तर प्रियाची आम्ही दोघी या चित्रपटासाठी संभाव्य नामांकनात नोंद झालेली आहे. मकरंद देशपांडे याने पन्नासच्या आसपास हिंदी, इंग्रजी नाटके केलेली आहेत. एपिक गडबड हे प्रथम मराठी रंगभूमीवर आलेले त्याचे नाटक आहे. लक्षवेधी नाट्यकृती, अभिनेता, अभिनेत्री असे पुरस्कार या नाटकाला प्राप्त झालेले आहेत. या नाटकाच्या वेशभूषेसाठी मकरंद देशपांडे याचे नाव नामांकनामध्ये आहे. आरण्यक ही झी मराठी वाहिनीची निर्मिती आहे. विशेष परिक्षक पुरस्कार रत्नाकर मतकरी यांना देण्यात येणार आहे.

झी मराठी वाहिनीची गेल्या वीस वर्षांची वाटचाल आहे. पूर्वी एकत्रितपणे हा सोहळा आयोजित केले जात होता. बर्‍याचवेळा अशा सोहळ्याचे आयोजन स्टेडियम किंवा मोकळ्या मैदानात केले जात होते. पुढे वेळे अभावी हाच सोहळा आता दोन भागात केला जातो, तोही बंदिस्त नाटयगृाहात. यंदासुद्धा तो प्रयत्न होणार आहे. यानिमित्ताने झी मराठीच्या चाहत्यांना दोन वेगवेगळे सोहळे पहायला मिळतात. पूर्व तयारी म्हणून आणखीन एक कार्यक्रम झी मराठीच्यावतीने तयार करण्यात येतो, तो म्हणजे नामांकनांची घोषणा. हाही कार्यक्रम दर्जेदार, प्रभावी व्हावा यासाठी एक विषय घेतला जातो.

यंदा लक्षवेधी कपडे परिधान करा आणि स्पॉट लाईट मध्ये या असा काहीसा विषय सुचवला होता. त्यानिमित्ताने काही खेळ घेतले होते. अनिता दाते आणि अभिजित खांडकेकर यांच्या सूत्रसंचलनात प्रिया बापट, तेजश्री प्रधान, प्रसाद ओक, सिद्धार्थ जाधव सहभागी झाले होते. झी मराठीच्या सहकार्याने इडियटस हे नाटक रंगमंचावर येत आहे. सागर कारंडे, स्मीता तांबे यांचा सहभाग असलेल्या या नाटकाची झलक या सोहळ्यात सादर करण्यात आली. काजव्यांचा गाव, जरा समजून घ्या, चि. श्री. सौ. साखरे, तुका म्हणे, मिकी ही प्रायोगिक नाटके नामांकनांच्या यादीत आहेत. जंबा बम्बाबू या नाटकाची परिक्षकांनी विशेष शिफारस केलेली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -