घरफिचर्सआम्हाला कामावर येऊ द्या...

आम्हाला कामावर येऊ द्या…

Subscribe

घरकामगारांना मालक म्हणून नाही तर माणूस म्हणून मदतीचा हात देणे, आर्थिक मदत करणे, कमीत कमी सगळं स्थिरस्थावर होईपर्यंत आपल्या चुलीप्रमाणे त्यांचीही चूल पेटती राहील याची काळजी घेणे गरजेचे आहे. करोनाचा संसर्ग, कुटुंबाची सुरक्षा या सर्व गोष्टी जरी असल्या तरी यातून सुवर्णमध्य साधून अडचणीत आलेल्यांची मदत करणंही आपलं दायित्व आहे, हे विसरून चालणार नाही. यामुळे सवितामावशी, निता, अमिना यांसारख्या असंख्य घरकामगार महिलांचे कुटुंबही सुरक्षित राहील आणि यातूनच खरा माणूसकीचा धर्मही पाळला जाईल.

सकाळ सकाळी साडेपाचच्या सुमारास कामवाल्या सविता मावशींचा फोन आला आणि खडबडून जाग आली. करोनाच्या संसर्गाच्या दहशतीने सविता मावशींसह बिल्डींगमधील जवळजवळ सगळ्याच घरकामगार महिलांनी स्वत:हूनच १५ मार्चपासून काम करणं बंद केलं होत. त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे व करोनाच्या कहरामुळे तर कामवाल्या बायकांना आमच्याच नाही; पण कदाचित देशातील सगळ्याच इमारतींमध्ये नो एन्ट्री करण्यात आली. यामुळे या मधल्या तीन महिन्यात सविता मावशींचा मध्येच कधीतरी खुशाली विचारण्यासाठी फोन येत होता तर कधी मीही फोन करून चौकशी करत होतेच. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती पाहता पुढील तीन महिन्यांचा पगार अ‍ॅडवान्समध्ये गुगल पे केला होता, पण यादरम्यान एवढ्या सकाळी त्यांचा कधीच फोन आला नव्हता. यामुळे मोबाईल स्क्रीनवर त्यांचे नाव बघून थोडं दचकायला झालं. बोला मावशी काय झालं म्हणून विचारले असता, ताई मी आजपासून कामावर येऊ का, असा प्रश्न समोरून आला. दोन सेकंद मावशींना झालंय काय, वेड लागलंय की काय असा प्रश्न मनात आला. कारण अजूनही बिल्डींगमध्ये कामवाली बाईंना एन्ट्री नाही. हे जवळजवळ सगळ्याच कॉलनीने जाहीर केलं होतं. हे सगळ्यांनाच माहीत होतं; पण तरीही त्या असं का विचारत आहेत कळत नव्हतं. म्हणून काय झालं मावशी नीट सांगा असे विचारले. यावर या करुनाने मेलु तर. देणं चुकवल्याशिवाय जीव पण सुटणार नाय ताई. असं त्या म्हणाल्या. मावशींकडून असं काही ऐकायला मिळेल हे अपेक्षित नव्हतं. पण त्यामागची त्यांची अगतिकता व स्वाभिमानही जाणवला. नंतर त्यांच्याशी बोलून फोन ठेवला. एवढे दिवस घरकामगारांच्या प्रश्नांकडे फार गांभीर्याने बघितले नव्हते, पण मावशींमुळे काही नकळत दुर्लक्षित झालेल्या गोष्टींनी लक्ष वेधलं. त्यानंतर घरकामगारांसाठी स्वयंसेवी संस्था चालवणार्‍या आशिष या मित्राला फोन केला. वस्तुस्थितीची माहिती करून घेतली. त्याने काही बायकांचे नंबर दिले. प्रत्येकीने सांगितलेले अनुभव अंतर्मुख करण्याबरोबरच करोनाच्या कात्रीत सापडलेल्या प्रत्येकाच्या व्यथा सांगणारे होते.

करोनाचा कहर आणि त्यानंतर झालेल्या लॉकडाऊनमुळे सगळा देशच ठप्प झाला. त्यामुळे साहजीकच कामधंदे बंद. यामुळे अघोषित मंदीची लाट उसळली आणि कर्मचारी कपातीत अनेक जणांच्या नोकर्‍या गेल्या. यात गलेलठ्ठ पगार कमावणार्‍यांबरोबरच रोजंदारीवर काम करणारे व घराघरात धुणी भांडी करणार्‍या बायांच्याही हातची कामं गेली. त्यातही मुंबईसारख्या शहरात करोनाच्या संसर्गाचा स्फोट हा झोपडपट्टीत झाला. बहुतेक कामवाल्या बायका या याच वस्त्यांमध्ये राहत असल्याने सविता मावशींसारख्या अनेकांना संसर्गाच्या भीतीने बिल्डींगमध्ये नो एन्ट्री करण्यात आली आहे. यामुळे तीन महिन्यांपासून या बायका काम केव्हा सुरू होणार या प्रतीक्षेत आहेत, तर काही जणांनी या बायकांची आर्थिक परिस्थिती बघून त्यांना आगाऊ पगार देऊन मदतीचा हात दिला, पण किती दिवस अशाप्रकारे कोणी मदत करू शकेल हे देखील सांगता येऊ शकत नाही. कारण कोणाच्या नोकर्‍या गेल्या आहेत तर काही जणांचे पगार कापले जात आहेत. यामुळे आहे त्या जमा रकमेत प्रत्येकाला संसाराचा गाडा हाकलायचा आहे. त्यातच लॉकडाऊन थोडा शिथिल केल्याने सविता मावशींसारख्या घरकाम करणार्‍या बायकांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. मात्र, काही सोसायट्यांनी ५५ हून अधिक वय असलेल्या बायकांना कामावरच यायचे नाही असा नियम लावल्याने घरकामगार महिलाही बेकारीच्या घाईत ढकलल्या गेल्या आहेत. यातील काहीजणी ज्येष्ठ नागरिकांच्या घरी काम करणार्‍या असून स्वयंपाक करणे, झाडलोट करणे, बाहेरून सामान-औषधे आणून देण्याचे काम करत आहेत, पण करोनाचा संसर्गाचा धोका हा ज्येष्ठांनाच अधिक असल्याने ते दरवाजेही या बायांसाठी बंद करण्यात आले आहेत. याबद्दल बोलताना अमिना शेख या ज्येष्ठांचा सांभाळ करणार्‍या महिलेने सांगितले की गेल्या पंधरा वर्षांपासून मी गोरेगाव येथील एका वृद्ध जोडप्यांची देखभाल करत आहे. या जोडप्यांची मुलं परदेशात असल्याने त्यांची सर्वस्वी जबाबदारी माझी आहे, पण करोनामुळे आता त्यांच्या कुटुंबीयांनी मला येण्यास मनाई केली आहे. त्यांच्या घरी जाऊन राहणं मला शक्य नाही. कारण माझेही कुटुंब आहे. यामुळे सकाळी सहा ते रात्री नऊ पर्यंत मी त्यांच्याबरोबर असायचे; पण आता काम बंद आहे. पुढे काय होईल माहीत नाही, पण तेथे पगार बरा असल्याने मी कर्ज काढून मुलीचे लग्न केले, पण आता ते फेडायचे कसे या विचाराने माझी झोपच उडाली आहे. अशीच काही अवस्था सुनिताताईंची आहे. सुनिताताई या ५५ वर्षांच्या असून त्या घरोघरी जाऊन जेवण बनवतात, पण सध्या त्यांचेही काम बंद झाले आहे. कर्मचारी कपातीत मुलाचीही नोकरी गेल्याने मुंबई सोडून कायमचे गावी जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आह, पण तिथे जाऊन करायचं काय याचं चित्र मात्र अस्पष्ट आहे, तर एका घरात धुणीभांडी व बाळाची मालिश करणार्‍या नम्रताताईंना काहीच सुचेनासे झाले आहे. घरात आजारी नवरा व अपंग मुलगी यांची जबाबदारी त्यांच्यावरच आहे. त्या ज्यांच्याकडे काम करत होत्या त्यांनी त्यांची परिस्थिती बघून त्यांना आगाऊ पगार दिला, पण अजूनही ते पुढे देतीलच हे सांगता येत नाही. कारण करोनाचा संसर्ग तर सुरूच असल्याने सोसायट्यांमध्ये कामवाल्याबाईंना प्रवेश नाही. यामुळे पुढे काय करायचं हेच नम्रताताईंना सुचेनासे झाले आहे.

- Advertisement -

तशातच या बायकांना पगारही कमी असल्याने फारशी शिल्लकही उरलेली नाही. यामुळे भविष्य अंधारात जाताना दिसत असल्याचे अमिना यांनी सांगितले. याच पार्श्वभूमीवर शिल्पा या महिलेने सांगितले की डॉक्टरकडे जायलाही पैसे नाहीत. असं काही होईल याचा विचारही कधी स्वप्नात केला नव्हता. यामुळे फेब्रुवारी महिन्यात मुलाचा पहिला वाढदिवस दणक्यात साजरा केला. नाहीतर तो पैसा जपून ठेवला असता. आता तर कामही बंद आहे. नवराही दारुडा आहे. कामधंदा करत नाही. सोसायट्यांनी आमचा विचार करायला हवा आणि आमची टेस्ट करून आम्हाला कामावर येऊ द्यावं, असं म्हटलं आहे. अंधेरीतील निताताई आईसह चार बंगल्यातील काही इमारतींमध्ये जेवणापासून धुणीभांडीचे काम करतात; पण लॉकडाऊनमध्ये काम थांबलं. त्यातच गेल्याच महिन्यात आईचं निधन झालं. नवर्‍यापासून विभक्त झाल्याने आता दोन्ही मुलींची जबाबदारी शकुंतलावर आहे. लॉकडाऊन संपल्यानंतर कामावर बोलवू, असं लोकांनी सांगितल्याने त्या सध्या लॉकडाऊन कधी संपतो याची वाट पाहत आहेत.

तर काही ठिकाणी सोसायट्यांनी करोनाच्या संसर्गाच्या भीतीने पुढील काही महिने बाहेरील व्यक्तींना इमारतीत प्रवेश नाकारला आहे. यामुळे अनेकजणी बेकार झाल्या आहेत. यामुळे अशा सोसायट्यांनी बिल्डींगच्या गेटवर प्रत्येकाची टेस्ट करावी व प्रवेश द्यावा. अशी मागणी असल्याचे घरकामगार महिलांसाठी काम करणार्‍या नॅशनल डोमेस्टिक वर्कर्स वेल्फेअर ट्रस्टचे आशिष शिगवण यांनी सांगितले. दरम्यान, करोनाची दहशत अजून किती काळ असेल हे त्यावरील लसीचे संशोधन यशस्वी होण्यावरच अवलंबून आहे. यामुळे त्यादरम्यानच्या या काळात घरकामगारांना मालक म्हणून नाही तर माणूस म्हणून मदतीचा हात देणे, आर्थिक मदत करणे, कमीत कमी सगळं स्थिरस्थावर होईपर्यंत आपल्या चुलीप्रमाणे त्यांचीही चूल पेटती राहील याची काळजी घेणे गरजेचे आहे. करोनाचा संसर्ग, कुटुंबाची सुरक्षा या सर्व गोष्टी जरी असल्या तरी यातून सुवर्णमध्य साधून अडचणीत आलेल्यांची मदत करणंही आपलं दायित्व आहे, हे विसरून चालणार नाही. यामुळे सवितामावशी, निता, अमिना यांसारख्या असंख्य घरकामगार महिलांचे कुटुंबही सुरक्षित राहील आणि यातूनच खरा माणुसकीचा धर्मही पाळला जाईल.

- Advertisement -

करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लॉकडाऊननंतर गृहनिर्माण संस्थांनी बाहेरच्यांना प्रवेशास बंदी घातली. यात घरकामगार, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, ड्रायव्हर व इतर कर्मचार्‍यांचा समावेश होता. पण गृहनिर्माण संस्था असे करू शकत नसल्याचे महाराष्ट्र सोसायटीज वेल्फेअर असोसिएशनने म्हटले आहे. त्यातच आता घरकामगार महिलांना कामावर ठेवायचे असल्यास त्यांना करोनाची लागण झाली नसल्याचा वैद्यकीय अहवाल सादर करावा लागेल, असा नियम काही गृहनिर्माण संस्थांनी केला आहे. यावर घरमालकांनीही अशा टेस्ट करून ते करोनाबाधित नाही असे वैद्यकीय प्रमाणपत्र दाखवायला हवे, अशी मागणी घरकामगार संघटनांनी केली आहे. करोना हा श्रीमंतांनी आणलेला आजार आहे. यात गरिबांचा काय दोष असा सवालही या संघटनांनी केला आहे.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -