‘बाई जरा दमानं घ्या’!

‘मी पुन्हा येणार’ असे परत परत सांगून मुख्यमंत्री न होता विरोधी पक्षनेतेपदावर समाधान मानवे लागल्यामुळे देवेंद्र फडणवीस जसे रोज शिवसेनेला पाण्यात पाहत आहेत, तसाच प्रकार त्यांची पत्नी अमृता यांचा सुरू असल्याचे दिसून येत आहे. त्यांचा जळफळाट पाहून ‘बाई जरा दमानं घ्या’, असा खोचक सल्ला मनसेच्या पुण्यातील नगरसेविका रुपाली पाटील-ठोंबरे यांनी त्यांना काही दिवसांपूर्वी दिला होता. तो किती खरा होता हे अमृता यांच्या रोजच्या मुक्ताफळांनी सिद्ध होत आहे. पूर्णवेळ राजकारणात उतरून त्यांनी अरेला कारे, असे उत्तर दिले असते, तर एकवेळ समजता येईल. थेट राजकारणात उतरून सरळ शिवसेनेवर हल्लाबोल करायचा. हाय काय, नाय काय. ‘ठाकरे नाव लावून ठाकरे होता येत नाही, हे बोलणार्‍या अमृता डोक्यावर पडल्या आहेत’, असा खोचक टोला ठोंबरे यांनी त्यावेळी लगावला होता.

Mumbai

ठाकरे आडनाव लावल्याने कुणी ठाकरे होत नाही. त्यासाठी सत्यवादी आणि तत्त्वनिष्ठ असावं लागतं- अमृता फडणवीस

कोषामध्ये राहणार्‍या अळीला आयुष्यातील मजा कधीच कळणार नाही. आदित्य ठाकरे, तुमच्या पूर्वजांनी आरामात विणलेल्या रेशमाच्या जीवावर वैभवात राहून भरभराट झाल्यासारखं आहे तुमचं आयुष्य. देवेंद्र फडणवीस तुमच्या संघर्षाचा मला अभिमान आहे. भाजपाच्या प्रत्येक कष्टकरी सदस्याचाही मला अभिमान आहे.- अमृता फडणवीस

17 सप्टेंबर 2019 ला पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अमृता फडणवीस यांनी त्यांचा उल्लेख ‘देशाचा पिता’ असा केला. त्यानंतर त्या सोशल मीडियावर प्रचंड ट्रोल झाल्या.

अगदी निवडणुकीचे निकाल लागल्यानंतरही अमृता फडणवीस यांनी केलेलं एक ट्वीट खूप चर्चेत आलं होतं. राज्यातील सत्ता स्थापनेच्या घडामोडींदरम्यान ‘पलट के आऊंगी, मौसम जरा बदलने दे’ अशी शायरी करत ‘मी पुन्हा येईन’ असं म्हटलं होतं.

अगदी काही दिवसांपूर्वी अमृता फडणवीस आणि शिवसेना नेत्यांमध्ये ट्विटरवरुन आरोप प्रत्यारोप झाले. औरंगाबादमध्ये शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी एक हजार झाडं तोडणार असल्याची माहिती समोर आल्यानंतर अमृता यांनी तातडीनं एक ट्वीट करत म्हटलं होतं, ढोंगीपणा हा आजार आहे. गेट वेल सून शिवसेना. झाडं तोडणं तुमच्या सोयीनुसार आहे. जर कमिशन मिळत असेल तर झाडं तोडायला परवानगी देणार. हे अक्षम्य पाप आहे.

देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हायच्या आधी अमृता फडणवीस यांना नागपूरच्या बाहेर कोणी ओळखत नव्हते आणि त्यांना तसे ओळखण्याची महाराष्ट्राला काही गरजही नव्हती. पण, फडणवीस मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर बसले आणि अमृता यांची विविध रूपे समोर आली. अ‍ॅक्सिस बँकेमध्ये व्हाईस प्रेसिडन्ट-कॉर्पोरेट हेड (वेस्ट इंडिया) या पदावर कार्यरत असणार्‍या अमृता या आपल्या बँकिंग कारकिर्दीसह गायिका, रॅम्प वॉकर, सेलिब्रिटी म्हणून प्रसिद्धीच्या झोतात आल्या. आतापर्यंत वर्षा बंगालच्या चार भिंतीच्या आड असलेल्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने प्रथमच आपली प्रतिमा बदलली, याचे पुरोगामी महाराष्ट्राने कौतुक केले. एखादी महिला आपल्या कर्तृत्वाने पुढे जात असेल तर त्याचे स्वागत करण्याची महाराष्ट्राची संस्कृती आहे. मात्र इतपर्यंत सारे ठीक आहे.

पण, अमृता यांनी गेल्या काही महिन्यांमध्ये भाजप महिला आघाडीच्या राज्य प्रमुख असल्यासारखी जी काही राजकीय मुक्ताफळे उधळली आहेत त्याने मती गुंग होण्याची वेळ आली आहे. भाजपच्या महिला आघाडी प्रमुखांना सोडा माधव भंडारी आणि केशव उपाध्ये या कसलेल्या भाजप प्रवक्त्यांनाही जमले नाही ते त्यांनी करून दाखवले आहे. मात्र हे आता अति होत चालले असून चहापेशा किटली गरम असल्यासारखा हा प्रकार आहे. थेट ठाकरे घराण्याचे पूर्वज काढण्यापर्यंत त्यांनी मजल मारली असून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांना रेशमी किडा म्हटले आहे. ‘मी पुन्हा येणार’ असे परत परत सांगून मुख्यमंत्री न होता विरोधी पक्षनेतेपदावर समाधान मानवे लागल्यामुळे देवेंद्र फडणवीस जसे रोज शिवसेनेला पाण्यात पाहत आहेत, तसाच प्रकार अमृता यांचा सुरू असल्याचे दिसून येते.

ही निकोप टीका नाही. हा जळफळाट आहे. हा प्रकार पाहून ‘बाई जरा दमानं घ्या’, असा खोचक सल्ला मनसेच्या पुण्यातील नगरसेविका रुपाली पाटील-ठोंबरे यांनी अमृता फडणवीस यांना काही दिवसांपूर्वी दिला होता. तो किती खरा होता हे अमृता यांच्या रोजच्या मुक्ताफळांनी सिद्ध होत आहे. पूर्णवेळ राजकारणात उतरून त्यांनी अरेला कारे असे, उत्तर दिले असते, तर एकवेळ समजता येईल. पण, राजकारणात यायचे नाही, मात्र समाजमाध्यमांवर राजकारण करून फुकटची प्रसिद्धी मिळवायची, हा द्राविडी प्राणायाम कशाला हवाय. थेट राजकारणात उतरून सरळ शिवसेनेवर हल्लाबोल करायचा. हाय काय, नाय काय. ‘ठाकरे नाव लावून ठाकरे होता येत नाही हे बोलणार्‍या अमृता डोक्यावर पडल्या आहेत’, असा खोचक टोला ठोंबरे यांनी त्यावेळी लगावला होता. मिसेस मुख्यमंत्री म्हणून मिरवून झाले असेल तर आता जरा भानावर या, असंही ठोंबरे यांनी पोस्टमध्ये म्हटलं होतं.

अमृता यांनी केलेल्या ट्विटबाबत देवेंद्र फडणवीस यांना त्यावेळी विचारण्यात आलं होतं. त्यावर ‘अमृता फडणवीस यांचे स्वतंत्र व्यक्तीमत्व असून त्यांना त्यांची मतं आहेत’, असं फडणवीस म्हणाले होते. फडणवीसांच्या या विधानाचाही रुपाली ठोंबरे यांनी फेसबुक पोस्टमधून समाचार घेताना ठोंबरे यांनी अमृता फडणवीस यांना राजकारणात येण्याचा सल्ला दिला होता. आजकाल एकापाठोपाठ वादग्रस्त वक्तव्य करणार्‍या अमृता यांच्यासाठी तो योग्य असाच आहे. उंटावर बसून शेळ्या हाकण्यात काही अर्थ नाही. हा प्रसिद्धी प्रपंच झाला. भाजप पक्ष जसा कायम प्रसिद्धीसाठी आसुसलेला असतो तसेच हे सारे आहे.

अमृता या मूळ नागपूरच्या. त्यांचे वडील शरद रानडे हे नेत्ररोगतज्ज्ञ असून चारुलता रानडे या स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. अमृता यांनी जी.एस.कॉलेज ऑफ कॉमर्स अ‍ॅण्ड इकॉनॉमिक्स मधून पदवी घेतली. त्यानंतर फायनान्स या विषयात एमबीए पूर्ण केलं. 2003 साली त्यांनी अ‍ॅक्सिस बँकेमध्ये एक्झिक्युटीव्ह कॅशिअर म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. सध्या त्या अ‍ॅक्सिस बँकेमध्ये व्हाईस प्रेसिडन्ट-कॉर्पोरेट हेड (वेस्ट इंडिया) या पदावर आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्या मुंबईत आल्या. त्यानंतर बँकिंगमधली आपली कारकीर्द सांभाळतानाच त्यांनी गायनातही आपलं करिअर घडवलं. अमिताभ बच्चन यांच्यासोबत केलेला अल्बम, प्रकाश झा यांच्या ‘जय गंगाजल’ या चित्रपटात गायलेलं गाणं, विविध कार्यक्रम असं गायनातलंही त्यांचं करिअर सुरू होतं. अगदी न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये त्यांनी रॅम्पवॉकही केला.

अनेक सामाजिक उपक्रमात त्यांनी भाग घेतला. मात्र टीकाकारांच्या मते अमृता यांना केवळ ‘मिसेस मुख्यमंत्री’ म्हणून प्रसिद्धी आणि संधी मिळत गेली. एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून इतर कोणाला एवढी मोठी प्रसिद्धी मिळाली असती का? असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला गेला. याशिवाय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासूनच अमृता फडणवीस यांना लोक ओळखायला लागले आहेत. ठाकरे कुटुंबीयांच्या चार पिढ्यांना लोक ओळखतात, असं महिला शिवसैनिकांचं म्हणणं आहे. फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी आक्रमकपणे कुणावर राजकीय हल्ले केले नाहीत. पण फडणवीसांचं मुख्यमंत्रीपद गेलं आणि अमृता अचानक आक्रमक झाल्या, असंच सध्याचं चित्र आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना अमृता यांनी मोदींना ‘राष्ट्रपिता’ म्हणून कहर केला होता. यावरून समाज माध्यमांच्या त्या टीकेच्या मोठ्या धनी झाल्या. तुम्ही कधी शाळेत गेला होता का? देशाचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आहेत. दुसरा कोणीही हा मान देण्याइतकं लायक नाही. कृपया भारताबद्दल आणि देशातल्या नेत्यांबद्दल थोडं वाचा, असा सल्लाही त्यांना देण्यात आला होता.

राजकीय हस्तक्षेप करणार्‍या अमृता फडणवीस यांना आवरा, असं पत्र आता शिवसेनेचे शेतकरी नेते किशोर तिवारी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांना लिहिलं आहे. अमृता यांच्यासह देवेंद्र यांनाही रोखायला हवे, असे या पत्रात तिवारी यांनी म्हटले आहे. देवेंद्र आणि अमृता फडणवीस या दोघांनाही राजकीय आगपाखड करण्यापासून आवरा. देवेंद्र आणि अमृता फडणवीस जी टीका करत आहेत त्यामुळे हिंदू पक्ष दुरावत असून ते जवळ येणं आणखी कठीण होतं आहे. निवडणूक निकालानंतर जी युती होऊ शकली नाही आणि भाजपाला सरकारबाहेर जावं लागलं हे देवेंद्र फडणवीस यांच्या अरेरावीमुळे झालं. देवेंद्र यांचा अतिआत्मविश्वास त्यांना नडला. अमृता यांना भाजपा हा पक्ष टेक ओव्हर करायचा आहे का? अमित शहा, नितीन गडकरी यांच्या पत्नी कुणावरही टीका करत नाहीत. सीतेने रावणाला शिव्या दिल्याचं ऐकिवात नाही. जे काही करायचं ते राम, लक्ष्मण आणि हनुमान यांनी केलं. अमृता फडणवीस यांच्या वर्तनामुळे 2024 मध्ये भाजपाला नुकसान होऊ शकतं, असे मुद्दे तिवारी यांनी या पत्रात मांडले आहेत.

महाराष्ट्राची सत्ता आपल्या हातातून गेली आहे, हे भाजपला चार महिन्यानंतरही पचनी पडलेले नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या प्रचंड महत्वाकांक्षी नेत्याला आणि अमृता यांना तर ते पचनी पडणे शक्य होईल असे दिसत नाही… अशा वेळी …

सत्ता का खेल तो चलेगा,
सरकारे आएगी, जाएगी,
पार्टीया बनेगी, बिगडेगी
मगर ये देश रहना चाहिए

हे 1999 मध्ये एका मताने भाजपचे 13 महिन्यांचे सरकार कोसळल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी संसदेत केलेले भाषण जरूर आठवते…