हातकागद : कृतीयुक्त शैक्षणिक उपक्रम

Mumbai

वेगवेगळ्या कामानिमित्त महाराष्ट्रातील शाळांना भेटी देणे होते. शाळा भेटीला गेलं की, साफसफाई, झाडलोट, काही ठिकाणी रांगोळी काढलेली, शाळेतील एखाद्या बोर्डावर स्वागताचे दोन शब्द लिहिलेले असतात. एखाद्या कोपर्‍यात मुलं आवारातील गोळा केलेल्या फुलापासून गुच्छ बनवत बसलेली असतात. कमी अधिक सर्वच शाळेत असंच असतं. ही गोष्ट आठ दहा वर्षांपूर्वीची आहे. एक दोन शाळा भेटून झाल्या होत्या. या दोन्ही शाळेत एक गोष्ट सारखी दिसली. ती म्हणजे शाळेच्या एका कोपर्‍यातून धूर निघत होता, एक-दोन सेवक तिथे काठीने कचरा त्या पेटलेल्या जाळात लोटीत होते. तिसर्‍या शाळेत हे असंच सुरू होतं. मुद्दाम शाळेच्या कार्यालयात न जाता थेट तिकडेच गेलो. तिथे असलेल्या सेवकांना विचारलं काय आहे हे? काय जाळताय तुम्ही? त्यातील एकजण ‘‘कोणीतरी पुण्याचे साहेब येणार आहेत, साफसफाई सुरू आहे’’. तो कोणीतरी साहेब मीच होतो. पर्यावरण शिक्षण केंद्र, पुणे तर्फे योजना अधिकारी म्हणून या शाळेत गेलो होतो.

मांस कमी व हाडे जास्त असलेला मी, त्यांना कोणत्याच अंगाने साहेब वाटत नव्हतो. त्यांना काही न सांगता विचारलं की, ‘‘हे जे तुम्ही जाळता त्यात काय काय असते?’’ त्यांनी सांगितलं, पाला-पाचोळा आणि पोरांच्या वह्या पुस्तकाचे कागद. त्यांना परत तपशीलात विचारलं, ‘‘साधारण किती कागद जाळला जात असेल’’? त्यांच्यातील एकजण म्हणाला, ‘‘भरपूर निघतं, काही रानात इकडं तिकडं उडून जातो आणि शाळेच्या आवारात इकडचा तिकडचा मिळून आठवड्याला एक पोतंभर निघतो’’. हे ऐकून मला खूप वाईट वाटलं. लहानपणी आई माझ्याकडून वापरून झालेल्या वह्या घ्यायची. त्या वह्याची पानं भिजवून, शिजवून त्यात थोड उदित पिट टाकायची. मग ते सारण बांबूच्या जाळीदार टोपलीला, सुपलीला सारवायची. ही सारवलेली टोपली आणि सुपली २०-२५ वर्षे टिकायची. शाळेत जाळल्या जाणार्‍या कागदाचा वापर असा कशासाठी तरी करता येईल का? याशिवाय इतर काही प्रकारे या कागदाचा विनियोग करता येईल का? असे एक ना अनेक प्रश्न माझ्या मनात येऊन गेले.

महाराष्ट्रात एकूण किती शाळा असतील, प्रत्येक शाळेत किती कागद असा जाळला किंवा फेकला जात असेल. अशी गणितं मी मांडायला सुरुवात केली. या शाळेमध्ये पर्यावरण विषयक वेगवेगळे उपक्रम राबविले जात होते. सर्व शाळांसाठी कागदासंबंधी काही उपक्रम देता येईल का? असा विचार केला. माझे मित्र सतिश आवटे यांच्याशी चर्चा केली. त्यांना कागदासंबंधी उपक्रम शाळेत घेण्याची कल्पना आवडली. त्यावर अभ्यासपूर्ण काही उपक्रम तयार करण्यास सांगितले. प्राथमिक वाचन करून पहिल्या वर्षी केवळ शाळेत कागद किती जमतो, कागदाचे मोजमाप, कागदाचे साठवणूक असेच काही उपक्रम दिले. दुसर्‍या वर्षी या साठवलेल्या कागदाचा लगदा करून हातकागद करण्यासंबंधीचा एक छानसा उपक्रम शाळांना देता आला. हातकागदाचा उपक्रम कसा घ्यायचं याबद्दल जवळपास शंभरएक शिक्षकांचे प्रशिक्षण केले. अनेक सोसायटीमध्ये, तरुण मंडळ, पर्यावरण विषयक काम करणार्‍या संस्था व कार्यकर्ते यांच्यासाठी हातकागद कसा बनवायचा यांचा एक कार्यशाळेचे मॉड्युल तयार केले. आतापर्यंत जवळपास दोनशे ठिकाणी हातकागद कार्यशाळा घेतल्या. हातकागद कार्यशाळेचा प्रतिसाद ध्यानात घेऊन पाँडेचेरी येतील आरोविले पेपर्समधून हातकागद विषयी विशेष प्रशिक्षण घेतले. या कार्यशाळेचे परिणाम म्हणून कागदाचा विवेकी व काळजीपूर्वक वापर, पुनर्वापर आणि हातकागद बनवून पुन्हा वापर या गोष्टी होऊ लागल्या आहेत.

कागदाचा शोध आणि कागदातील घटक
कागद बनवण्याचा पहिल्यांदा शोध इ.स. १०५ ला हान राजवटीच्या काळात चीनमध्ये लागला. याचा प्रसार चीनमधील युद्ध कैद्यांच्या मार्फत युरोप व जगभर झाला. चीन बाहेरील जगाला कागद बनविण्याच्या तंत्राची माहिती व्हायला आठवे शतक उजाडावे लागले. भारतात मोगल अंमल सुरू झाल्यावर सोळाव्या शतकात हातकागदाची निर्मिती होऊ लागली. या काळात कागद तयार करणे ही एक कला मानली जात असे. उत्तर भारतामध्ये त्यावेळी हातकागद बनविण्याचे ‘कागझीपुरे’ बरेच होते. कागद बनविणारे ‘कागझी’ भरपूर कमाई करीत. एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी भारतात कागद तयार करण्याचे कारखाने निघाल्याने हातकागद व्यवसायाला उतरती कळा लागली. तसेच हातकागदास लागणारा प्रमुख कच्चा माल भारतातून इंग्लंडला निर्यात होऊ लागल्याने विसाव्या शतकात निर्मिती झपाट्याने कमी होऊ लागली. उच्च दर्जाचे कागद बनविणारे बेकार झाले.

कागदाने मानवी जीवनाला खूप मोठे वळण दिले. संदेश पाठवणे, एखादी माहिती अनेक प्रतीमध्ये तयार करणे, पारंपरिक मौखिक ज्ञान लिहून ठेवणे यासाठी कागद खूप महत्त्वाचा आहे. आज संगणक युग आले असले तरीही कागदाचे महत्त्व कमी झाले असे नाही. हा बहुगुणी कागद तयार करण्यासाठी ऊर्जा, पाणी, मनुष्यबळ आणि झाडे लागतात. साधारणपणे एक टन कागद तयार करण्यासाठी अडीच टन बांबू किंवा १७ मोठी झाडे (किमान दहा वर्षांची) तोडावी लागतात. शिवाय २०,००० ते दोन लाख लिटर पाणी आणि ४१०० युनिट वीजही लागते. याशिवाय अनेक रसायने यंत्रसामुग्री इत्यादी गोष्टी आवश्यक आहेत. कर्नाटक, महाराष्ट्र आदी राज्यातील स्थानिक लोक आणि कागद कारखाना यांच्यामध्ये कागदासाठी लागणार्‍या लाकडावरून संघर्ष झाल्याचा इतिहास आहे. कर्नाटकमधील बंडीपुरचे बुरुड कैकाडी यांनी कागद कारखान्याच्या विरोधात तेव्हाचे कर्नाटकचे अर्थमंत्री मुरारजी घोरपडे यांना ऑफिसमध्ये कोंडून ठेवले होते. स्थानिक लोकांच्या उपजीविका आणि कागद कारखाना असा ते संघर्ष होता.

झाड हे पर्यावरणातील सर्वात महत्त्वाचे घटक मानले तर कागदासाठी मोठ्या प्रमाणावर झाडं तोडली जाणे ही चांगली बाब नाही. यासाठी कागदाचा वापर शहाणपणाने करणे महत्त्वाचे आहे. कागदाचा नेमका आणि कार्यक्षम वापर यासाठी शाळेतील शिक्षक यांनी पाठपुरावा केला पाहिजे. याशिवाय वापरून झालेला कागद संग्रही ठेवला पाहिजे. या वापरलेल्या कागदापासून पुन्हा हातकागद बनविता येतो. याबद्दलच विद्यार्थ्यांना कागदाचा उपक्रम द्यायला हवा.

महाराष्ट्रात खादी ग्रामोद्योगाचे अनेक हातकागद कारखाने होते. यापैकी काही कारखाने आज कसेबसे तग धरून आहेत. महत्त्वाची गोष्ट अशी की, वापरलेल्या कागदापासून पुन्हा असा कागद तयार करता येतो हे मला शालेय शिक्षण आणि उच्च शिक्षण घेऊनही माहीत झालं नव्हतं. ही परिस्थिती आजही खूप बदलली नाही. शालेय शिक्षणात कागद हा अतिशय महत्त्वाचा घटक असतो. या घटकाविषयी विद्यार्थ्यांना माहिती असू नये? अलीकडील पाठ्यपुस्तक पाहिले, त्यामध्ये सहावीच्या हिंदी पुस्तकात कागज नावाचे एक प्रकरण आहे. त्यामध्येही खूपच जुजबी माहिती दिलेली आहे. कागद निर्मिती, कागदाचे वेगवेगळे वापर, पुनर्वापर ही कौशल्याची बाब आहे. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यामध्ये कौशल्य विकास होणे खूप महत्त्वाची बाब आहे. आज ज्ञानरचनावादी शिक्षण, कृतीशील शिक्षण या नावाखाली या गोष्टी जाणीवपूर्वक पुढे आणल्या जात आहेत. मात्र यांचा अवकाश मर्यादितच आहे.

हातकागद कार्यशाळेत काय असतं
या कार्यशाळेत, कागदाचा निर्मितीचा थोडक्यात इतिहास, कागदाचा शोध लागण्यापूर्वी लोकांचे जीवन, कागद बनविण्याच्या ज्ञानाचा आणि तंत्रज्ञानाचा जगभर कसा प्रवास झाला? भारतात कागद कसा आला? याबद्दलच्या अनेक रंजक गोष्टी, कागद बनविताना नेमकं काय काय किती प्रमाणात लागतं, कागदाचे वेगवेगळे उपयोग हे कार्यशाळेच्या पहिल्या भागात असतं. दुसर्‍या भागात शाळेत जमा होणार्‍या कागदाचे नेमकं काय काय करता येतं? लिहून झालेला, चोळामोळा झालेला, फाटलेला कागद वापरून त्यापासून पुन्हा कागद कसा तयार करता येईल? हे प्रत्यक्ष कृतीतून शिकवले जाते. सहभागी विद्यार्थी, कार्यकर्ते आपापले कागद बनवून सोबत घेऊन जातात. स्वतः बनवलेले कागद हातात घेतल्यानंतर सहभागींच्या चेहर्‍यावर जो आनंद असतो, तो आनंद हा खर्‍या अर्थाने या कार्यशाळेची फलश्रुती असते.

नुसताच कागद हा नसतो कागद
कागदात असते पाणी
कागदात असतात झाडे, झुडपे, गवत
कागदात असते वीज
आणि कागदात असतात माणसांचे काबाड कष्ट
जेव्हा आपण कागद फाडतो, फेकतो, जळतो
तेव्हा हे सगळेच होते नष्ट

हातकागद उपक्रम करताना मुलं इतिहास शिकतात, कागद नसलेल्या काळातील लोकजीवन, त्यांचे संदेश देण्याच्या माध्यम आणि पद्धती, तंत्रज्ञान एका देशातून दुसर्‍या देशात कसं गेलं यातून देशाच्या सीमारेषा, कागद बनविण्याचे तंत्र यामध्ये विज्ञानातील बर्‍याच संकल्पना तपासून पाहता येतात. वापरलेल्या कागदामधील सेल्यूलोज किंवा तंतू कसे वेगळे करायचे, सेल्युलोज म्हणजे काय? कागदाचे वेगवेगळे आकार, कागदाचे वापरानुसार बनविलेले प्रकार, प्रकारानुसार त्यामध्ये वापरलेले वेगवेगळे साहित्य या सर्व गोष्टी विद्यार्थ्यांना या कागद उपक्रमाच्या माध्यमातून सांगता येतील. कागदामुळे आपल्या परिसरातील कोणती व किती झाडे तोडली जातात याचा आढावा घेतला जात असल्याने परिसराचा अभ्यास होतो. यामध्ये अनेक मोजमापे करून बघायची असल्याने गणितातील वेगवेळ्या संकल्पना वापरल्या जातात. गांधीजींच्या नई तालीम शिक्षण पद्धतीप्रमाणे यामध्ये मन, मेंदू आणि मनगट असं सर्वच वापरलं जातं त्यामुळे शिक्षण हे प्रभावी होतं.
हातकागद कार्यशाळेसाठी संपर्क : ९४२ २२० ५९२९

-बसवंत विठाबाई बाबाराव : (लेखक ‘पर्यावरण शिक्षण’ विषयाचे अभ्यासक असून, पर्यावरण शिक्षण केंद्र, पुणे संस्थेत कार्यरत आहेत.)