घरफिचर्सपुस्तक परिक्षण: अस्तित्वाच्या शोधात असलेली 'प्रतीक्षा'

पुस्तक परिक्षण: अस्तित्वाच्या शोधात असलेली ‘प्रतीक्षा’

Subscribe

तरुण लेखिका शिल्पा गंजी यांचे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक म्हणजे “प्रतीक्षा”… मुखपृष्ठा पासूनच आपल्या मनात उत्सुकता निर्माण होते, कारण छोटी मुलगी पाठमोरी उभी. जस जसे आपण त्या मुलीच्या भावविश्वात डोकावत जातो आपण सुद्धा तिच्या दुखऱ्या वेदना जाणवून अस्वस्थ होतो. तिच्या पाठमोरी आकृतीकडे पाहून व्यवस्थेकडून नाकारली गेल्याची कल्पना येते.

प्रतीक्षा एका संपन्न घराच्या कुशीत वाढत असताना तिच्या अंगभूत चौकस बुद्धी नुसार तिला आपल्या अस्तित्वाचा एखादा भाग सतत अपूर्ण असल्याचे जाणवते. ही हुरहूर तिला वयाच्या एकविसाव्या वर्षापर्यंत अस्वस्थ करीत असते. दरम्यान तिला पडणाऱ्या प्रश्नांना आई-बाबा काही तरी उत्तर देत तिला शांत करतात. पण अजून काहीतरी वेगळं आहे, ही भावना तिला सतत जाणवत असते.

- Advertisement -

लेखिका आपल्याला एक अशा जगात घेऊन जाते, ज्याची आपण खात्या पित्या घरची माणसे विचार सुद्धा करू शकत नाही. अनाथ असणे, अस्तित्व सिद्ध करण्यासाठी एकटीच धडपड, अशा दुष्ट चक्रात अडकलेल्या नायिकेला, धड नशिबात असलेले भौतिक सुख आणि मिळत असलेले प्रेम सुद्धा स्विकारणे जड जाते. आपले एकटे पण सांभाळून, आपल्या कामात अव्वल असून सुद्धा ती आपले मूळ शोधण्याचा निरंतर आटापिटा करतच रहाते.

शेवटी तिची प्रतीक्षा सफल होते की नाही.. या तिच्या एकाकी प्रवासात वाचकांना बरोबर घेऊन लेखिका कोणत्या कोणत्या प्रदेशात घेऊन जाते? “अशा मुली म्हणजे काय?” माझ्या जन्माचा काही ठावठिकाणा नाही… पण मी आहे ना. माझं स्वतः च अस्तित्व आहे ना, त्याला काही अर्थ नाही का? निव्वळ मी कुणाच्या पोटी जन्म घेतला हे माहीत नसल्याने माझे आईवडील कोण आहेत, हे माहीत नसल्यामुळे, मी अशी तशी मुलगी ठरते का? परिस्थिती ने माझं बालपण हिरावून घेतले. यात मी कुठे कमी आहे का? या हिंदोळ्यावर सतत स्वार असणाऱ्या नायिकेच्या साथीला तिचे मित्र मैत्रिणी बाबा असतात पण त्यांना सुद्धा ती सतत “असे का” या प्रश्नाने भंडावून सोडते.

- Advertisement -

प्रतीक्षाच्या मनातल्या या ‘का’ ला उत्तर नव्हते, आधीच एका वेदनेने ती कळवळत होती. तिच्या जखमेवर ची खपली या खवचट बोलण्याने परत खरवडून काढली आणि त्यातून भळभळत रक्त वहात होते. लेखिकेने प्रतीक्षाच्या मनोवस्थेला नेमक्या शब्दात मांडले आहे. या कादंबरीत ठिकठिकाणी याचा प्रत्यय येतो. कादंबरीच्या भाषेचा वापर, शैली आणि निवेदनात सुद्धा लेखिकेने समतोल साधला आहे. मोजक्या पात्रांचा वावर, सरकारी अनास्था, समाजिक कार्यकर्ते, पोलीसांचे अनुभव हे अगदी सामान्य माणसाला येणाऱ्या अनुभवाच्या जवळ जाणारे असल्याने ती कादंबरी जवळची वाटते.

‘प्रतीक्षा’च्या लेखिका शिल्पा गंजी यांचा तरुण लेखिका असा उल्लेख करावा लागेल. त्याचे कारण म्हणजे या कादंबरीत रेखाटलेले नायिकेचे बोल्ड रूप, तिची जीवन जगण्यासाठी आवश्यक धडपड ही आजच्या घडीला स्वतंत्र बाण्याने आयुष्याकडे बघणाऱ्या तरुण पिढीच्या जवळ जाणारी आहे. पण आपल्या एकटीच्या लढाईत ती सहृदय आप्तांना सामील करून घेत नाही, याचे थोडे वाईट वाटते. लेखिकेने आपल्या मनोगतात म्हटलंय ही माझी पहिलीच कादंबरी… परंतु तिच्या भाषेने, संशोधनाने तिने पहिलेपणा वर चांगलीच मात केली आहे. अर्थात तिची इतर लेखन प्रांतात मुशाफिरी चालू आहे. या कादंबरीचे स्वागत इंग्लिशमध्ये सुद्धा नक्कीच होईल. असा विश्वास आहे. पुस्तकाची प्रस्तावना सिद्धहस्त लेखिका गिरिजा कीर यांनी केली आहे आणि प्रकाशक अरविंद जोशी यांनी देखणी बांधणी केली आहे. मुखपृष्ठ अमोल मट कर यांनी सजवले असून किमंत फक्त १७५ रुपये आहे. वाचक नक्कीच या कथानकात गुंतून जातो. हे लेखिकेचे यश आहे. आगामी कलाकृती साठी आता आशा वाढल्या आहेत.


लेखिका चित्रा अविनाश नानिवडेकर यांनी प्रतीक्षा ही कांदबरी वाचल्यानंतर त्यांचे अनुभव कथन केले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -