घरमहाराष्ट्रनाशिकपरस्परावलंबी तत्वावरील वर्तुळ पूर्ण

परस्परावलंबी तत्वावरील वर्तुळ पूर्ण

Subscribe

बाळासाहेबांच्या काळातील शिवसेनेत केवळ प्रवेशण्याची संधी असायची, बाहेर पडायचे असेल तर त्याचा ‘खोपकर’ करण्याची भाषा करणारी शिवसेना आता पुरती बदलल्याचेही यानिमित्त अधोरेखित झाले. महाले यांच्या शिवसेना पुनर्प्रवेशाने दिंडोरीच्या राजकारणात कोणते आयाम आकारास येतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे...

सात महिन्यांपूर्वी मनगटावरील शिवबंधन सोडून राष्ट्रवादीचे घड्याळ बांधणाऱ्या दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांनी शिवसेनेत पुनर्प्रवेश करून एक राजकीय वर्तुळ पूर्ण केले. महालेंना आमदारकीचे पुन्हा ‘लेबल’ लावायचे असल्याने त्यांना पक्षाची आणि पक्षाला ‘इलेक्टिव मेरिट’ असलेल्या चेहऱ्याची गरज असल्याच्या परस्परावलंबी तत्वावर हे वर्तुळ पूर्ण झाल्याचा निष्कर्ष काढता येईल. शिवाय, कधीकाळी कडव्या शिस्तीच्या शिवसेनेसारख्या पक्षात जाये करणाऱ्यांना आता कवाडं खुली असल्याचेही आता अधिक स्पष्ट झाले आहे. बाळासाहेबांच्या काळातील शिवसेनेत केवळ प्रवेशण्याची संधी असायची, बाहेर पडायचे असेल तर त्याचा ‘खोपकर’ करण्याची भाषा करणारी शिवसेना आता पुरती बदलल्याचेही यानिमित्त अधोरेखित झाले. महाले यांच्या शिवसेना पुनर्प्रवेशाने दिंडोरीच्या राजकारणात कोणते आयाम आकारास येतात, हे पाहणे रंजक ठरणार आहे

निवडणूक हंगाम उंबरठ्यावर असल्याने बाशिंगवीरांची लगबग सुरू आहे. आयारामगयाराम आपापली राजकीय सोय लावण्यात व्यस्त आहेत. खरे तर हा ‘ट्रेलर’ आहे. अजून सिनेमा बाकी आहे म्हणायचा. अशाच परवाच्या घडामोडीत दिंडोरीचे माजी आमदार धनराज महाले यांनी पुन्हा शिवबंधनात अडकण्याचा निर्णय घेतला. सातच महिन्यांपूर्वी खासदारकीची महत्वाकांक्षा बाळगून असलेल्या महाले यांनी शिवबंधन त्यागून मनगटी राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ बांधण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, मोदी त्सुनामीत राष्ट्रवादीच्या घड्याळ्यांच्या काट्यांची पुरती वाताहत झाली आणि महालेंचे स्वप्न भंगले. आता विधानसभा निवडणूक तोंडावर असताना महालेंना आमदारकीचे वेध लागले आणि त्यांनी शिवसेनेचा रस्ता धरला. महाले यांच्या म्हणण्यानुसार त्यांना थेट ‘मातोश्री’ने आवतण दिल्याने आपण शिवबंधन बांधण्याची दुसरी ‘इनिंग’ खेळलो. वस्तुस्थिती महाले आणि पक्षच जाणो. निश्चितच महाले यांनी दिंडोरीसारख्या आदिवासीबहुल मतदारसंघात शिवसेनेची बांधणी करून पक्षाला सबलता मिळवून दिली. या मतदारसंघात ते आमदारही राहिले आहेत. तथापि, महाले यांना लोकसभा निवडणूकीत मिळालेले सत्तावीस हजारांचे मताधिक्य हा त्यांच्या वैयक्तिक प्रभावाचा भाग होता की पक्षाचा, हा संशोधनाचा भाग आहे. नेमकी या मताधिक्याची भुरळ शिवसेना नेतृत्वाला तर पडली नाही ना, जेणेकरून महालेच आपला चेहरा असावा, अशा विचाराने त्यांना पुनर्प्रवेश देण्यात आला?

- Advertisement -

धर्मनिरपेक्ष विचारसरणीशी आजीवन बांधील राहिलेल्या हरीभाऊ महाले यांचे सुपुत्र असलेल्या धनराज महाले यांनी शिवसेना ते शिवसेना.. व्हाया राष्ट्रवादी काँगेस असे राजकीय वर्तुळ पूर्ण केले. महाले यांच्या सोडचिठ्ठीने शिवसेनेला जसा फार फरक पडला नव्हता तसा तो आता राष्ट्रवादीला पडण्याचीही शक्यता नाही. म्हणूनच महालेंच्या जाण्याने राष्ट्रवादीऐवजी धक्का बसला असेल तो शिवसेनेतील स्वकीयांनाच. दिंडोरी मतदारसंघासाठी शिवसेना उमेदवार म्हणून गेल्या दोन वर्षांपासून तयारीत असलेल्या भास्कर गावीत यांच्या स्वप्नाला महालेंमुळे सुरूंग लागणार आहे. याशिवाय, शिवसेना प्रवेशाच्या उंबरठ्यावर असलेल्या माजी आमदार रामदास चारोस्कर यांनाही आता माघारी जाण्याशिवाय गत्यंतर नाही. महाले यांच्या असंतुलित भूमिकेमुळे तळ्यातमळ्यात राहिलेल्या विद्यमान आमदार नरहरी झिरवाळ यांनाही आता हायसे वाटून पक्ष आपल्यालाच उमेदवारी देईल, असा विश्वास निर्माण झाला असावा. मूळात, महाले यांनी लोकसभा निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय राजकीयदृष्ट्या व्यवहार्य होता का, असा प्रश्न आहे. राजकारणातील स्वप्न बाळगताना वस्तुस्थितीवर पांघरूण घालण्याची चूक होऊ द्यायची नसते; तसे झाल्यास अवनती अटळ असते. महाले यांनी नेमकी हीच चूक केली. कारण डॉ. भारती पवार यांना ज्या मुद्द्यावर राष्ट्रवादीने तिकीट नाकारले, त्या मुद्द्यांच्या आधारे महालेंना उमेदवारी बहाल करून निकालावर परिणाम होणे अशक्यप्राय होते. महाले यांच्या तत्कालीन पक्षप्रवेशाने निष्ठावंत सैनिक जसे नाराज झाले होते, तशीच नाराजी राष्ट्रवादीतही उमटली होती. आताही महाले यांचा पक्ष पुनर्प्रवेश निष्ठावंतांच्या भावनांच्या ठिकऱ्या उडवणारा न ठरल्यास नवलच. नरहरी झिरवाळ यांचा पक्ष गटांगळ्या खाणारा असला तरी जमिनीवरचा माणूस म्हणून असलेली प्रतिमा त्यांना निवडणूकीत कौल प्राप्त करून देऊ शकतो. तुलनेत महाले यांच्याभोवती एकाच वेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या नाराजीचे किटाळ राहण्याची शक्यता आहे. बरं, अगदी टोकाचा विचार केला तर भाजप, शिवसेना स्वतंत्र लढले तरी त्याचा लाभ झिरवाळ यांनाच होण्याची अधिक शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेतृत्व महाले यांच्या प्रेमात पडण्यात व्यावहारिक दृष्टीकोनाची वाणवा जाणवल्याचे कोणी म्हटल्यास आश्चर्य नसावे.

राहिला प्रश्न पक्षनिष्ठेचा. तर कधीकाळी काँग्रेसला राजकीय धर्मशाळा म्हणून हिणवणाऱ्या शिवसेनेने आता त्याजागी स्वत:ला पाहिल्यास बरे होईल. बाळासाहेबांच्या काळातील शिवसेनेत केवळ प्रवेशण्याची संधी असायची, बाहेर पडायचे असेल तर त्याचा ‘खोपकर’ करण्याची भाषा करण्यात येई. आता शिवसेना पुरती बदलली आहे. बदलाच्या प्रक्रियेत पक्षशिस्त लोप पावली आहे. इथे येजा करणाऱ्याला कोणालाही आता दरवाजा सताड उघडा ठेवला जातो. एवढ्यात, शिवसेना प्रवेशावेळी प्रवेशकर्त्याच्या मनगटावर ‘शिवबंधन’ बांधले जाते. तथापि, ते सोयीनुरूप सोडण्याचे आणि हवे तेव्हा पुन्हा बांधण्याचा प्रघात कधीकाळी कडव्या शिस्तीच्या या पक्षात सुरू झाल्याने निष्ठावंत म्हणवल्या जाणाऱ्या सैनिकांत अस्वस्थता पसरणे स्वाभाविक आहे. येवल्याचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांच्यापाठोपाठ धनराज महाले यांनी शिवसेनेत पुनर्प्रवेश केला. या दोहोंच्या प्रवेशाने दोन्ही मतदारसंघात शिवसेना प्रबळ होते की नेमके काय, हे निवडणूक निकालातच अधोरेखित होईल. तथापि, प्रेम व युध्दानंतर राजकारणातही सारे काही माफ असण्याचे प्रमेय आता मूळ धरू लागले आहे. तत्वाधिष्ठित राजकारणाचा ढोल वाजवणारा भाजप सर्रास काँग्रेसमुक्तीची भाषा करीत मेगाभरती प्रक्रिया राबवतो, तर मग शिवसेनेने का मागे राहायचे असाही प्रतिवाद होऊ शकतो. अखेर या सगळ्या रगाड्यात जनताजनार्दनाला गृहीत धरण्याची चूक राजकारणी करतात, हे एवढ्यातल्या राजकीय घडामोडीत सिध्द झाले आहे. घोडामैदान जवळ आहे. विधानसभा निवडणूकीत महाले यांना पक्ष तिकीट देतो का आणि तसे झाले तरी जनतेचा कौल मिळवण्यात ते यशस्वी होतात का, हे पाहणे रंजक ठरणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -