घरफिचर्सपाणी ओसरले...पण उद्ध्वस्त झालेल्या संसाराचे काय?

पाणी ओसरले…पण उद्ध्वस्त झालेल्या संसाराचे काय?

Subscribe

महापुरामुळे कोल्हापूर आणि सांगलीतील शहरी आणि ग्रामीण भागाची परिस्थिती इतकी भयानक केली आहे की, आता राहायचे कुठे असा प्रश्न लोकांसमोर उभा राहिला आहे. मात्र या पूरग्रस्त लोकांना खरा आसरा दिला तो काही छोट्या मोठ्या सामाजिक संस्थांनी. या सामाजिक संस्थांनी जिथे सोय होईल तिथे रहिवाशांची राहण्याची व्यवस्था केली, एवढेच नाही तर त्यांना लागणार्‍या जीवनावश्यक वस्तूदेखील पुरवल्याने काही प्रमाणात या लोकांना दिलासा मिळाला. एकीकडे सामाजिक संस्था आणि मंडळाकडून मदत होत असताना सरकारी मदत मात्र तोकडीच पडत असल्याचे जाणवले. प्रामुख्याने ग्रामीण भागात फिरत असताना सरकार आणि राजकारण्यांबद्दल लोकांचा रोष दिसून येत होता. आता पाणी ओसरले आहे; पण उद्ध्वस्त झालेले संसार पुन्हा कसे उभे करायचे, असा भीषण प्रश्न या पूरग्रस्तांसमोर आ वासून उभा आहे. ‘आपलं महानगर’चे प्रतिनिधी सुशांत सावंत यांनी कोल्हापूर, सांगलीतील पूरग्रस्त भागांना प्रत्यक्ष भेट देऊन तयार केलेला हा ग्राऊंड रिपोर्ट.

भिंत खचली… चूल विझली… होते नव्हते गेले…कुसुमाग्रज यांच्या ‘कणा’ कवितेतल्या या ओळी. पण या ओळी आठवल्या की आता डोळ्यांसमोर चित्र उभे राहते ते कोल्हापूर आणि सांगलीत पुरामुळे उद्ध्वस्त झालेल्या संसाराचे.

आजवर ‘कणा’ कवितेतील या ओळी आठवताना पावसाने संसार उद्ध्वस्त झाल्यानंतर काय अवस्था असते याची आपण फक्त कल्पना करत होतो. पण आता प्रत्यक्षात त्याचा अनुभव घेतला. आठवड्यापूर्वी हसणारे, खेळणारे हे जिल्हे एका पावसाने जणूकाही शांत केले होते. जे कोल्हापूर आणि सांगली नेहमी गजबजलेले असायचे ते पुरामुळे पूर्णतः शांत दिसले. कुणी स्वप्नातही पाहिली नसेल अशी परिस्थिती सध्या या दोन्ही जिल्ह्यांची आहे. या दोन जिल्ह्यांना पावसाने झोडपून काढल्याने पूर नाही, महापूरच आला असे म्हणता येईल. या महापुरात अनेकांचे संसार उद्ध्वस्त तर झालेच; पण आता या जिल्ह्यातील लोकांना जगायचे तरी कसे असा प्रश्न पडू लागला आहे.

- Advertisement -

पाऊस कमी झाल्यानंतर कोल्हापूर, सांगली या भागात जाऊन तिथल्या परिस्थितीचा आढावा घेणारा ग्राऊंड रिपोर्ट करावा हे मनात पक्कं करून मुंबईतून कोल्हापूरच्या दिशेने निघालो. निघताना प्रत्येक वेळी तिथल्या स्थानिकांशी आणि काही स्थानिक पत्रकारांकडून माहिती घेत होतो. पण बरेच जण सांगत होते कोल्हापूर आणि सांगलीमध्ये जाणे कठीण आहे. पण मला काहीही करून कोल्हापुरात पोहोचायचे होते. याच दरम्यान रस्त्यावर पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जाणारी अनेक वाहने दिसत होती. त्यातच कोल्हापूरच्या दिशेने जाणार्‍या महामार्गावर 50 ते 60 किलोमीटर अंतरावर अनेक मोठी वाहने थांबवून ठेवल्याने हायवेवर लांबच लांब रांगा लागल्या होत्या. माल वाहतूक करणार्‍या वाहनांच्या रांगा आठवडाभरापासून लागल्या होत्या. त्यामुळे या वाहन चालकांनी रस्त्यावर आपले स्टो पेटवून आपल्या पोटाची व्यवस्था केली होती.

पाणी कधी ओसरेल आणि आपण आपला माल कर्नाटकच्या दिशेने घेऊन कधी जाऊ अशी चिंता या सर्व वाहन चालकांना लागली होती. काही वाहने ही सोलापूर मार्गाने वळवली जात होती. पण प्रत्येक नाक्यानाक्यावर उभे असलेले पोलीस फक्त मदतीसाठी जाणार्‍या वाहनांना आणि पत्रकारांच्या गाड्यांना वाट मोकळी करून देत होते. असेच पत्रकार असल्याचे सांगत आम्ही आमची गाडी कशीबशी शिरोळच्या दिशेने घेतली. जसजशी आमची गाडी पुढे सरकत होती तशी रस्त्याच्या बाजूला असलेल्या घरांची अवस्था पाहून या महापुरामुळे किती मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असेल याचा अंदाज एव्हाना आम्हाला आला. आम्ही कसेबसे वाट काढत शिरोळपर्यंत पोहोचलो.

- Advertisement -

शिरोळमध्ये परिस्थिती तर भयानक होती. ज्या मार्गाने लोक नेहमी कोल्हापूरच्या दिशेने प्रवास करत होते तो मार्ग अक्षरशः पाण्याखाली गेला होता. हा महामार्ग नुसता पाण्याखालीच गेला नव्हता तर या महामार्गाच्या आजूबाजूला तीन ते साडेतीन फूट पाणी साचले होते. पाण्याचा प्रवाह इतका होता की कुणाची या पाण्यातून जाण्याची हिंमत नव्हती. या रस्त्याला लागून असलेली दुकाने पाण्याखाली गेली होती. त्यामध्ये हॉटेल्स, गाड्यांचे शो रूम यांचा समावेश होता. हे दृश्य पाहून हाच का तो रस्ता ज्या रस्त्याने नेहमी वाहनांची वर्दळ असते, असा प्रश्न सगळ्यांना पडला असावा. ही सर्व दृश्य पाहून यापुढे कोल्हापूरमध्ये जाणे कठीण आहे असेच वाटू लागले, पण आर्मी आणि एनडीआरएफच्या मदतीने कसाबसा बोटीतून कोल्हापूरला पोहोचलो. पण बोटीतून जाताना मनात एकच विचार आला जी माणसे गेला आठवडाभर इथे अडकली त्यांचे काय? त्यांना कसे कोल्हापुरात जाता येणार? या शिरोळ रस्त्यावर अडकलेल्या अनेकांच्या डोळ्यात आपल्या घरच्यांबद्दल आणि आपल्या घराचे काय झाले असेल ही चिंता दिसत होती.

मात्र ज्यांना खरंच कोल्हापूरमध्ये जाणे गरजेचे आहे त्यांच्या मदतीला आर्मीचे जवान आणि एनडीआरएफचे जवान धावून येत होते. पाण्याचा अंदाज घेऊनच हे जवान कधी बोटीने तर कधी आर्मीच्या गाडीतून लोकांना कोल्हापूरमध्ये सोडत होते. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये ग्रामीण आणि शहरी भागांना मोठ्या प्रमाणात पुराचा फटका बसला होता. ग्रामीण भागातील काही गावांमध्ये पाऊस ओसरल्यानंतरही 3 ते 4 फुटांपर्यंत पाणी असल्याने येथील नागरिकांची व्यवस्था हॉटेल्स, सरकारी कार्यालये तसेच कोल्हापूरच्या जिल्हा न्यायालयात करण्यात आली होती. कोल्हापूर जिल्हा न्यायालयात तर 75 हून अधिक कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले होते. मात्र स्थलांतरित करण्यात आलेल्या कुटुंबांच्या डोळ्यांत चिंता होती ती आपल्या संसाराचे काय झाले असेल याची. या लोकांशी बोलताना त्यांच्या डोळ्यात असणारी काळजी दिसत होती.

शहरी भाग असो वा ग्रामीण भाग दोन्ही भागांतील घरे असोत, दुकाने असोत वा सरकारी कार्यालये यांची पुरती वाट लागली होती. व्हीनस चौक, बुधवार पेठ यासारख्या शहरी भागातील दुकानांमध्ये तर पहिल्या मजल्यापर्यंत पाणी साचल्याने दुकानांचे तर नुकसान झाले होतेच; पण ऐन सणासुदीच्या काळात फटका बसल्याने दुकानदारही चिंतेत होते. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे पुरामुळे अक्षरशः रस्त्यावर चिखलाचे सामाज्य तर पसरले होतेच; पण इथे दुर्गंधीने कहर केला होता. कोल्हापूरमध्ये शहरातील तरुण साफसफाई करताना दिसत होते. कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यांत शुक्रवारी पाणी थोड्याफार प्रमाणात ओसरल्यानंतर मदतीला वेग आला. लष्कर, एनडीआरएफ, एसडीआरएफ, नौदल, जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी, सेवाभावी संस्था, सामाजिक कार्यकर्ते, वैद्यकीय पथके आणि स्थानिक नागरिक यांच्या मदतीने हे मदतकार्य सुरू होते.

सांगलीमध्ये भयाण परिस्थिती –
कोल्हापूरमधील ग्रामीण भाग आणि शहरी भागातील परिस्थिती तर भयानक होतीच, मात्र त्याहीपेक्षा भयानक परिस्थिती ही सांगली शहराची होती. सांगलीमधील कराडपासूनचा नदी काठचा भाग तसेच या शहरातील पलूस, मौजे डिग्रज, आंद्रे, कर्नाळा आणि ब्रह्मनाळ येथील परिस्थिती मात्र भयाण होती. सांगलीमधील प्रत्येक तालुक्यातील 10 ते 12 गावांना पुराचा फटका बसला आहे. यामध्ये ब्रह्मनाळमधील परिस्थिती तर भयानक होती. बोट उलटल्याने याच गावातील 17 जणांचा मृत्यू झाल्याने या गावावर भयानक शोककळा पसरली आहे. या गावातील प्रत्येक कुटुंब हे आता भीतीच्या छायेखाली जगत आहे. पुरादरम्यान या संपूर्ण गावात पाणी शिरले होते. त्यामुळे या गावातील लोकांना काय करायचे असा प्रश्न पडला होता. मात्र ज्या बोटीची क्षमता 18 जणांची होती त्यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त लोक बसल्याने ही दुर्घटना घडली आणि होत्याचे नव्हते झाले. मात्र दुर्घटना घडल्यानंतरही प्रशासनाची मदत मिळाली नाही, असे गावकर्‍यांनी बोलताना सांगितले.

जेव्हा या गावात पाणी भरले होते तेव्हा गावच्या सरपंचांनी बोटी मागितल्या होत्या, पण बोटी देऊ शकत नाही असे उत्तर या ग्रामस्थांना मिळाले. एवढेच नाही तर आपत्ती नंतरही प्रशासनाची कसलीही मदत या गावाला पोहोचलेली नसून शेजारच्या गावातील लोकांनी या गावाला मदत केली, असे काही ग्रामस्थांनी सांगितले. या गावात इतकी भयाण परिस्थिती होती की पाऊस ओसरून चार ते पाच दिवस झाले तरी गावातील घरांमध्ये गुडघाभर पाणी साचले होते. एवढेच नाही तर गावातील अनेक जनावरे पुरामध्ये मेल्यामुळे ओकारी आणणारी दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे गावातील अनेक कुटुंबे आपापल्या नातेवाईकांकडे राहण्यासाठी गेली होती. कोल्हापूर आणि सांगली या दोन्ही शहरांत पूर परिस्थितीमुळे पिण्याचे पाणी मिळणे मुश्किल झाले होते. त्यामुळेच पाणी, इंधनांसाठी लोकांच्या मोठमोठ्या रांगा पहायला मिळत आहेत. मात्र यावेळी यांच्या मदतीला धावून आल्या त्या सामाजिक संस्था. त्यांच्याकडून पाण्याच्या बाटल्या, खाद्यपदार्थ, कपडे पुरवण्याचे काम सुरू असल्याने त्यांच्या वाहनांसमोर मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या.

एवढेच नाही तर पेट्रोल-डिझेलही कमी प्रमाणात उपलब्ध असल्याने पेट्रोल पंपांवरही मोठ्या रांगा लागल्या होत्या. आजही या दोन्ही जिल्ह्यांची हीच परिस्थिती आहे. सांगली शहरामध्ये दुकानांमध्ये पाणी शिरल्याने दुकानांतील सामान पूर्णतः खराब झाले होते. किराणा मालाचे दुकान, कपड्यांची दुकाने यांना या पावसाचा सर्वाधिक फटका बसला. एवढेच नाही तर काही ज्वेलरीच्या दुकानांतील दागिने आणि चांदी या पावसाच्या पुरात वाहून गेली. कोल्हापूर असेल वा सांगलीचा ग्रामीण भाग असेल तो पूर्णतः अंधारात होता. कोल्हापूर शहरात तर महावितरणचे कार्यालय पाण्याखाली गेले होते. 2005 मध्ये या जिल्ह्यामध्ये पूर आला होता. पण यावेळचा पूर हा 2005 च्या तुलनेतही भयानक असल्याचे इथल्या ग्रामस्थांनी सांगितले.

2005 मध्ये पूर आला; पण त्या पुराचे पाणी ओसरायला वेळ लागला नाही. मात्र हा पूर इतका भयानक होता की असे होईल याचा अंदाज ना लोकांना आला ना सरकारला. सांगलीतला हा पूर इतका भीषण होता की सांगलीमधील ग्रामीण भागात अनेक घरे पाण्याखाली गेली होती. अनके घरांची पडझड तर झाली होतीच; पण शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. २००५ मध्ये पुराचा फटका बसला हे माहीत असूनही प्रशासनाने योग्य दखल न घेतल्याने या पुराचे रूपांतर महापुरात झाले,असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी २ ऑगस्टपासून अलमट्टी धरणातून पाण्याचा विसर्ग वाढावा यासाठी पाठपुरावा करत होते. परंतु कर्नाटक सरकारने त्याला योग्य प्रतिसाद न दिल्याने ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सरासरी विसर्ग हा अडीच लाख क्युसेक एवढाच राहिला.

मात्र जर राज्य सरकारने कर्नाटक सरकारशी बोलून १ ऑगस्टपासूनच अलमट्टीतील विसर्ग वाढवला असता आणि कृष्णा खोर्‍यातील धरणांमध्ये पुराच्या पाण्यासाठी जागा केली असती, तर ही भीषण परिस्थिती उद्भवली नसती. आता या भागातील पाऊस कमी होऊन पाणी ओसरायला सुरुवात होत असली तरी या भागात आता आरोग्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. मेलेली जनावरे, घाणीचे साम्राज्य यामुळे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये येत्या काळात साथीचे आजार बळावण्याची शक्यता आहे. या दृष्टीकोनातून आता पावले उचलण्याची खरी गरज आहे. विशेषतः ग्रामीण भागात आरोग्य शिबिरांवर भर देणे तितकेच महत्त्वाचे आहे. सध्या जी वैद्यकीय सेवासुविधा पुरवली जात आहे त्यामध्ये अधिक वाढ होण्याची गरज आहे. दरम्यान सध्या आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आरोग्य शिबीर वगळता एकही मोठे आरोग्य शिबीर इथे दिसत नाही.

मुंबई, पुणे, सातारा शहरांतून मदतीचे हात पुढे –

कोल्हापूर आणि सांगलीतील ग्रामीण भागांची आणि शहरी भागांची परिस्थिती इतकी भयानक होती की, आता राहायचे कुठे असा प्रश्न लोकांसमोर उभा राहिला होता. मात्र या पूरग्रस्त लोकांना खरा आसरा दिला तो काही छोट्या मोठ्या सामाजिक संस्थांनी. या सामाजिक संस्थानी जिथे सोय होईल तिथे रहिवाशांची राहण्याची व्यवस्था केली, एवढेच नाही तर त्यांना लागणार्‍या जीवनावश्यक वस्तूदेखील पुरवल्याने काही प्रमाणात या लोकांना दिलासा मिळाला. सकाळच्या नाश्त्यापासून ते रात्रीच्या जेवणापर्यंत सामाजिक संस्थांनी पूरग्रस्तांची काळजी घेतली होती. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मदतीसाठी पुढे सरसावणारे हात हे मुंबई, ठाणे, पुणे, सातारा शहरातील होते. यामध्ये सामाजिक संस्था असोत वा विविध मंडळे यांचा समावेश होता. कुणी अन्नधान्याची व्यवस्था करत होते, तर कुणी पाण्याची व्यवस्था करत होते.

अजूनही मदतीचा ओघ तसाच सुरू असून, मदतीसाठो अनेक हात पुढे सरसावत आहेत. एकीकडे सामाजिक संस्था आणि मंडळांकडून मदत होत असताना सरकारी मदत मात्र तोकडीच पडत असल्याचे जाणवले. प्रामुख्याने ग्रामीण भागात फिरत असताना सरकार आणि राजकारण्यांबद्दल लोकांचा रोष दिसून येत होता. सरकारकडून कोणतीच मदत मिळत नसल्याची प्रतिक्रिया अनेकांकडून व्यक्त होत होती. एवढेच नाही तर जे मृत झाले त्यांच्या नातेवाईकांना चार लाखांचा धनादेश देण्यापुढे हे सरकार गेले नसल्याची प्रतिक्रिया प्रामुख्याने मिळत होत्या. तर दुसरीकडे सामाजिक संस्था आणि मंडळांचे आभार मानतानाही लोक दिसत होते. एकंदरीतच ही भीषण अवस्था पाहिल्यानंतर पुन्हा असा पूर नको रे देवा, असेच म्हणावे लागेल. आता खरंतर पाणी ओसरले. मदतीचे हातही पुढे येऊ लागले आहेत, मात्र हेे नुकसान इतके प्रचंड आहे की, त्यामुळे अजून किमान 6 महिने तरी लोकांना सावरायला लागतील. त्यामुळे शेवटी एवढंच सांगणं आहे या लोकांच्या मागे आता सर्वांनी उभे राहण्याची गरज आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -