घरफिचर्सउन्मादाची शिक्षा!

उन्मादाची शिक्षा!

Subscribe

आयसीसी 19 वर्षांखालील वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील विजयानंतर बांगलादेश संघातील खेळाडूंनी केलेला उन्माद भयंकर होता. सभ्य माणसांचा खेळ समजल्या जाणार्‍या क्रिकेटमध्ये असे प्रकार या खेळाच्या लौकीकास छेद देणारे आहेत. अंतिम सामन्यानंतर झालेल्या धक्काबुक्की प्रकरणाची आंतरराष्ट्रीय क्रिकेट (आयसीसी)ने तत्काळ गंभीर दखल घेतली हे अतिशय चांगले काम केले. यामुळे युवा खेळाडूंना चांगला धडा मिळाला आहे. बेजबाबदार वागण्याची शिक्षा या वयातच खेळाडूंना देऊन आयसीसीने सर्वांनाच गंभीर इशारा दिला आहे. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, हे सुद्धा ही शिक्षा सांगून जाते. झाल्या प्रकाराबद्दल पाच खेळाडूंना दोषी ठरवण्यात आले असून या पाच खेळाडूंमध्ये दोघा भारतीयांचा देखील समावेश आहे. अंतिम सामन्यात भारतावर विजय मिळवल्यानंतर उत्साहाच्याभरात बांगलादेशी खेळाडूंना आपला आनंद खिलाडूवृत्तीने साजरा करता आला नाही. उत्साहाऐवजी उन्माद करत ते भारतीय खेळाडूंशी भिडले, सेलिब्रेशन करताना दोन्ही संघाच्या खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक झाली, ज्याचे रूपांतर धक्काबुक्कीत झाले. याबद्दल आयसीसीने बांगलादेशच्या मोहम्मद तौहीद, शमीम हुसैन आणि रकीबुल हसन, तर भारताच्या आकाश सिंह आणि रवी बिश्णोई यांना आयसीसीच्या आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवले असून पाच खेळाडू आणि संघाचे स्टाफ यांच्यावर आयसीसीच्या आचारसंहितेच्या लेव्हल 3 चे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. या सर्वांवर कलम 2.21 तर रवी बिश्णोईवर कलम 2.5 नुसार आरोप लावण्यात आले आहेत. या सर्व खेळाडू आणि स्टाफ यांनी त्यांची चूक मान्य केली आहे. भारतीय खेळाडू आकाश सिंहला 8 निलंबन गुण आणि 6 नकारात्मक गुण दिले गेले असून रवी बिश्णोईला 5 निलंबन गुण तर 5 नकारात्मक गुण दिले आहेत. बिश्णोईला सामन्यातील 25 व्या ओव्हरमध्ये दासला बाद केल्यानंतर केलेल्या जल्लोषाबद्दल शिक्षा सुनावली आहे, तर आकाशला धक्काबुक्की प्रकरणी दोषी ठरवले आहे. बांगलादेशच्या तौहीदला 10 निलंबन गुण आणि 6 नकारात्मक, शमीमला आठ निलंबन गुण तर हसनला 5 निलंबन गुण आणि 5 नकारात्मक गुण दिले आहेत. हे नकारात्मक गुण आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी देखील लागू होणार आहेत. एक निलंबन गुण म्हणजे एक वनडे, टी-20 अथवा 19 वर्षांखालील ए संघातून आंतरराष्ट्रीय सामना खेळण्यास बंदी होय. अंतिम सामन्याच्या पहिल्या षटकापासूनच बांगलादेशी खेळाडू आज काही तरी राडा करायचाच, या भावनेने मैदानात उतरले होते. भारतीय सलामीवीर जैस्वाल आणि सक्सेना यांनी डावाची सुरुवात सावध केली, पण फॉर्मात असलेली भारताची सलामीची जोडी आपल्याला घाबरली, असे समजून बांगलादेशचे जलदगती गोलंदाज शोरिफुल आणि शकीब यांनी त्यांच्या दिशेने रागाने बघत, अपशब्द वापरत सामन्याचा बेरंग करायला सुरुवात केली होती. प्रत्येक चेंडू टाकल्यानंतर जैस्वाल आणि सक्सेना यांच्या दिशेने येत त्यांनी जणू धमकावायला सुरुवात केली होती. पंचांनी बांगलादेशी गोलंदाजांना समजही दिली होती, पण उन्माद केला तरच आपण या सामन्यात सरस ठरू शकू, असे बांगलादेशी खेळाडू ठरवून आले होते की काय, अशीच त्यांची देहबोली होती. सामना संपल्यानंतर आकाश सिंहने बांगलादेशी खेळाडूंच्या अरे ला कारे उत्तर दिल्याचा अपवाद वगळता भारतीय खेळाडूंनी स्वतःवर खूप नियंत्रण मिळवले. अन्यथा बांगलादेशी खेळाडूंप्रमाणे तेही उन्माद करू लागले असते तर मैदानावर एकमेकांवर बॅट, स्टम्पने हल्लाही झाला असता. विजय मिळवल्यानंतर बांगलादेशी खेळाडू ड्रेसिंग रूममधून ज्या वेगाने मैदानावर धावत सुटले ते पाहता ते विजय साजरा करण्यासाठी आले आहेत की भारतीय खेळाडूंना धडा शिकवायला आले आहेत, हेच समजत नव्हते. याआधी भारताविरोधात पाकिस्तानचे खेळाडू असेच मुद्दामहून कळ काढल्यासारखे वागत असत. दोन देशांमधील तणाव मैदानातही दिसत असे. जीवन मरणाचा प्रश्न असल्यासारखे दोन्ही देशाचे खेळाडू सामान्यात खेळत असत. जणू काही धर्मयुद्ध असल्यासारखे सामन्याचे चित्र असे. जे चित्र मैदानावर तेच स्टेडियम आणि त्याच्या बाहेर दिसत असे. कामधाम सोडून दोन्ही देशांच्या लोकांचे लक्ष भारत-पाक सामन्यावर लागलेले असायचे. परिणामी आपल्या संघाची हार शेजारील देशाच्या क्रिकेटप्रेमींसाठी शान होत असे. पराभवानंतर पाकिस्तानात जणू मातम निर्माण होई आणि त्याचा परिणाम होऊन खेळाडूंचे पुतळे जाळण्यापासून ते या पुतळ्यांची गाढवावरून मिरवणूक काढण्यापर्यंत मजल जाई. हे कमी म्हणून की काय पाक खेळाडूंच्या घरांवर दगडफेकही होई. पराभवानंतर पाक खेळाडूंना मायदेशी परतणे म्हणजे जीवावर उदार होऊन आल्यासारखे वाटे. गेल्या काही वर्षात भारत-पाक दौरे बंद झाल्याने हे प्रकार बंद झाले आहेत. मुख्य म्हणजे भारत जागतिक क्रिकेटमध्ये पाकिस्तानपेक्षा किती तरी पुढे गेला आहे, हे वास्तव पाक क्रिकेटप्रेमींनी स्वीकारल्याने ‘रोज मरे त्याला कोण रडे’ असे समजून ते आता गप्प राहणे पसंत करतात.विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय लढतींमध्ये भारताविरुद्ध पाकिस्तानी खेळाडूंची देहबोली पूर्वीसारखी आक्रमक राहिलेली नाही. वर्ल्ड कपमध्ये दोघांत खेळीमेळीच्या वातावरणात सामने होताना दिसतात. हे बदलते चित्र खेळाच्या मैदानावर आश्वासक दिसत आहे. तसेच बांगलादेशी सिनियर क्रिकेटपटूही भारताविरोधात खेळताना खिलाडूवृत्तीनेच आतापर्यंत खेळत आलेले आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बांगलदेशला आपले पाय घट्ट रोवू देताना भारतीय क्रिकेट मंडळाने त्यांना नेहमीच मोठी मदत केली असून याची जाणही बांगलादेश संघाला आहे. मात्र, 19 वर्षांखालील वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात उलट चित्र दिसले. भारतीय खेळाडूंना डिवचल्याशिवाय आपल्याला विजय मिळणार नाही, असे जणू पढवून बांगलादेशी खेळाडूंना मैदानावर पाठवले होते. बांगलादेशचा कर्णधार अकबर अलीने सामन्यानंतर झाल्या प्रकाराबद्दल माफी मागितली असली तरी त्याने आपल्या खेळाडूंचा उन्माद सामन्याच्या पहिल्या चेंडूपासून रोखला असता तर सामना संपल्यानंतर धक्काबुक्की झाली नसती. हा प्रकार म्हणजे उन्मादाचा कळस होता. आता त्यांच्या तीन खेळाडूंना निलंबनाची झालेली शिक्षा ही योग्यच असून यामधून बांगलादेशचा युवा संघ नक्कीच धडा घेईल. शेवटी विजयही तुम्हाला पचवता आला पाहिजे!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -