दादा!

Mumbai

खरे तर दादा माझ्यापेक्षा वयाने लहान; पण सर्व खेळाडू त्याला दादा म्हणतात, म्हणून आम्ही सारे क्लब आणि संतोषशी आयुष्यभराशी जोडले गेलेलो त्याला दादाच म्हणतो. हाफ पॅन्ट, चुरगळलेले टी शर्ट, विस्कटलेले केस, दाढीचे खुंट आणि एका डोळ्याने दिसत नसूनही (एक डोळा निकामी झाला तो ट्रेनमधून खेळाडूंना सरावासाठी घेऊन जात असताना. बाहेरून आलेला एक दगड डोळ्यावर बसला. उपचार केले; पण तो आता काम करत नाही) मैदानावर एका कोपर्‍यात आपला उगवता गुणी खेळाडू जय मुंडे कसा सराव करतोय यावर बारीक लक्ष.

मुंबईची हद्द जिथे संपते आणि तीन दशकांपूर्वी पूर्ण गावठाण असलेल्या दहिसरला दोन चिरंतन गोष्टी उभारल्या गेल्या आणि त्या म्हणजे एक दहिसर विद्यामंदिर शाळा आणि दुसरी म्हणजे या शाळेचाच एक भाग असलेला व्हीपीएम स्पोर्ट्स क्लब. समाजात काही तरी चांगले उभे राहिले पाहिजे आणि ते उत्तम दर्जाने पुढे चालत राहावे, यासाठी आपल्या घरादाराबरोबर सामान्य माणसांचा विचार करणारी एक पिढी महाराष्ट्रात घडली. आज आपले राज्य प्रगत का आहे, याची मुळे या पिढीत आहेत. या पिढीचे पाईक असलेल्या प्रभाकर ठाकूर, सदाशिव परांजपे, रंजन सावंत, तरे परिवार आणि त्यांच्या सर्व संचालक मंडळ सहकार्‍यांनी विद्यामंदिर ही राज्यातील नामवंत शाळा उभी केली. या सार्‍यांच्या सोबतीने के. जी. शिंदे, सुहास शिंदे आणि संतोष आंब्रे या शाळेच्या माजी खेळाडूंनी मराठी माणसांना फार मोठा वारसा नसलेल्या अशा मैदानी खेळाचा अ‍ॅथेलेटिक्स खेळाचा (ऑलिम्पिकची जननी) क्लब घडवला… मुख्य म्हणजे अभ्यासाबरोबर मोकळ्या मैदानात मुलांचा श्वास तयार झाला पाहिजे, अभ्यासात मुले मागे पडली तर आयुष्याच्या मैदानात ती हरणार नाहीत याची काळजी घेण्यासाठी क्लबचा पाया रचला.

कॉन्व्हेंट शाळांच्या एक पाऊल पुढे टाकत आपला क्लब नावारूपाला आणला. हे सर्व करताना या सार्‍यांनी शाळेच्या भोवतीचे मैदान हे फक्त खेळासाठी राखीव ठेवले. मैदान, खेळाडू, सुजाण नागरिक, जाणते पालक आणि खेळाला पुढे नेणारी कार्यकर्त्यांची फळी उभी केली. शाळेच्या मदतीने हे उभे केले ते आपले सारे आयुष्य मैदानी खेळ आणि खेळाडूंच्या सर्वांगीण प्रगतीसाठी समर्पित करणार्‍या संतोष आंब्रे उर्फ दादाने.

खरे तर दादा माझ्यापेक्षा वयाने लहान; पण सर्व खेळाडू त्याला दादा म्हणतात, म्हणून आम्ही सारे क्लब आणि संतोषशी आयुष्यभराशी जोडले गेलेलो त्याला दादाच म्हणतो. हाफ पॅन्ट, चुरगळलेले टी शर्ट, विस्कटलेले केस, दाढीचे खुंट आणि एका डोळ्याने दिसत नसूनही (एक डोळा निकामी झाला तो ट्रेनमधून खेळाडूंना सरावासाठी घेऊन जात असताना. बाहेरून आलेला एक दगड डोळ्यावर बसला. उपचार केले; पण तो आता काम करत नाही) मैदानावर एका कोपर्‍यात आपला उगवता गुणी खेळाडू जय मुंडे कसा सराव करतोय यावर बारीक लक्ष.

हातात कधी काठी आणि ती नसली की हाताचा रपाठा पाठीत पडलाच समजा. तेही झाले नाही तर मग शब्दाचे फटकारे इतके चाबकासारखे पडले की तो खेळाडू तर गरगरला पाहिजे आणि पालकांचीही त्याच्या एका डोळ्यात डोळे वर करून बोलण्याची हिंमत होणार नाही, असा वचक. जबर शिस्त, वेळेचा पक्का आणि आपल्यासाठी म्हणून काहीच कमवायचे नाही, ही निरपेक्ष भावना या दादाच्या संन्यस्त वागण्याने या घडीला व्हिपीएम देशातील नामवंत अ‍ॅथेलेटिक्स क्लब म्हणून उभा आहे. क्लबचे खेळाडू राज्यात सरस तर आहेतच; पण राष्ट्रीय पातळीवर त्याचे नाव आहे आणि करण हेगिष्टे, पूर्णा रावराणे आणि रश्मी शेरेगर यासारखे खेळाडू आंतरराष्ट्रीय पदक विजेते खेळाडू म्हणून नावारूपाला येत आहेत. खेलो इंडिया स्पर्धेत देशातील टॉप स्प्रिंटर ठरलेला करणच्या गळ्यात आंतरराष्ट्रीय पदक मोठ्या रुबाबात चमकत आहे.

दादाने दोन डोळ्यांनी पाहिलेले स्वप्न आज फक्त त्याला एका डोळ्याने दिसत असताना पूर्ण होत आहे आणि त्याचा नैसर्गिक गोरागोमटा चेहरा आनंदाने फुलून जाताना तो आपले सारे आयुष्य सार्थकी लागल्याची भावना आपल्याला बोलून दाखवतो. दोन डोळे, दोन काचा आणि दोन खाचा, येथे प्रश्न कुठे येतो आसवांचा… असे कवी आरती प्रभू का सांगतात हे मी दादाच्या डोळ्यात अश्रू असतानाही आणि नसतानाही पाहिले आहे. प्रचंड प्रतिभावान असूनही आरती प्रभूंना जगण्यासाठी मोठा संघर्ष करावा लागला. लोकांनी त्यांना वेड्यात काढले; पण ते लिहीत राहिले, आपल्या वेदनेला अश्रूंना, कथा कादंबर्‍या, कवितेतून वाट करून देत राहिले. दादाच्या पदरी दुःख आले; पण त्याचा तुमच्या आमच्यासारखा बाऊ न करता त्याने ते मैदानावर वाहून टाकले… कोण मेले कुणासाठी रक्त ओकून, कशासाठी उतरावे तंबू ठोकून… जगतात येथे कोणी मनात कुढून तरी फुलतात गुलाब हे ताजे… या आरतींच्याच कवितेत दादाच्या आयुष्याचे सारे सार आहे.

कोकणातून मुंबईत पोट भरायला आलेल्या हजारो कुटुंबांपैकी एक असलेल्या आंब्रे कुटुंबातील दादाचे वडील सैन्यदलात नोकरीला. घरात आईबाबांसह पाच भावंडे, तीन भाऊ आणि दोन बहिणी. पण, सर्वात लहान असून दादा या सगळ्या भावंडांचा मोठा भाऊ. सगळ्यांसाठी सगळे करायचे; पण भावनिक न होता (असले तरी दाखवायचे नाही) कोणातच गुंतून राहायचे नाही, हा स्वभाव जन्मजात घेऊन तो आलेला. विद्यामंदिर शाळेत शिकत असताना खेळाची आवड निर्माण झाली. शिंदे आणि रंजन सावंत यांनी त्याच्यावर खेळाचे संस्कार केले आणि या संस्काराची शिदोरी घेऊन गेली साडेतीन दशके त्याचा खेळ आणि खेळाडूंना घडवण्याचा अथक प्रवास सुरू आहे. खोखोचा बरा खेळाडू असलेल्या दादाला याच खेळातील वेग आणि चपळतेने भुरळ घातली आणि खो देताना त्याच्यातील आतल्या आवाजाने त्याला अ‍ॅथेलेटिक्स प्रशिक्षकाच्या मार्गावर नेले… यातून जगायला काही पैसे मिळत नव्हते. मग सकाळच्या वेळेत मैदानाच्या जवळच्या डॉक्टरकडे पार्टटाइम नोकरी.

वडिलांच्या पेन्शनवर घर चालत असले तरी खाणारी सात तोंडे आणि वर दादाने खायचे वांदे म्हणून मैदानावरून घरी आणलेले तीन चार गरीब खेळाडू. हे एका दिवसाचे नाही तर वर्षाचे बारा महिने ठरलेले. वडील जिंदादिल माणूस आणि आई अन्नपूर्णा. स्वतः उपाशी राहतील; पण घरी उपाशी आलेला माणूस भरल्या पोटाने गेला पाहिजे, आनंदाचे झाड होऊन! दादाच्या घरातील पाच दिवसांच्या गणपतीत ही आनंदाची झाडे मोहरून येतात. दादासारखा प्रत्येकाला तो आपला गणपती वाटतो. पाच दिवस सकाळ-संध्याकाळ जेवणाच्या पंगती. आरती, धमाल, बैठे खेळ… आणि या सार्‍यात अदृश्य असलेली आपुलकी, जी कधीच पैशात विकत घेता येत नाही.

ती भरजरी श्रीमंतीचे खोटे आव आणत नाही… माणसाला माणूस म्हणून बनायला शिकवते. बँक बॅलन्स पलीकडे जाऊन आनंदाच्या ठेवी उभ्या करते! जो गुण दादात, तोच त्याच्या भावा बहिणीत. कायम हात वर. सतत दुसर्‍याला देण्याची वृत्ती. दादाच्या लालबागच्या बहिणीकडे होणारी उठबस पाहून तर मला नेहमी वाटते, हे आंब्रे कुटुंब कुठल्या तरी अज्ञात आनंदाचा झरा घेऊन जन्माला आले आहे. सतत हसरा चेहरा आणि तुमच्यासाठी नेहमी काही तरी करायला हवे ही आपुलकी… आता अशी माणसे शोधून सापडणार नाहीत. या हातांनी कधी मागितलेले मी तरी बघितले नाही… सतत ते देत राहिलेत.

दादाचे आज वडील नाहीत. भाऊ आणि बहिणी आपापल्या संसारात आहेत. आईचे वय झाले आणि दादाचे मैदान आणि मैदानी खेळाशी लग्न झाल्याने त्याने आयुष्याचा जोडीदार निवडला नाही. लग्न करून त्याला स्वतःला बांधून घ्यायचे नव्हते. आपल्या मनाप्रमाणे जगता आले पाहिजे, हा त्याचा कायम हट्ट राहिला आहे. लग्नबंधनात अडकून मैदानबंधाची गाठ त्याला सैल करायची नव्हती. त्याने हे सारे ठरवून केले. लग्न, सोहळे याची त्याला भीती वाटत असावी का, या प्रश्नाचे उत्तर मला मिळालेले नाही; पण आपल्या घरच्या कुठल्याच लग्नात तो कधी गेला नाही; पण त्याचे न दिसणारे प्रेम कायम सर्वांच्या पाठीशी असल्याचे मी सतत पाहत आलेलो आहे… असे जगावेगळे प्रेम कथा- कादंबर्‍यांतून दिसत असले तरी एक माणूस तसे जगताना आपण पाहतोय, याचा मला स्वतःला माणूस म्हणून पारखून घेताना खूप आनंद होतो…

आज शाळेच्या नोकरीत जी काही पुंजी मिळाली होती ती आपल्या आजूबाजूच्या म्हणजे आजी-माजी खेळाडूंच्या अडीअडचणीला फुंकून टाकली आहे. जगतोय, पण पुढे काय होईल याची त्याला काळजी नाही. दोन एक वर्षांपूर्वी त्याला मेंदूचा आजार झाला. आम्ही सगळे घाबरलो. क्लब आणि खेळाडू यांचा सतत विचार करताना उन्ह, पाऊस आणि थंडी याचा विचार न करता सकाळी पाच वाजता सुरू होणारा दादाचा दिवस रात्री संपतो. मेंदूत काही तरी गडबड चालली आहे, हे कळत असून त्याने अंगावर काढले आणि चक्कर येऊन पडला. त्याची अवस्था गंभीर होती; पण एका देव माणसासाठी डॉक्टर आदिल छागला देव होऊन उभा राहिला. तो आता बरा आहे; पण त्याला जीवाची काळजी नाही. जास्त ताण घेऊ नको, क्लब आणि खेळाडूंचा विचार करू नको, असे डॉक्टर सांगत असतानाही दादाचे पुन्हा मैदानावर त्याच तडफेने काम सुरू आहे. त्याला आम्ही सारे थांबवायचे म्हटले तरी तो ऐकणारा नाही.

नितीन फुटाणकर, गणेश गावडे, प्रमोद जाधव, उदय वैद्य, पिंटू आचार्य, सुधीर नाईकडे, विवेक संखे, भोईर, कांचन पवार हे सारे क्लब संघटक आणि महेश मुंडे, संदर्ष शेट्टी, हिरेन जोशी, आनंद जाधव हे प्रशिक्षक दादाचा खेळ आणि खेळाडू जगले पाहिजेत यासाठी ओढत असलेला जगन्नाथाच्या रथाला आपल्या परीने हातभार लावत आहेत. साडेतीन दशकांनंतर व्हिपीएम उभा आहे आणि तो राहणार आहे. या सार्‍यांच्या ताकदीच्या जोरावर… दादाच्या प्रेमळ स्वभावापलीकडे त्याचा हट्टीपणा कायम उफाळून येत असतो. यामुळे सोबतची माणसे आणि खेळाडू दुखावतात, निघून जातात असे बर्‍याचदा होते. त्याला आम्ही सारे रोखण्याचा प्रयत्न करतो; पण तो आपल्या मतावर ठाम असतो. त्याला क्लब मोठा वाटतो. तो म्हणतोही माणसे येतील, जातील, संस्था टिकली पाहिजे. आज भल्या भल्या संस्था, क्लब, मंडळे बंद होत असताना व्हिपीएम टिकून आहे, खेळाडू घडवण्याची फॅक्टरी सुरू आहे, याचे सारे सार दादाच्या या विचारात आहे.

दादा म्हणतो तसा क्लब टिकेल; पण पुढे म्हातारपणी दादाचे काय? त्याला बघणारे कोण असतील… क्लबच्या एका मिटिंगच्या आधी मी आणि तो दोघेच आधी आलो होतो… मी त्याच्या काळजात डोकावण्याचा प्रयत्न केला. अरे, दादा तू सारी पुंजी फुंकून टाकलीस. तुला बघणारे कोणी नंतर असणार नाही. तुझे काय होणार? आणि एका क्षणात विचार न करता दादा म्हणाला- साधे उत्तर आहे, सरळ झोपेच्या भरपूर गोळ्या घ्यायच्या आणि शांतपणे मरून जायचे. कोणावरही बोजा व्हायचे नाही. मी सुन्न झालो… माझ्या तोंडून पुढे एक शब्द बाहेर पडला नाही. आरतींची तीच कविता मनात वादळ उभी करत राहिली….

दीप जाती अंधारात विझून विरून
वृक्ष जाती अंधारात गोठून, झडून
जीवनाती घेती पैजा घोकून घोकून
म्हणती हे वेडे पीर तरी आम्ही राजे!