गयाराम देवाघरी गेला !

रेल्वे क्रॉसिंगच्या पलीकडून एक शवयात्रा येत होती. सिग्नल सुरू होणार होता. तेव्हा सिग्नलमन गयाराम कॅबिनमधील माणसाला म्हणाला, गाडी को रोक दो, गाडी तो आती जाती रहेगी, ओ तो दुनिया छोड के जा रहा हैं. उसे पहले जाने दो. गयारामचे असे हे वैचारिक डायलॉग मी नेहमी ऐकत असे. मला त्याच्याविषयी खूप कुतूहल वाटत असे. पण एक दिवस हा गयाराम रेल्वेची धडक लागून देवाघरी गेला.

Mumbai
Railway_Gatekeeper_
प्रातिनिधिक चित्र

मी त्यावेळी जोगेश्वरीतील इस्माईल युसुफ कॉलेजला जात असे. अंधेरी पश्चिमेला राहत असल्यामुळे मधल्या वाटेने कॉलेजला पोहोचण्याचे अंतर वॉकेबल होेते. त्यामुळे चालतच जात असे. अंबोलीतील चर्चजवळून डाव्या बाजूला पुढे गेल्यावर जोगेश्वरीला जाण्यासाठी रेल्वे फाटक ओलांडावे लागे. सिग्नल पडला की दांडा खाली येत असे. मग फाटक ओलांडणारे दोन्ही बाजूला थांबत असत. त्यातूनही काही धाडसी लोक दांड्याखालून घुसून क्रॉसिंग पार करत असत. तिथे उभा असलेला सिग्नलमन त्यांना आवाज देत विनवत असे. खुद को क्यू खतरे में डालते हो, जरा रुकनेसे तुम्हारा क्या बिघडने वाला हैं. अरे भाई जिंदगी ना मिलेगी दोबारा, राम के घर सब को जाना है, लेकीन इतनी जल्दी भी क्या हैं, घरवालों के बारे मे जरा सोचो, पण काहीजण त्याच्याकडे दुर्लक्ष करून रेल्वे क्रॉसिंग पार करत असत.

सिग्नलचा दांडा खाली असला की, समोरच्या रुळांवरून एक दोन रेल्वेगाड्या वेगाने धडधडत जात असत. तोपर्यंत दोन्ही बाजूला माणसे थांबलेली असत. गाड्या गेल्या की, सिग्नलवरचा दांडा वर जाई. तिथे उभा असलेला तो सिग्नलमन मग, सगळ्यांना म्हणत असे. अब जाओ, अब कोई चिंता नही, अब दरवाजा खुल गया हैं, दिल का दरवाजा भी ऐसे ही खोल दिजिए, जिंदगी बहोत आसान हो जायेगी. मन ही मंजिल हैं, उसे जितो, सब पाओगे, मन के आगे कुछ नही.
दररोज रेल्वे क्रॉसिंग पार करताना मी त्या सिग्नलमनचे ते वैचारिक डायलॉग ऐकत असे. त्या माणसाबद्दल मला खूप कुतूहल वाटत असे. तो बिनधास्तपणे त्याच्या धुंदीतच बोलत असे. त्याच्या बोलण्यात काही तरी एक वेगळा विचार असायचा. त्याच्या बोलण्याची एक विलक्षण ढब असे. त्याचे व्यक्तीमत्त्व साधे होते, त्याच्या बोलण्यात एक सहजता होती. शब्दफेक अफलातून करायचा. बरेच लोक त्याचे ते बोलणे हसण्यावारी नेत. यह तो इसकी हर रोज की डायलॉग डिलिव्हरी हैं, असे म्हणून क्रॉसिंग पटापट ओलांडून निघून जात. अनेक लोक त्याच्या समोरून ये जा करत असत. सिग्नल पडला की, माणसांना थांबवणे आणि सिग्नल सुरू झाला की, त्यांना क्रॉसिंगमधून सोडणे हेच त्याचे काम होते. येणार्‍या जाणार्‍या गाड्यांची धडधड, रेल्वे फाटक पार करण्यासाठी लोकांची धावपळ आणि त्या सिग्नलमनची तोंडपट्टी या तिन्ही गोष्टी सतत सुरू असत.

एकदा या बाजूला मी उभा होतो. क्रॉसिंगच्या त्या बाजूने एक शवयात्रा येत होती. गाड्या सिग्नलला उभ्या होत्या. त्या सिग्नलमनने केबिनमधल्या माणसाला आवाज दिला. सिग्नल जारी रखो. गाडी को रोक दो. गाडी तो आती जाती रहेगी, पहले उसे जाने दो, ओ तो दुनिया छोड के जा रहा हैं. त्याचे ते बोलणे मला एक झटका देऊन गेले. त्या माणसाविषयी माहिती करून घेण्यासाठी एक दिवस मी त्याच्या जवळ गेलो. त्याला म्हणालो, मै हमेशा यहाँ से गुजरता हूँ, आपकी बाते सुनता हूँ, आपकी बाते मुझे बहुत अच्छी लगती हैं, उसमे बडा अर्थ छुपा होता हैं, कैसे बोल लेतो हो आप. आपको ये कैसे सुजता हैं. त्यावर तो म्हणत असे, ओ तो मुझे मालूम नही, लेकीन युँही बोल लेता हूँ, दिल से बोलता हूँ सब. मी विचारले आपका नाम क्या हैं, तो म्हणाला रामसिंग. लेकिन मुझे सब लोग ‘गयाराम’ बोलते हैं. त्यानंतरही दररोज मी ‘गयाराम’ चे बोलणे ऐकत होतो. एक दिवस तो दिसला नाही, म्हणून त्याच्या जागी उभ्या असलेल्या सिग्नलमनला विचारले, गयाराम कहाँ हैं. तर तो म्हणाला, ओ कल राम के पास गया. मी म्हणालो, मतलब? त्यावर तो म्हणाला, ओ कल मर गया, इसी क्रॉसिंग पर उसको एक फास्ट रेलगाडीने उडाया. ऐकूण खूप वाईट वाटले. रेल्वे अपघातापासून सगळ्यांचे जीव वाचवण्यासाठी धडपडणार्‍याचा जीव रेल्वे अपघातातच गेला होता. ओ तो दुनिया छोड के जा रहाँ हैं, हे त्याचे शब्द आठवले. रेल्वेच्या रुळांकडे पाहून मी जड पावलांनी क्रॉसिंग पार केले.