घरफिचर्समायमहानगर ब्लॉगपोलिसांच्या नाकावर टिच्चून जात पंचायती

पोलिसांच्या नाकावर टिच्चून जात पंचायती

Subscribe

राजस्थानमधून शेकडो वर्षांपूर्वी महाराष्ट्रात स्थलांतरीत झालेला कंजारभाट समाज आजही जात पंचायतीच्या समान न्याय व्यवस्थेचा पुरस्कार करतोय. नंदुरबार, नाशिक, अहमदनगर, औरंगाबादसह पश्चिम महाराष्ट्रात या समाजाचा वावर दिसतो. राज्यभरात या समाजातील लोकांची संख्या सुमारे ५० हजारांच्या आसपास असेल; परंतु यातील बहुसंख्य मंडळी आजही प्रस्थापित कायद्याला मानायला तयार नाहीत. पोलिसांच्या नाकावर टिच्चून गावोगावी जात पंचायती बसतात. मुलगी पोटात असताना तिचं लग्न निश्चित करण्यापासून लग्न झाल्यानंतर पहिल्या रात्री तिचं सील तपासणारी ‘कौमार्य परीक्षा’ घेण्यापर्यंत आणि वैवाहिक आयुष्यात केवळ चारित्र्यावर संशय घेतला गेल्यास ‘अग्निपरीक्षा’ घेण्यापर्यंतचे अधिकार पंचांनी स्वत:कडे राखून ठेवले आहेत.

जळगावातील जाखनी नगर येथील कंजारभाट जात पंचायतीचं आणखी एक भयावह स्वरूप पुढे आलं आहे. आपल्या आईला जातीत घेण्यासाठी वरिष्ठ पंच असलेल्या आजोबांना वारंवार विनंती करूनही त्यांनी नातीला दाद दिली नाही. त्यामुळे नातीचंही लग्न अडून होतं. लग्न जुळवण्याचा प्रयत्न केल्यानंतर ते पंचायतीच्या माध्यमातून जाणीवपूर्वक मोडलं जातं. या तरुणीचं लग्न होऊच नये अशी व्यवस्था करण्यात आली होती. तरुणीचा गुन्हा काय होता तर तिच्या वडिलांनी २० वर्षांपूर्वी आंतरजातीय विवाह केला होता. मात्र, पंचांनी तिच्या आईला जातीत न घेतल्याने अखेर तरुणीनेे नाऊमेद होत जीवनयात्रा संपवली. त्यानंतरही पंचांचे डोळे उघडले नाहीत. त्यांचा ताठा तसाच कायम राहिला. जात पंचायतीने तिच्या वडिलांकडून २० हजारांचा दंड आकारल्यानंतर तिच्यावर कंजारभाट समाज परंपरेप्रमाणे अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय दिला. म्हणजे मृतदेहावर या जात पंचायतीने दंड आकारून नैतिकतेच्या सर्वच सीमा पार केल्या. पोलिसांनी या समाजातील नागरिकांशी चर्चा करून जात पंचायतीच्या अनिष्ठ प्रथा संपवण्यासाठी प्रबोधन करण्याचा प्रयत्न केला. मात्र, समाजातील काही तरुणांनी हा प्रयत्नही हाणून पाडला.

आमच्या जातीत हस्तक्षेप करण्याचा तुम्हाला अधिकार दिला कुणी असा उलट सवाल करीत पोलिसांनाही आव्हान देण्यात आलं. जात पंचायतीच्या विरोधातील सामाजिक बहिष्कार प्रतिबंधक कायदा अस्तित्वात आल्यानंतर अन्य समाजाने बर्‍यापैकी भूमिका बदलवली. मात्र, कंजारभाट समाज जातीच्या जोखडात अडकूनच राहिला. जात पंचांच्या मनमानी कार्यशैलीमुळे कित्येकांचे संसार उद्धवस्त झाले आहेत. हे सारं केवळ अशिक्षितांमध्येच चालू आहे असंही नाही. इंग्लंडहून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केलेल्या एका डॉक्टरने आपल्या उच्चशिक्षित वधूची कौमार्य चाचणी केल्याची घटना गेल्यावर्षी घडली. दुसरीकडे नंदुरबार येथील न्यायालयातील निवृत्त अधीक्षकाचा मुलगा आणि त्याच्या पत्नीची लग्नानंतरच्या पहिल्या रात्री कौमार्य चाचणी घेण्यात आली. अत्याधिक घृणास्पद प्रकार म्हणजे, कौमार्य चाचणीसाठी लैंगिक संबंधास कुणाची इच्छा न झाल्यास त्याला चक्क पॉर्न फिल्म दाखवली जाते. तरीही दाम्पत्य तयार नसेल तर अन्य दाम्पत्य त्यांच्यासमोर सेक्सचा डेमो करून दाखवत असल्याची बाब कंजारभाट समाजातीलच काही तरुणांनी उघड केली. पुरोगामित्वाचं बिरूद मिरवणार्‍या महाराष्ट्रात अशा प्रथांचं पालन होतं ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. सुशिक्षित आणि प्रतिष्ठित समजल्या जाणार्‍या घटकांकडून जात पंचायतींच्या माध्यमातून या प्रथांचा उदोउदो होणं, किंबहुना या प्रथांसाठी ते सक्रिय असणं ही बाब व्यक्तीस्वातंत्र्याबरोबरच लोकशाहीलाही तडा देणारी आहे. चारित्र्यहनन करणं किंवा संशय घेणं यामागचा हेतू काय तर स्त्रीवरचा स्वत:चा मालकी हक्क अबाधित ठेवणं. त्यासाठी तिला बंधनात अडकवून ठेवलं जातं. खानदान, कुटुंबाची इभ्रत त्याच्याशी जोडली जाते. अगदी परपुरुषाचा स्पर्श झाला तरी दंड किंवा शिक्षा केली जाते. जात पंचायतीच्या बहुतांश शिक्षा या स्त्रीच्या योनीशुचितेशी निगडित आहेत. तिला साधन म्हणून वापरलं जातं. तिला अजूनही विकलं जातं किंवा गहाणही ठेवलं जातं. या समाजातील प्रत्येक कुटुंबात जात पंचायतीतील पंच मंडळींचा इतका हस्तक्षेप असतो की, प्रत्येकाचं व्यक्तिगत जीवन खुंटीला टांगून ठेवलं जातं. या पंचांचा महिलांकडे पाहण्याचा दृष्टिकोनच धक्कादायक आहे. २०१६ मध्ये सातारा जिल्ह्यातील एका धक्कादायक घटनेने सबंध महाराष्ट्र हादरला होता.

- Advertisement -

बापानं आपल्या अल्पवयीन मुलीवर तब्बल चार महिने बलात्कार केला म्हणून बापाला १० फटके मारण्याचं फर्मान जात पंचायतीनं बजावलं. शिवाय या अल्पवयीन मुलीलाही दोषी ठरवून तिलाही काठीचे १० फटके मारण्यात आले. चारित्र्याच्या संशयावरून सांगली जिल्ह्यात एका महिलेला हातपाय बांधून मारण्यात आले. पुणे जिल्ह्यात पंचांनी दोघा महिलांच्या योनीमार्गात मिरचीची पूड कोंबली. जात पंचायतीच्या जाचाला कंटाळून अनेकांनी आपली जीवनयात्राच संपवल्याची उदाहरणेही आहेत. एका विवाहित महिलेचं चारित्र्य शुद्ध असल्याचं सिद्ध करण्यासाठी तिला उकळत्या तेलातून नाणं बाहेर काढण्यास सांगितल्याची घटना बीड जिल्ह्यात घडली होती. हात न भाजता ते नाणं काढलं तर चारित्र्य शुद्ध असल्याचं सिद्ध होणार होतं. नंदुरबार येथील एका महिलेला आपले चारित्र्य सिद्ध करण्यासाठी तिच्या सहा वर्षाच्या मुलाच्या हातावर तप्त अग्निचे गोळे ठेवण्याची परीक्षा घेण्यात आली. हाताला डाग पडल्यास महिलेचे चारित्र्यहिन ठरणार होती. या महिलेने निडरपणे जात पंचायतीला विरोध केला आणि तेथील अनिष्ट व्यवस्था उधळवून लावली. तिला बळ देण्यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अविनाश पाटील, जात पंचायत मूठमाती समितीचे कृष्णा चांदगुडे यांच्यासारख्यांनी पुढाकार घेतला.

आरोग्य विभागातील उपसंचालक कृष्णा इंद्रेकर यांच्यासारख्या अधिकार्‍यानेही या चळवळीला बळकटी देण्यासाठी सक्रिय योगदान देण्याचा विडा उचलला आहे. इंद्रेकर यांचा २५ वर्षांपूर्वी विवाह झाला. त्यावेळी पत्नीची कौमार्य चाचणी घेण्यास विरोध केला म्हणून इंद्रेकरांना समाजातून बहिष्कृत करण्यात आले, पण त्यातून खचून न जाता त्यांनी जात पंचायतीविरोधात चळवळ उभी केली आहे. जात पंचायतीचे स्वतंत्र संविधान आहे. त्यातील कलमांनुसारच व्यवहार होतो, शिक्षा दिल्या जातात, असे इंद्रेकर सांगतात. भटक्या विमुक्त आयोगाचे माजी अध्यक्ष बाळकृष्ण रेणके यांनी जात पंचायतीचा अभ्यास केला आहे. त्यांनी सांगितल्यानुसार भटके विमुक्त म्हटले की, त्यांच्याकडे नेहमीच संशयाची सुई असायची. गावात चोरी झाली की आधी बहुरुप्यांवर वा गावोगावी फिरणार्‍या भटक्यांवर खापर फोडत त्यांना ताब्यात घेतलं जायचं. बर्‍याचदा त्यांना मारझोड केली जायची. भांडवली व्यवस्थेमुळे न्यायालयातही त्यांच्या विरोधात निर्णय दिले जातात, असा समज त्यांच्यात रुढ झाला. त्यातून त्यांनी समांतर न्यायव्यवस्था उभी करण्यासाठी जात पंचायतीचा मार्ग निवडला, असंही रेणके सांगतात.

- Advertisement -

जातपंचायतींच्या अनिष्ट प्रथांविरोधात चळवळ म्हणून लढा देणारे विवेक तमाईचेकर सांगतात की, काही वर्षांपासून पंचांना मिळणारी अवास्तव प्रतिष्ठा आणि त्यामुळे वाढलेला स्वैराचार यामुळे पंच मॅनेज होऊ लागले. जो कोंबडी कापेल, बकरे कापेल, दारू पाजेल आणि महत्त्वाचे म्हणजे नोटांचे बंडल देईल त्याच्या बाजूने निर्णय दिले जाऊ लागले. अशा परिस्थितीत नैतिकतेला तिलांजली देत अनैतिक कृत्यांवरच अधिक भर दिला जाऊ लागला. कौमार्य चाचणीचे बाळ अशाच अनैतिक मानसिकतेतून जन्माला आलं आहे. आपल्या जातीत इतर जातीचा संकर होऊ नये, आपली जात शुद्ध राहावी यासाठी काही पंच जात पंचायतीच्या अनिष्ठ प्रथांना कवटाळताना दिसतात. सकारात्मक बाब म्हणजे कंजारभाट समाजातील जात पंचायतीची घाणेरडी प्रथा कायमस्वरूपी बंद करण्यासाठी समाजातीलच काही तरुण-तरुणींनी ‘स्टॉप द व्ही रिच्युअल’ नावाने चळवळ उभी केली आहे. त्यांनी जात पंचायतींशी संबंधित सुमारे ९० तक्रारी कायदा अस्तित्वात आल्यानंतर वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांत केल्या आहेत.

पोलिसांच्या नाकावर टिच्चून जात पंचायती
Hemant Bhosalehttps://www.mymahanagar.com/author/bhemant/
गेली २० वर्षांपासून पत्रकारितेत. अंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय राजकीय घडामोडींवर सातत्याने लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -