घरफिचर्समायमहानगर ब्लॉगमुंबई काँग्रेसच्या अस्तित्वाची लढाई!

मुंबई काँग्रेसच्या अस्तित्वाची लढाई!

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मनसेचे उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेऊन पक्ष कार्यकर्त्यांमध्ये एक नवा उत्साहाचा तरंग उमटवल्यानंतर स्वतंत्रपणे मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवण्याकडेच त्यांचा कल असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. कारण सेनेच्या खालोखाल तोलामोलाचं कार्यकर्त्यांचं केडर मनसेकडे आहे. निवडणुकीनंतर भिन्न विचारांचे आणि आचाराचे पक्ष सत्तेसाठी एकत्र आल्याचं आपण राज्यापासून ते दिल्लीपर्यंत बघत आहोत. तसाच काहीसा प्रकार मुंबई महानगरपालिकेतही होऊ शकतो. त्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा पत्ता मुंबईच्या राजकीय रणधुमाळीत टाकलेला आहे. मात्र या पत्त्याने काँग्रेस शहरातून पुरती नेस्तनाबूत होईल असंच चित्र आहे.

भारताचे स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांचा जन्म मुंबईतला. ब्रिटिशांना ‘चले जाव’ चा आदेश महात्मा गांधी यांनी याच मुंबईतल्या ऑगस्ट क्रांती मैदानातून दिला. एकेकाळी मुंबईत काँग्रेसचा वरचष्मा होता. त्याच मुंबईत मरणासन्न झालेल्या काँग्रेसने एक मोहीम राबवली. ही मोहीम होती काँग्रेसचा अध्यक्ष बनवण्याची. या मोहिमेनुसार काँग्रेसच्या ब्लॉक अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांना ‘व्हॉइस वोट’ च्या माध्यमातून नव्या नेतृत्वाबद्दल आपला मतदानाचा हक्क बजावायचा होता. स्वर्गीय राजीव गांधी देशाचे पंतप्रधान असताना भारतात संगणकाची क्रांती झाली. या संगणकीय क्रांतीसाठी हा देश सदैव राजीव गांधी यांचा ऋणी राहणार आहे. त्याच राजीव गांधी यांची काँग्रेस वाचवण्यासाठी मुंबईत संगणकीय प्रणालीचा आधार घेण्यात आला. याचं कारण आता पक्षाचे नेतृत्व हे लाळघोट्या नेत्यांच्या आणि गट-तट समर्थकांच्या तावडीतून बाहेर काढण्याची वेळ येऊन ठेपली असल्याचं काँग्रेस नेतृत्वाच्या लक्षात आलेलं आहे. त्यानुसार उपाययोजना केली गेली.

मुंबईच्या 227 विभागांमध्ये काँग्रेसचे फक्त तीस नगरसेवक होते. त्यापैकी एकाचे नगरसेवक पद न्यायालयातून रद्द झालेय तर अंधेरी पूर्वेकडील दुसर्‍या नगरसेविका काँग्रेसमध्ये असूनही शिवसेनेशी संधान साधून आहेत. वर्षभर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे त्याचे मुख्यमंत्री आहेत ही बाब सोडली तर गेली अनेक वर्षे महानगरपालिकेतील काँग्रेस पालिकेतल्या शिवसेनेचा मावसभाऊ असल्यासारखे वागत आहे.आणि महापालिकेत काँग्रेसची ही अवस्था होण्यासाठी तिथले रवी राजा यांच्यासारखे नेते कारणीभूत आहेत. आगामी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक शहा-मोदी यांच्याप्रमाणेच ठाकरे-फडणवीस यांनी गांभीर्याने घेतली आहे. याचं कारण या निवडणुकीनंतरच फडणवीस आणि ठाकरे यांच्या राजकीय भवितव्यावर दुरगामी परिणाम होणार आहेत. राज्यातून भाजपला थोपविण्यासाठी महाविकास आघाडीचा प्रयोग करण्यात आला. आता शिवसेनेची आर्थिक रसद तोडण्यासाठी मुंबई महानगरपालिकेवर म्हणजेच महाविकास आघाडीच्या हत्तीच्या गंडस्थळावर हल्ला करण्यासाठी शहा-नड्डा यांनी आपला अंकुश उगारलाय. ही गोष्ट लक्षात आल्यामुळे 2022 मधील मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढवावी असा प्रयत्न होऊ घातला आहे.

- Advertisement -

यासंदर्भात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार आणि काँग्रेसचे प्रभारी एच.के .पाटील यांची एक प्राथमिक स्वरूपाची बैठक पार पडली आहे. त्यानंतर महाविकास आघाडीने मुंबई महापालिका एकत्र लढवण्याबाबत विचारविनिमय सुरू झाला. त्याला पहिल्याच झटक्यात रवी राजा यांनी विरोध केलेला आहे. रवी राजा यांचा हा विरोध पक्षाच्या हितापेक्षा त्यांच्या स्वतःच्याच हिताला बाधा पोहोचू नये म्हणूनच करण्यात आलेला आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून शिवसेनेने भाजपबरोबरच्या घुसमटीतून मुक्त होण्यासाठी राष्ट्रवादी आणि काँग्रेसबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आणि मुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेतले. राज्यातले सर्वोच्च पद सेनेच्या हाती असताना त्याचा प्रत्यक्ष फायदा मात्र पवारांची राष्ट्रवादी अगदी बेमालूमपणे राज्याच्या सर्वच भागात उचलत असल्याचे पाहायला मिळते. सत्तेतील पक्षात काँग्रेस संख्याबळानुसार आणि क्षमतेनुसार तिसर्‍या स्थानावर आहे. राज्याच्या सत्तेत असलेली काँग्रेस राजधानी मुंबईत मात्र असून नसल्यासारखीच आहे. महापालिका निवडणुकीत तिकीटं मागण्यासाठी काँग्रेसकडे साधारण 10 ते 12 हजार इच्छुकांचे अर्ज येतात आणि वर्षानुवर्षे तिकिटांसाठी जे काँग्रेसमध्ये होत आलंय तेच दर पाच वर्षांनी होत असतं.

सध्या मुंबई काँग्रेसच्या प्रमुखपदाची सूत्रं 81 वर्षांच्या एकनाथ गायकवाड यांच्या हाती आहेत. त्यांच्या कामाच्या क्षमतेवर आणि एकूणच कारभारावर लिहिणं किंवा चर्चा करणं म्हणजे वेळ वाया घालवण्याचे उद्योग आहेत. त्याच वेळेला शहराची नवी अध्यक्ष म्हणून कदाचित त्यांची 45 वर्षांची मुलगी आणि विद्यमान शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या नावाची चर्चा आहे. त्यांच्या बरोबरीने 54 वर्षीय माजी खासदार प्रिया दत्त यांच्या नावालाही काहींनी पसंती दिली आहे. या दोघींपैकी एकीच्या नावावर जर काँग्रेस हायकमांडने शिक्कामोर्तब केलं, तर मुंबई काँग्रेसला पहिली महिला अध्यक्ष मिळू शकते. मुंबईच्या महापौरपदी पहिल्यांदा महिलेला बसवण्याचा मान काँग्रेसकडेच जातो. अ‍ॅड. निर्मला सामंत- प्रभावळकर यांना तो बहुमान 90 च्या दशकात मिळाला होता. मुंबईच्या अनेक झोपडपट्ट्यांमध्ये गावठाणात, दलित वस्त्या आणि मुस्लीम मोहल्ल्यांमध्ये काँग्रेसचे अस्तित्व प्रामुख्याने दिसून येतय.

- Advertisement -

अतिआत्मविश्वासाने सत्ता गेल्यानं दुखावलेल्या भाजपनं महापालिकेतून शिवसेनेला हटवणं हा एकमेव अजेंडा हाती घेतला आहे. त्यासाठी दिल्लीतील भाजप नेतृत्वानं अतुल भातखळकर यांच्यासारखा नवा कोरा चाणक्य प्रभारी म्हणून मैदानात उतरवला आहे. शिवसेना राज्याच्या सत्तेबरोबरच महापालिकेतही सत्तेत असल्यामुळे मुंबईकरांच्या वाहतूक कोंडीपासून आरोग्याच्या-पाण्याच्या, रस्त्यांच्या समस्येला शिवसेनेलाच पालिका निवडणुकीत जबाबदार धरलं जाणार आहे. कोविडकाळात झालेल्या अनेक गोष्टी आगामी काळात शिवसेनेला अडचणीच्या ठरतील असं राजकीय तज्ज्ञांचं म्हणणं आहे. शिवसेनेची भिस्त ही मराठी मतांवर आहे तर भाजपची भिस्त ही उत्तर भारतीय मतांवर प्रामुख्यानं आहे. परवाच राज ठाकरे यांनी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मनसेचे उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेऊन पक्ष कार्यकर्त्यांमध्ये एक नवा उत्साहाचा तरंग उमटवल्यानंतर स्वतंत्रपणे मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवण्याकडेच त्यांचा कल असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. कारण सेनेच्या खालोखाल तोलामोलाचं कार्यकर्त्यांचं केडर मनसेकडे आहे. निवडणुकीनंतर भिन्न विचारांचे आणि आचाराचे पक्ष सत्तेसाठी एकत्र आल्याचं आपण राज्यापासून ते दिल्लीपर्यंत बघत आहोत. तसाच काहीसा प्रकार मुंबई महानगरपालिकेतही होऊ शकतो. त्यामुळे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचा पत्ता मुंबईच्या राजकीय रणधुमाळीत टाकलेला आहे. मात्र या पत्त्याने काँग्रेस शहरातून पुरती नेस्तनाबूत होईल असंच चित्र आहे.

माजी खासदार संजय निरुपम मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष झाल्यानंतर काँग्रेस आपलं अस्तित्व मुंबईत दाखवत होती. निरुपम यांनी सुरुवातीला संघटनेमध्ये विद्यार्थीदशेपासून काम केलेल्या चरणजीतसिंग सप्रा यांच्यासारख्या नेत्याला आपल्या बाजूला घेतलं. त्यामुळे साहजिकच निरुपम यांना यशही मिळालं. पण माजी खासदार असलेल्या निरुपम यांनी आपल्या लोकसभेच्या मतदारसंघातच शहराची सूत्रं ठेवण्याकडे मोर्चा वळवला. पुढेपुढे तर त्यांना अतिआत्मविश्वासाची आणि अहंकाराची बाधा ही झाली आणि त्यातच त्यांची संपूर्ण राजकीय कारकीर्द पाचोळ्यासारखी होऊन गेली आहे. सध्या मराठी कार्डाच्या शोधात असलेल्या काँग्रेसकडे अशोक उर्फ भाई जगताप यांचा अपवाद वगळता इतर मराठी नेता दिसत नाही. स्वर्गीय पतंगराव कदम हयात असताना राज्यात मुख्यमंत्रीपदाची चर्चा सुरू झाली की पतंगरावांचं नाव चर्चेत असायचंच. प्रत्यक्षात मुख्यमंत्रीपदाची माळ दुसर्‍याच नेत्याच्या गळ्यात पडायची. स्वर्गीय पतंगरावांचं नाव बातम्यांमधील चर्चात्मक कार्यक्रमांमध्येच घेतलं जायचं. तशीच काहीशी अवस्था कामगार नेते भाई जगताप यांच्या बाबतीत मुंबई अध्यक्षपदाच्या वेळेला होत असते.

निष्ठावंत, मराठी चेहरा, आक्रमक कार्यशैली, कामगार क्षेत्रात वावर या सगळ्या जमेच्या बाजू भाई जगतापांकडे आहेत. तरीही स्पर्धेत प्रत्यक्षात बाजी कोणी तरी दुसराच मारून जातो. आता मात्र भाजप शिवसेना-मनसे हे सगळेच कसोशीने मराठी कार्ड खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यावेळेला काँग्रेससाठी भाई जगताप यांच्या इतका दुसरा आधार सध्या तरी दिसत नाही. या स्पर्धेत कर्नाटकचे एचके पाटील प्रभारी असल्यामुळे आणि मुकुल वासनिक यांचा वरदहस्त असल्यामुळे दाक्षिणात्य सुरेश शेट्टी हेदेखील बाजी मारण्यास उत्सुक आहेत. नसीम खान, अमरजीत मनहास, चरणजीत सप्रा यांची नावंही कार्यकर्ते आणि नेते चर्चेत घेतायत. आजही मुंबईतील दलित आणि मुस्लीम मतदारांना काँग्रेस आपला पक्ष वाटतो. भाजप तिथेही घुसण्याचा प्रयत्न करत असला तरी आधी म्हटल्याप्रमाणे त्यांची भिस्त ही उत्तर भारतीयांवर आहे. महाविकास आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसने एकत्र निवडणूक लढवली तर मात्र उत्तर भारतीय मतदार मोठ्या प्रमाणात भाजपच्या पाठीशी उभा राहू शकतो आणि मागच्या वेळेला अवघ्या दोन जागांनी हुलकावणी दिलेला महापौरपदाचा मुकुट एखाद्या भाजप कार्यकर्त्यांच्या डोक्यावर स्थिरावलेला आपल्याला दिसू शकतो.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -