घरफिचर्सलाल किल्ल्यावरचा केविलवाणा प्रयत्न!

लाल किल्ल्यावरचा केविलवाणा प्रयत्न!

Subscribe

1969 साली इस्त्रोची लौकीक अर्थाने स्थापना आणि आधुनिकीकरण करण्यात आले. तेव्हापासून अनेक शास्त्रज्ञांच्या सहाय्याने भारतातील व परदेशातील अनेकांसाठी उपग्रह प्रेक्षपणाचे कार्यक्रम इस्त्रोने पूर्ण केले आहेत आणि करीत आहे. तेव्हा काँग्रेसचे सरकार होते, आज भाजपचे सरकार आहे. इस्त्रोच्या आजच्या नवनव्या मोहिमांची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी दिमाखात करतात आणि जणू काही त्याचे जनक आपणच आहोत, असे भासवण्याचा केविलवाणा प्रयत्न करतात. इस्त्रोची वाटचाल 1969 सालापासून सुरू झाली असून तिथपासून आजपर्यंत काँग्रेसच्या सत्ताकाळात इस्त्रोचा पसारा वाढलेला आहे, हे विसरता कामा नये. म्हणून नि:स्वार्थपणे अविरत संशोधन करणार्‍या शास्त्रज्ञांच्या भव्यदिव्य कर्तृत्वाचे राजकीय फायद्यासाठी श्रेय न लाटता त्याचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख करण्याची समज राज्यकर्त्यांना येईल, तो सुदिन !

भारताच्या 72व्या स्वातंत्र्यदिनी देशातील प्रत्येक नागरिकाचे लाल किल्ल्याकडे लक्ष लागलेले असते. कारण त्या ठिकाणाहून देशवासियांना सूखकारक, आशावादी वाटेल अशी कोणती तरी घोेषणा पंतप्रधानांकडून होण्याची शक्यता असते. या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेहमीच्या शैलीत भाषण केले, घोषणाही अनेक केल्या. मात्र त्या जुन्याच होत्या. परंतु सांगताना मात्र त्या नव्या आहेत, हे भासवण्याचा आणि त्या योजनांचे सर्व श्रेय स्वत:कडेच कसे राहील याची पुरेपूर खबरदारी त्यांनी घेतली होती. त्या अनेक घोषणांपैकी एक घोषणा म्हणजे 2022 मध्ये भारत मानवसहित यान अंतराळात पाठवणार. पंतप्रधान मोदी यांनी ही घोषणा अशा पद्धतीने केली की, ती ऐकून सध्याच्या तरुणपिढीची हमखास फसगत झालेली असणार. मोदी सरकारच्या काळातच भारत पहिल्यांदा मानवसहित यान अंतराळात पाठवणार आहे. यापूर्वी कधीच भारतात असे घडलेले नाही. असे तरुणपिढीला वाटले असणार. अशा प्रकारे तरुणपिढीची दिशाभूल होऊ नये, यासाठी याचे खंडण होणे गरजेचे आहे.

अर्थात देशात केवळ सैन्य दल आणि इस्त्रो ही दोनच क्षेत्रे अशी आहेत, ज्यामध्ये कार्यरत घटकांवर देशात काँग्रेसची सत्ता आहे की भाजपची, याचा काहीही फरक पडत नाही, कारण त्यांची बांधिलकी देशहिताशी असते. अर्थात हे देशातील सर्व क्षेत्रांना लागू असते. मात्र त्याचे पालनही दोन क्षेत्र वगळता अन्यत्र कुठेही होताना दिसत नाही. सर्व क्षेत्रांवर राज्यकर्त्यांचा प्रभाव पडलेला दिसतो. मात्र दुर्दैव आहे या देशाचे की, सैन्य दल आणि इस्त्रो दोन क्षेत्रांतील घटकांकडून निस्सीम देशभक्तीतून भव्य दिव्य कार्य घडते आणि त्यांचेही श्रेय त्या त्या वेळी सत्तारूढ असलेला राजकीय पक्ष घेत असतो. म्हणूनच पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या 2022 च्या अंतराळ मोहिम घोषणेच्या पार्श्वभूमीवर तरुणपिढीचा गैरसमज दूर करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी भारताच्या अंतराळ मोहिमेचा इतिहास इथे देणे अगत्याचे ठरते. ज्यामुळे पुढच्या वर्षीच्या निवडणूक प्रचारातही जेव्हा पंतप्रधान मोदी 2022मधील अंतराळ मोहिमेचा उल्लेख करत त्याचे श्रेय घेण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करतील, तेव्हा तरुणपिढीची फसगत होणार नाही. इथे आवर्जून नमूद करावेसे वाटते की, 2022मधील अंतराळ मोहिमेची तयारी इस्त्रोने आधीपासूनच सुरू केली असून ती 70 टक्के पूर्ण झालेली आहे.

- Advertisement -

इस्त्रोची वाटचाल 1969 सालापासून सुरू झाली असून तिथपासून आजपर्यंत काँग्रेसच्या सत्ताकाळात इस्त्रोचा पसारा वाढलेला आहे. इथे ना काँग्रेसची बाजू घ्यायची ना मोदी सरकारवर टीका करायची आहे. परंतु सैन्य दल आणि इस्त्रो या किमान दोन घटकांच्या कामगिरीचे श्रेय लाटण्याचा उद्योग राजकारण्यांनी करू नये, खुल्या मनाने त्याचे श्रेय त्या त्या घटकाला द्यावे. कारण प्राणाची बाजी लावून जवान देशाचे रक्षण करत असतात आणि वैयक्तिक सुखाचा त्याग करून उभे आयुष्य शास्त्रज्ञ नवनवीन संशोधनासाठी खर्च करत असतात.3 एप्रिल 1984 रोजी भारताची पहिली व्यक्ती अंतराळात गेली होती. ती व्यक्ती राकेश शर्मा होती. रशिया आणि भारत यांच्या संयुक्त मोहिमेतून हे शक्य झाले होते. तेव्हापासून खरे तर भारतीय शास्त्रज्ञांच्या अंतराळ संंशोधनाच्या नव्या अध्यायाला सुरुवात झाली होती. 80 सूयोज टी-77 या नावाच्या अंतराळ यानातून राकेश शर्मा यांनी अंतराळाची भ्रमंती केली होती. हे यान रशियामधील बैकोनोर येथून सोडण्यात आले होते. तेव्हा राकेश शर्मा यांच्यासोबत रशियाचे दोन अंतराळवीरही होते. या अंतराळ यात्रेच्या दरम्यान राकेश शर्मा यांनी अनेक महत्त्वपूर्ण प्रयोग केले. या अंतराळ यात्रेच्या दरम्यान त्यांनी पृथ्वी, चंद्र, सूर्य आणि अन्य ग्रहांची दुर्लभ अशी छायाचित्रे आणली. या दरम्यान 5 एप्रिल 1984 रोजी अंतराळ मोहिमेवर असलेल्या राकेश शर्मा यांच्याशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा शास्त्रज्ञांनी संपर्क करवून दिला होता.

त्यावेळी इंदिरा गांधी यांनी अंतराळातून भारत कसा दिसतो, असा एकच प्रश्न केला. त्याला राकेश शर्मा यांनीही एका वाक्यातच उत्तर दिले, सारे जहाँ से अच्छा हिन्दोस्ता हमारा. 11 एप्रिल 1984 रोजी हे यान अंतराळ मोहीम यशस्वी करून परतले. त्यावेळी राकेश शर्मा हे भारतीय वायू सेनेतील एका स्वॉड्रनचे प्रमुख होते. अत्यंत अवघड निवड प्रक्रियेतून 200 प्रतिस्पर्ध्यांमधून राकेश शर्मा यांची निवड या अंतराळ मोहिमेसाठी करण्यात आली होती. भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्त्रो या संस्थेच्या माध्यमातून ही मोहीम प्रथमच राबवण्यात आली होती. आज जगातील अंतराळ संशोधनातील अग्रगण्य संस्था म्हणून तिच्याकडे पाहिले जात आहे. 1969 साली या संस्थेचे आधुनिकीकरण करण्यात आले. तेव्हापासून आजमितीस अनेक शास्त्रज्ञांच्या सहाय्याने भारतातील व परदेशातील अनेकांसाठी उपग्रह प्रेक्षपणाचे कार्यक्रम पूर्ण करण्यात आले आहेत आणि येत आहेत. त्यावेळी काँग्रेस सरकार होते आज भाजपचे सरकार आहे. इस्त्रोच्या आजच्या नवनव्या मोहिमांची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी दिमाखात करतात आणि जणू काही त्याचे जनक आपणच आहोत, असे भासवण्याचा प्रयत्न करतात. हे या राष्ट्रप्रेमींप्रती एक प्रकारची कृतघ्नताच म्हणावी लागेल, असो!!

- Advertisement -

लाल किल्ल्यावरून आणखी एक घोषणा करण्यात आली, तीदेखील जुनीच होती. आयुष्यमान भारत योजना. पंतप्रधान मोदी यांच्या भाषणानंतर प्रसारमाध्यमांनी लागलीच या योजनेेची चिरफाड करणे सुरू केले. ही घोषणा मुळातच अर्थसंकल्पाच्या वेळी करण्यात आली होती. त्याला सहा महिने उलटून गेले. यानंतरही जर पंतप्रधान मोदी 10 कोटी जनतेसाठी लाभदायक आयुष्यमान ही आरोग्य योजना 25 सप्टेंबर 2018 रोजी पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती दिनी देशभर लागू करण्यात येईल, अशी घोषणा करत असतील, तर ही सरळसरळ जनतेच्या डोळ्यात धूळफेक आहे. जर फेब्रुवारी 2018मधील अर्थसंकल्पात एखाद्या योजनेची घोषणा केली जाते, अशा वेळी मोदी यांनी 15 ऑगस्ट 2018 रोजी ती योजना कशी कार्यान्वित झालेली आहे, याचा आढावा सविस्तरपणे देशवासीयांना देणे अपेक्षित होते. परंतु तसे झालेले नाही. पंतप्रधानांनी त्या योजनेची पुन्हा घोषणाच केली. याचा अर्थ सरळ आहे की, सरकारची काम करण्याची गती कमी आहे. त्यामुळे अशा अनेक लोकोपयोगी योजना ज्यांची घोषणा होऊनही त्या अद्याप कागदावरच असतील उदाहरणार्थ पं. दीनदयाळ उपाध्याय यांच्यासारख्या अन्य नेत्यांच्या जयंतीदिनाच्या प्रतिक्षेत काही योजना रखडवून ठेवलेल्या असतील, तर ते योग्य ठरणार नाही.

Nityanand Bhise
Nityanand Bhisehttps://www.mymahanagar.com/author/bnityanand/
राष्ट्रीय भावना अधिक असलेला तितकाच सामाजिक जाणिवांबाबत हळवा असलेला मी धर्म, देव, श्रद्धा या बुरसटलेल्या, थोतांड गोष्टी मानणार्यामधला नाही, मी पुरोगामी नाही.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -