घरफिचर्सग्लोबल गावकूस

ग्लोबल गावकूस

Subscribe

पहाता पहाता गावं ’ग्लोबल’ झाली. शेतीमातीशी निगडीत माणसांचे जगणे तेवढे ’ऑफलाईन’बाकी सर्व ’ऑनलाईन’हे या काळाचे देणे.म्हणून आताशा उठल्यापासून झोपेपर्यंत गावातल्या माणसांनी ’कर लो दुनिया मुठ्ठी मे’चा जप करीत’ऑनलाईन’च करावी शेतीचे कामं .पेरणीच काय;गायी-म्हशींची धारही काढत जावी ऑनलाईन रोज.’अपलोड’ करत जावा सेंद्रीय खतांचा ’डोस’ पिकांच्या मुळांशी संगणकाच्या कळफलकाची एक एक ’कळ’दाबत.ऑनलाईनच करावी फवारणी,खुरपणी नांगरणी आणि सर्व मशागत एक जात.अ‍ॅन्टिव्हायरस टाकलेल्या ’हार्ड डिस्क’लाच करावे ठिबक सिंचन म्हणजे निरोगी येतील पीकं.पेनड्राईव्ह मध्येच साठवून ठेवत जावा आलेला’शेतमाल’ म्हणजे लागणार नाहीत किडे,भुंगे कधीच त्याला.करता आले तर नियमित करीत जावे शेतकर्याने स्वतःचे ’कष्ट’ युटूबला ’अपलोड’.म्हणजे जगाला दिसतील आमच्या ’ग्लोबल’ गावकुसांच्या नवनव्या गोष्टी...!

नव्या काळाचा नवा बदल

स्वीकारुन गावं ’ऑनलाईन’ झाली. सर्व सरकारी योजना ऑनलाईन,सातबारा,पंचनामे,हमीभाव,बँका,आधार,कर्जमाफी,स्वस्त धान्य वैगरे सर्व काही ’ऑनलाईन’ झाल्यामुळे लोकांना आजकाल आपले ’गाव’कसे ’ग्लोबल’ झाल्यासारखे वाटते.भले शहरांतील भौतिक सोयी-सुविधा नसतील पोहोचल्या गावात पण त्याचे नाही दुःख.गावकूसाला लागलेली मोठीमोठी होर्डिंग्स साक्ष देतच असतात येणार्या जाणार्यांना गाव ’ग्लोबल’झाल्याचे.काळ बदलला तशी गावांनी ’कात’ टाकली.गावात शहरी संस्कृतीने बाळसे धरले.पूर्ण रुजली नाही म्हणता म्हणता माणसं मात्र बदलली.बदल तरी कोणता हो! प्रागतिक,आधुनिक की फक्त फॅशन;शहरांपासून गावापर्यंत याचे नसते भान,तरी ’लोकल’ माणसं ’ग्लोबल’झाली यातच मानले समाधान.पोशाख,खान-पान,गाड्या-घोड्या,राहणीमान,भाषा वगैरे यात झाला बराच बदल.राखेने दात घासण्यापासून बहुराष्ट्रीय कंपनीच्या टूथपेस्ट पर्यंत झाला आमचा प्रवास.पारावरावर बसून रामराम ठोकणार्या सत्तरीतल्या वृद्धांपासून ते औतावर उभा राहून ’हॅलो’ म्हणणार्या तरुण पोरांपर्यंत सर्वांजवळ ’मोबाईल’ आला आणि माणूस जगाच्या ’गोतावळ्यात’ सामील झाला.

बांधावर उभा राहून दुरवर खुरपणार्या कारभारणीला हातवारे करुन बोलवायचे दिवस कधीच संपले.एका मिसकॉलने न्याहरीची खून पोहोचते तिला आता.हरित क्रांती,धवल क्रांती आणखी काय.यांपेक्षा आम्हाला भावली मोबाईल क्रांती.टिव्ही आला,मोबाईल आला जगाच्या बाजारांत आमच्या गरजांचा प्रवेश झाला.तेंव्हा आपसुकच’मोबाइलचे बील भरु शकता तर शेतीचे वीज बिल का नाही? हा प्रश्न आमच्या ग्लोबल समृद्धीवर बोट ठेवणारच!

- Advertisement -

म्हणून आता याद ठेवा; काळ बदलला ’गाव’सॅटेलाइटच्या नकाशात गल्लीबोळासह दिसू लागले.तुमचा ओसाड वाडा,खचलेली भिंत,तिच्यावर वाळलेले गवत,ढासळलेली गढी,पडलेला बुरुज आणि उरलेली पांढरी माती झुम केले की स्पष्ट दिसते गाव; हातातल्या स्क्रीनवर.तुमच्या या ’आऊटडेटेड’ वतनाला उरला नाही भाव.उगाच खणत बसत जावू नका इतिहासातील मृत परंपरांचे अवशेष;दुःखच वाट्याला येते.आता तुम्हाला धीर देणारी साधीसरळ,भोळी-भाबडी माणसंही कालबाह्य झालीत गावातून.शिवारभर शोधलं तरी त्यांच लोकेशन होत नाही ट्रॅक.कारण काळ्यामातीचे ’गाव’ कधीच ’पांढरे’ झाले त्यांच्यासाठी ..!

कधी काळी पांदीची वाट,पाऊलवाट,गाडीवाट धुराळा उडवीत गावाकडे झेपावणार्या या ’वाटा’ डांबरी झाल्या आणि गावाचा चेहरा बदलला.डांबर टाकून रस्ता गावाकुसाने गेला आणि गावांचा रंग-रुपच पालटले.अगदी पैसे देवून ’चहा-पाणी’विकत पिता येते हे भाबड्या गावाला रस्त्यानेच पहिल्यांदा सांगितले. एरव्ही कोणी ’पाहुणा’ गावात आला तर चार घरी त्याला तोंडावरुन पाणी फिरले की ’चहा’ दिला-घेतला जायचा.आता मात्र

- Advertisement -

कोणी गावात आले काय अन् गेले काय गावासाठी कोणी ’पाहुणा’ उरला नाही.गावच झाले ’पाहुणे’.पूर्वी शहाणी माणसं समोरुन आली की पोरं रस्ता बदलून निघून जात;इतका आदर.पण आता काळ बदलला.शेतात कष्टतो बाप,पोरगा रस्त्यांवरच्या ’बॅनर’वर;जागा ठरलेल्या.लहान कोण?मोठे कोण? सगळी संस्थान खालसा झाली.’खिश्यात स्मार्ट फोन,तोंडात मावा,बुडाखाली गाडी,फिरायला तालुका,जेवायला ढाबा’ही फॅशन नव्या काळाची बोली झाली.नाद करायचा नाय..!,बघतो काय रागानं…,सिंहाच्या जबड्यात घालुनि हात मोजितो दात..,गर्व से कहो हम…,नादुखळा.., तुझ्या साठी काय पण..!अशा तत्सम गगणभेदी भाषिक गर्जना गाडीच्या डंपरवर टाकून हा ’प्रिन्स’ गावभर आखाती देशांतून आयात केलेल्या पेट्रोलचा धुराळा उडवित मोकार फिरत असतो दिवसरात्र.याचा झेंडा त्याचा दांडा उसन्या घोषणा उधारीवर.’तुझा नेता,माझा नेता,रोजच लंब्या चौड्या यांच्या बाता,परंतु यांना नसते भान गावातल्या शाळेच्या अवकळचे,नागरी

सुविंधाच्या घोटलेल्या गळ्याचे,गहान पडलेल्या मळ्याचे.कारण यांच्या डोक्यात असते एक एक जात.

निवडणूक आली की दिली जाते जातवार गल्ली वाटून.पहाटे अजान वाजलीच तर हासडतात हे दोन शिव्या भोंग्याला.निळे झेंडे पाहून खवळते यांचे पित्त.तेंव्हा झेंड्याचे रंग पाहूनच टोळ्यांची लावतात सूत्रधार बोली.हिरवा,निळा,पिवळा,भगवा झेंडे पाहून ठरवले जातात वस्त्यांचे भाव.सांगितला जातो निवडणुका जिंकण्यासाठीचा ’पासवर्ड’ मारोतीच्या मंदिरात मध्यरात्री .तेंव्हा पिढ्यान् पिढ्या ’गावा’ला सांभाळणारा ’मारोती ’होतो कष्टी ’ग्लोबल’झालेला आजचा ’गावकूस’ पाहून…!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -