घरफिचर्सनाते मी टू चळवळीशी

नाते मी टू चळवळीशी

Subscribe

सध्या आरोप - प्रत्यारोपांची एक मालिकाच जणू उभी राहिली आहे. मात्र यामधील तथ्य काय आहे हे कळायला नक्कीच वेळ जाईल. पण तोपर्यंत आपण आपलं 'मी टू' चळवळीशी नातं एका अर्थाने घट्ट करायला हवं. कारण जोपर्यंत आपण तसं करणार नाही तोपर्यंत आवाज दबत राहणार आणि अशा गोष्टी घडत राहणार.

तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर यांच्या प्रकरणानंतर आता प्रत्येकाला अगदी लहान मुलालाही मी टू चळवळ माहीत झाली आहे. पण या चळवळीशी प्रत्येक स्त्री चे नाते हे वास्तविक वयात आल्यापासूनच असायला हवे. नाही का ? एका विशिष्ट वयात आल्यानंतर प्रत्येक स्त्री ला केवळ स्त्रीलाच नाही तर अगदी पुरुषालाही मी टू चळवळीशी नाते जोडायला हवे.
स्त्री वा पुरुष हे परस्परांचे वैरी नक्कीच नाहीत. मात्र, कोणीही कोणाचाही फायदा घेण्यापेक्षा दोघांमध्येही हे नाते निकोप असायला हवे हाच या चळवळीचा उद्देश आहे. त्यामुळे एका वयात आल्यानंतर स्त्री असो वा पुरुष प्रत्येकानेच या चळवळीशी नाते जोडून घ्यायला हवे. आता अनेकजण आपल्यावरील अत्याचाराची वाच्यता करत आहेत. मात्र आपल्यावर अत्याचार होत असताना वा लैंगिक शोषण होत असतानाच याची वाच्यता करणे आवश्यक आहे.

आपल्यावरील अत्याचाराला मनात धुमसत ठेवत आता तनुश्री दत्ता प्रकरणानंतर अनेकांनी यावर बोलायला सुरुवात केली आहे. मात्र, केवळ बॉलीवूडमधील प्रकरणे सध्या बाहेर येत आहेत. पण इतर क्षेत्रात हा अत्याचार घडत नाही का? मग इतर क्षेत्रातील प्रकरणं का बाहेर येत नाहीत? अथवा हा प्रकार केवळ स्त्रियांच्या बाबतीत घडतो का? पुरुष या अत्याचाराला बळी पडत नाहीत का? असे अनेक प्रश्न आहेत.

- Advertisement -

सध्या आरोप – प्रत्यारोपांची एक मालिकाच जणू उभी राहिली आहे. मात्र, यामधील तथ्य काय आहे हे कळायला नक्कीच वेळ जाईल. पण तोपर्यंत आपण आपलं मी टू चळवळीशी नातं एका अर्थाने घट्ट करायला हवं. कारण जोपर्यंत आपण तसं करणार नाही तोपर्यंत आवाज दबत राहणार आणि अशा गोष्टी घडत राहणार. आता या चळवळीशी नातं जोडायचं म्हणजे नक्की काय? असा प्रश्न पडणं साहजिक आहे. तर कोणत्याही अत्याचाराला बळी न पडता वेळेवर त्याविषयी आवाज उठवणं, बदनामीच्या बागुलबुवाची भीती कमी करून उशीरा का होईना पण स्वतःसाठी उभं राहायला हवं. मी टू म्हणत शहरातल्या महिला या अभियानात सहभागी होत आहेतच. पण ज्या महिला खेड्यात राहतात, त्या तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करत आहेत. त्यामुळे ही चळवळ हॅशटॅग पुरतीच मर्यादित न राहता, सर्वसमावेशक असायला हवी. केवळ वाच्यता करून थांबता नये, तर त्यावर कारवाई करण्यासाठीही सोय करण्याची गरज आहे आणि हेच नवं नातं या चळवळीशी प्रत्येक स्त्रीने आणि अगदी पीडित पुरुषानेही निर्माण करायला हवं.

आता हे स्वतःशीच नवं नातं निर्माण करून आवाज उठवण्यासाठी नव्याने स्वतःला तयार करायला हवं. केवळ कायदे करून उपयोग नाही, तर कायद्यांची अंमलबजावणीही तितक्याच काटेकोरपणे व्हायला हवी आणि त्यासाठी इतर नाती जपतो तसंच हे स्वतःशी मी टू चळवळीचं नातं जपायला हवं आणि ते पुढे न्यायला हवं. यामध्ये कोणतीच बदनामी वा लज्जा नाही. आपल्यावर होणार्‍या अत्याचारांना आपणच वाचा फोडायला हवी. कोणीही दुसरी व्यक्ती आपल्यासाठी कधीच उभी राहू शकत नाही. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत कोणाचीही आपल्या आयुष्यात मदत होऊ शकते. मात्र स्वतःच स्वतःला योग्यरित्या सावरू शकतो. त्यामुळे हे नवं नातं आता मी टू चळवळीशी प्रत्येकाने जोडायला हवं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -