घरफिचर्सपराक्रमी योद्धयाला अभिवादन 

पराक्रमी योद्धयाला अभिवादन 

Subscribe

सदाशिवराव भाऊ यांचा जन्म ४ ऑगस्ट १७३० रोजी पुण्याजवळील सासवड येथे झाला. पहिला बाजीरावाचा भाऊ चिमाजी अप्पा हे भाऊंचे वडील. त्यांच्या आईचे नाव रखमाबाई होते. रखमाबाईचा बाळंतपणातील आजाराने मृत्यू झाला. तसेच भाऊ सुमारे १० वर्षांचे असताना चिमाजी अप्पांचाही मृत्यू झाला. आजी राधाबाई यांनी भाऊंचा पुढे सांभाळ केला. भाऊ प्रारंभी नागपूरच्या भोसल्यांच्या सेवेत होते. नंतर ते नानासाहेब पेशव्यांचे दिवाण बनले. भाऊंनी मराठा साम्राज्याची उत्तम सेवा केली. १७४६ मध्ये भाऊंनी कर्नाटकात मुलुखगिरी केली. त्यांनी उदगीर घेऊन निजामाची कंबर तोडली.

अलाऊद्दीन खिलजीने दौलताबादचा देवगिरी किल्ला घेतल्यानंतर मराठ्यांना तो कधीच परत घेता आला नव्हता. सदाशिव भाऊने देवगिरी जिंकून इतिहास घडविला. अहमदशाह अब्दाली दिल्लीवर चालून आला तेव्हा दिल्लीचे संरक्षण करण्याची जबाबदारी मराठ्यांवर होती. मराठ्यांनी मोगलांशी अहमदिया करार केलेला होता. या करारानुसार दिल्लीला संरक्षणाची जबाबदारी मराठ्यांनी घेतली होती. या काळात मराठा साम्राज्य यशाच्या शिखरावर होते. दिल्ली परीसरातील काही भाग वगळता बहुतांश भारतावर मराठ्यांचा ताबा होता. मराठ्यांच्या नजरा आता वायव्येकडे वळल्या होत्या. मराठ्यांना वेळीच रोखले पाहिजे हे ओळखून अफगाणिस्तानचा शाह अहमदशाह दुर्राणी (यालाच अब्दाली म्हणतात) दिल्लीवर चालून आला.

- Advertisement -

अब्दाली मुत्सद्देगिरीच्या बाबतीत मराठ्यांच्या पुढे होता. त्याने उत्तरेतील सर्व नवाब आणि राजांना आपल्या बाजूने वळविण्यात यश मिळविले. या लढाईत भाऊंनी मराठ्यांचे प्रसिद्ध गनिमी कावा हे युद्धतंत्र बाजूला ठेवले. तसेच भाऊंनी बिगरसैनिक लवाजमा सोबत घेतला होता. कुटुंब कबिलाही होताच. या त्यांच्या चुका होत्या. भाऊंच्यासोबत जनकोजी शिन्दे आणि इब्राहीम खान गारदी होते. १४ जानेवारी १७६१ रोजी लढाईला तोंड फुटले. दुपारपर्यंत मराठे वरचढ होते. अब्दालीची ४५ हजारांची फौज पाठीला पाय लावून पळाली. दुपार ढळल्यानंतर सूर्य मराठ्यांच्या तोंडावर आला. तसेच अब्दालीने स्वत:च्या संरक्षणासाठी राखीव ठेवलेले सैन्य अचानक मैदान उतरविले. अब्दालीने हा शेवटचा डाव खेळला होता. तो फसला असता तर त्याचा मृत्यू अटळ होता. परंतु, त्याचे नशीब चांगले होते. यश मिळत आहे, असे पाहून मराठे जल्लोषाच्या तयारीत असतानाच अब्दालीच्या ५०० वेगवान घोडेस्वारांनी विद्यूत वेगाने हल्ला चढविला. मराठ्यांची दाणादाण उडाली.

अब्दालीचे बहुतांश सैन्य खलास झाले होते. अगदी थोडेसे लोक उरले होते. युद्ध जिंकूनही त्याला काहीच उपयोग नव्हता. कारण ज्या सैन्याच्या बळावर त्याने अफगाण साम्राज्य उभे केले होते. ते सर्व नामशेष झाले होते. त्यामुळे तो प्रचंड निराश झाला. संतापला. त्याने मेलेल्या भाऊंचे शिर कलम करून धीन्ड काढण्याचे आदेश दिले. भाऊंचे शीर कापण्यात आले. ज्या जानव्याने त्यांचा गळा आवळण्यात आला होता, त्यालाच त्यांचे शिर बांधून एका भाल्याला लटकावण्यात आले.

पानितपत युद्धाने नुसती अब्दालीचीच नव्हे, तर अफगाणी साम्राज्याची कंबर मोडली. अब्दालीचे साम्राज्य हे अफगाणचे शेवटचे साम्राज्य ठरले. पानिपतचे युद्ध जिंकल्यानंतर अब्दाली दिल्लीवर चालून येण्याऐवजी परत निघून गेला. कारण त्याच्याजवळ पुढे लढायला सैन्यच उरले नव्हते. पानिपत युद्धाची मध्यपूर्वेतील आक्रमक टोळ्यांनी प्रचंड धसका घेतला. त्यानंतर वायव्येच्या बाजूने भारतावर एकही आक्रमण झाले नाही. सुमारे पावणे दोनशे वर्षांनतर इंग्रजांनी व्यापाराच्या नावाखाली भारत ताब्यात घेतला.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -