घरफिचर्ससारांशखबरदार प्रेम कराल तर!

खबरदार प्रेम कराल तर!

Subscribe

आपल्या समाजाला प्रेमाची एवढी अ‍ॅलर्जी का झाली आहे, कोण जाणे! कॉलेजांनी आपली आहे ती जबाबदारी सोडून नसत्या उद्योगांना पाठीशी घालण्याचा प्रकार सुरू केला आहे. अमरावतीमधील एका कॉलेजने नुकतंच प्रेमविवाह न करण्याची शपथ दिल्याचं प्रकरण समोर आलं. ‘खबरदार..प्रेमात पडाल तर’ अशी सूचना देणारी ती शपथ पाहून पहिल्यांदा हसू आलं आणि नंतर कीव वाटू लागली.

साधारण दोन-अडीच वर्षांपूर्वीची गोष्ट. एक विद्यार्थिनी म्हणाली, ‘सर, मला तुमच्याशी बोलायचंय.’ वर्गातून बाहेर पडल्यावर ती माझ्याशी जरा मोकळेपणानं बोलू लागली. ‘मी आणि महेश परवा ग्राऊंडवर बोलत होतो. त्याचं आणि माझं तसं काहीच नाहीए सर; पण..’ ती थांबल्यामुळे मला क्षणभर काहीच कळेना. मी तिला पुन्हा विचारलं तेव्हा ती म्हणाली- बाऊन्सरने आम्हाला हटकलं. आमचा फोटो काढला. माझा नंबर मागितला आणि तो बाऊन्सर आता कसलेही मेसेज करतो. ‘बाऊन्सर’ शब्द ऐकताच मी पहिल्यांदा चमकलो. कॉलेजांमध्ये प्राध्यापक नसतील पुरेसे तरी चालेल; पण ‘बाऊन्सर्स’ असले पाहिजेत, असे अलिखित नियम केव्हा झाले, हे कधी कळलंही नाही. कॉलेजची संस्कृती, सभ्यता, सुरक्षा वगैरे वगैरे टिकावं म्हणून केलेली बाऊन्सर्सची ही योजना.

मुलगा आणि मुलगी चर्चा करत उभे आहेत, हे दृश्य नजरेस पडताच अनेकांची संस्कृती रक्षणाची कळ दाटून येते. या विद्यार्थिनीचं जणू त्या पोरावर प्रेम आहे आणि म्हणून अशा पोरींना वठणीवर आणायचं म्हणून त्या मुलीचे फोटो घेऊन तिलाच त्रास देणारा हा बाऊन्सर.

- Advertisement -

आपल्या समाजाला प्रेमाची एवढी अ‍ॅलर्जी का झाली आहे, कोण जाणे! कॉलेजांनी आपली आहे ती जबाबदारी सोडून नसत्या उद्योगांना पाठीशी घालण्याचा प्रकार सुरू केला आहे. अमरावतीमधील एका कॉलेजने नुकतंच प्रेमविवाह न करण्याची शपथ दिल्याचं प्रकरण समोर आलं. ‘खबरदार..प्रेमात पडाल तर’ अशी सूचना देणारी ती शपथ पाहून पहिल्यांदा हसू आलं आणि नंतर कीव वाटू लागली.

व्हॅलेंटाइन डे आला की अचानक मातृ-पितृ पूजन दिवस जन्माला येतो किंवा भगतसिंगला फाशी दिल्याची तारीख बदलली जाते आणि प्रेमवीरांच्या मनात अपराधभाव कसा निर्माण होईल, याचा कसोशीने प्रयत्न केला जातो. जणू प्रेमात पडलेलं कुणी वाया जाण्याच्या वाटेवरच असतं आणि त्यांना सावरायचं तर त्याला किंवा तिला जातधर्माचे संस्कारामृत पाजलेच पाहिजे, अशा थाटात असतात संस्कृतीचे ठेकेदार. संस्कृती रक्षणाच्या या दांभिकपणातून ना तो माणूस म्हणून घडतो ना तिला माणूस म्हणून फुलण्याचा अवकाश मिळतो. तिची भीती ती कोणाजवळ बोलू शकत नाही आणि पुरुषी इगोत अडकलेल्या त्याला तिचा नकारही पचवता येत नाही. मग हिंगणघाटपासून ते नोएडापर्यंत एकामागोमाग एक गोष्टी घडत जातात. कधी ऑनर किलिंग असते तर कधी आत्महत्या. खर्‍याखुर्‍या प्रेमापासून दूर लोटणार्‍या दांभिक समाज संस्कृतीत आणखी वेगळं काय घडणार !

- Advertisement -

प्रेमाचा सार्वत्रिक लोप होतो आहे. घरादारापासून ते राजकारणाच्या रिंगणापर्यंत. यासाठी ‘येथे प्रेम करु दिले जाणार नाही’ असे फलक लावायची गरज नसते. जिथे लोक बोलायला घाबरु लागतात किंवा मन मोकळं करताना ते अवघडतात नि समोरच्याचं ऐकून घ्यायला कुणी तयार नसतं, याचा अर्थ दुसरा काय असतो ! विशिष्ट जातधर्माला नो एन्ट्रीचे बोर्ड तिथे ठळक अक्षरात असतातच असतात.

मेंगझी नावाचा चनी तत्त्वज्ञ म्हणतो, if the king loves music there is little wrong with the land. अर्थात राजाचं संगीतावर प्रेम असेल तर राज्यात क्कचितच काही समस्या असतात. राजाचं संगीतावर प्रेम सोडा; राजाचं कशावरच प्रेम नसेल तर काय करायचं? जोडण्याची भाषा करण्याऐवजी पुन्हा पुन्हा तोडण्याची भाषा केली जात असेल तर काय म्हणणार? पूल बांधण्याऐवजी भिंती बांधण्याचं (भिंती बांधणं हे जणू आपलं ट्र्म्प कार्ड आहे, असं राजाला वाटत असावं !) काम सुरू असेल तर त्याचा अर्थ स्वच्छ आहे-राजा प्रेमाच्या विरोधात आहे आणि द्वेषाच्या बाजूनं आहे. द्वेषाने व्यक्ती आंधळी होते. पण दुर्दैवाने हे आंधळेपण तिच्यापुरतं मर्यादित नसतं. साथीच्या रोगासारखं ते पसरत जातं आणि मग तीच जणू जीवनशैली बनते. आज अमुक धर्म शत्रू. उद्या तमुक जात शत्रू. एखादी व्यक्ती शत्रू. विशिष्ट देश शत्रू. ही साखळी अनंत आहे. शत्रू शोधणं, ते निर्माण करणं याचीच जणू चटक लागते. प्रेम करायला, शेअर करायला कुणी माणूस जवळ असणं ही जशी मानसिक गरज असते तशीच मग द्वेष करायला किंवा शत्रुत्व निर्माण करायलाही कुणाची आवश्यकता भासू लागते. अशा प्रकारे आत्यंतिक द्वेषभावनेतून वैफल्य येतं. हा मानसिक आजार आहे. हा आजार समूहाला जडतो तेव्हा तो अधिक गंभीर होतो. याची लागण सर्वांना होऊ लागली की त्या सगळ्याचे बळी सर्वसामान्य माणसं असतात. सामाजिक मानसशास्त्रीय चौकटीत यावर बरीच चर्चा झाली आहे.

आपण अशा एका द्वेषाच्या साथीच्या विळख्यात अडकलो आहोत. करोना विषाणूपेक्षाही हा द्वेषाचा विषाणू अधिक प्राणघातक आहे. माणसाच्या असण्याला आतून पोखरणारा हा विषाणू आहे. कोणताही बाउन्सर, कोणताही संस्कृती रक्षक किंवा कोणतीही भिंत हा विषाणू रोखू शकत नाही. हा विषाणू रोखण्याचं अपरंपार सामर्थ्य आहे मनाचे दरवाजे खुलं ठेवणार्‍या प्रत्येकाच्या मनात. विश्वास, श्रद्धा, जिव्हाळा, आस्था यांचा परीघ विस्तारत नेण्याची विजीगीषू आकांक्षा असणार्‍या हृदयात.

‘वबा फैली हुई है चारो तरफ
अभी माहौल मर जाने का नहीं’

हे सांगणार्‍या राहत इंदौरींना लक्षात ठेवून या विषाणूच्या विरोधात प्रेमाचा एल्गार करायला हवा. त्यातून जग अधिक सुंदर होऊ शकतं. एक असं जग जिथं द्वेषाचं दुकान जप्तीत निघेल आणि प्रेमाचा बहर वाढेल. रोमॅन्टीक असण्याच्या सार्‍या भाबड्या नि काटेरी (!) सीमारेषांवर तोल सांभाळत मी या प्रेमासाठी हा डाव खेळायला तयार आहे. प्रेम असं व्हायरल झालं तर मग कुण्या राजाला संगीत आवडतं की नाही, याचीही मला फिकीर नाही. कारण समाज या प्रेमाच्या रेझोनन्सच्या वाटेने निघालेला असेल. ही वाट अधिक प्रशस्त असेल, आणखी प्रकाशमान असेल.

श्रीरंजन आवटे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -