घरफिचर्ससारांशमुंबईच्या स्पिरिटफुल वुमनिया

मुंबईच्या स्पिरिटफुल वुमनिया

Subscribe

रेल्वे प्रशासनाने सर्व महिलांना लोकल प्रवासाची परवानगी दिली. त्यामुळे त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता. लॉकडाऊनमध्ये कोणाच्या नवर्‍याची, तर कोणाच्या मुलाची नोकरी गेली होती. कंपन्या बंद झाल्याने उपासमारीची वेळ आली होती. बरेच परप्रांतीय गावी निघून गेले होते. त्यात महिलाही होत्या. त्यांची कामे या महिलांना मिळाली आणि कुटुंबाचा गाडा सुरु झाल्याचं यातील काहींनी सांगितलं. यातील काहीजणी रुग्णालयातील आया होत्या. तर काहीजणी भाज्या विक्रेत्या. या महिलांनी आपले स्पिरिट कमी होऊ दिले नाही. आता ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी मिळाल्याने सरकारला काहीजणी आशीर्वाद देत होत्या.

रेल्वे प्रशासनाने बुधवारी 21 तारखेपासून सामान्य महिलांनाही लोकल प्रवासाची परवानगी दिली. यामुळे महिलांच्या प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी तब्बल सहा महिन्यानंतर ट्रेनचा प्रवास केला. मुंबईकर असल्याने मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल आम्हाला प्रियच आणि प्रवासासाठीही सेफ वाटतेच. पण सहा महिन्यांपूर्वीचा रुटीन ट्रेनचा प्रवास यावेळी मात्र वेगळा वाटला. कारण होतं कोरोना. नाही म्हटलं तरी सकाळच्या तुलनेत संध्याकाळच्या परतीच्या प्रवासात डब्यात गर्दी नसली तरी सगळ्या सीट भरलेल्या होत्या. अगदी चौथी सीटही. कोरोनाची भीती, सोशल डिस्टन्सिंग तिथे नावालाही नव्हती. फक्त तोंडावर बांधलेले मास्क, ओढण्या होत्या. त्यातूनही शेजारणीला आपले वाक्य नीट ऐकता यावे म्हणून काहीजणी मास्क लावलेल्या तोंडाने त्यांच्या कानाजवळ कुजबुजत होता. कोरोनाचे विस्मरण नाही पण लोकल प्रवासात त्याची धास्ती मात्र निश्चितच मागे पडलेली दिसत होती. लेडीज डब्यात प्रवासादरम्यान मैत्रिणींचा रंगणारा गप्पांचा फड यावेळीही रंगलेला बघायला मिळाला. गंमत म्हणजे गप्पा कोरोनाच्या नाही तर नवरात्रीचा उपवास आणि साड्यांच्या सेलचा होता. हे मुंबई नॉर्मल होत असल्याचे प्रमुख लक्षण नक्कीच आहे.

या प्रवासात हटकून सेकंड क्लासने प्रवास केला. बायकांचे खरचं कौतुक वाटलं. त्यांच्याशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारताना एक गोष्ट मात्र जाणवली. यातील बहुतेक महिला या गरजेपोटी कामावर जात होत्या. लॉकडाऊनमध्ये कोणाच्या नवर्‍याची, तर कोणाच्या मुलाची नोकरी गेली होती. कंपन्या बंद झाल्याने उपासमारीची वेळ आली होती. बरेच परप्रांतीय गावी निघून गेले होते. त्यात महिलाही होत्या. त्यांची कामे या महिलांना मिळाली आणि कुटुंबाचा गाडा सुरु झाल्याचं यातील काहींनी सांगितलं. यातील काहीजणी रुग्णालयातील आया होत्या. तर काहीजणी भाज्या विक्रेत्या. सामान्य महिलांना प्रवासाची मुभा नव्हती यामुळे तासन् तास त्यांना बससाठी ताटकळत राहावे लागत होते. कामाला पोहचायलाही उशीर आणि घरी यायलाही उशीर त्यामुळे त्या वैतागल्या होत्या.

- Advertisement -

पण आता ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी मिळाल्याने सरकारला काहीजणी आशीर्वाद देत होत्या. वेगळे समाधान त्यांच्या चेहर्‍यावर होत. एवढे महिने बसमधल्या गर्दीत आलेले वाईट अनुभवही काहीजणींनी सांगितले. जे ऐकून अंगावर काटा आला. पण तरीही त्या रोज त्याच गर्दीत त्याच बसमधून प्रवास करत होत्या. कंपनीकडून प्रवासासाठी कुठलीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. कंपनी तोट्यात आहे. कर्मचार्‍यांसाठी गाडी पाठवण्याचा खर्च परवडणार नाही. यामुळे तुम्हाला जमत असेल तर या नाहीतर नका येऊ. अशा सबबी कंपन्यांनी दिल्या. यामुळे बसमधून जाण्याशिवाय पर्याय नव्हता. रोज टॅक्सी रिक्षाचा खर्च झेपेल एवढा पगार मिळत नाही. यामुळे या महिला आहे त्या परिस्थितीचा सामना करत ट्रेन प्रवासाची वाट बघत होत्या.

कोरोनाबद्दल विचारताच त्यातील अनेकांनी एकच सांगितलं. शेवटी एक दिवशी सगळ्यांना जायचचं आहे. मग मरणाला घाबरून जगणं कसं सोडायचं. जमेल तेवढी काळजी घ्यायची. शेवटी मृत्यूला एक निमित्त लागतं. ते काय असेल ते सांगता येत नाही. त्यांची ही उत्तरे ऐकून अचंबित झाले. विशेष म्हणजे मी ज्या महिलांबरोबर गप्पा मारत होते. त्यातील बहुतेक या जास्त शिकलेल्याही नव्हत्या. मिळेल ते व हाती पडेल ते काम करणार्‍या होत्या. जेव्हा लस येईल तेव्हा येईल. तोपर्यंत घरात राहून उपाशी मरणार का असा उलट सवाल त्यांनी केला. यातील एकजण सात महिन्यांची प्रेग्नंट होती. कोरोनाचा सर्वाधिक धोका ज्यांना असतो त्यात गर्भवती महिलाही आहेत. हे माहीत असूनही ती महिला आज ट्रेनमधून प्रवास करत असल्याने मला तिची किव आली. त्यावर ती म्हणाली, मी एका वयस्क जोडप्याच्या घरी जेवण बनवते. नवरा बेवडा आहे.

- Advertisement -

कामधंदा करत नाही. लॉकडाऊनमध्ये तीन महिने मीही जाऊ शकले नाही. यामुळे त्या जोडप्याचे खूपच आबाळ झाले. त्यांनी बाहेरून डबा लावला होता. पण ते जेवण खाऊन ते आजारी पडले. त्यांना काय हव नको ते मला माहीत आहे. ते मला मुलगीच मानतात. जीव लावतात. त्यांनीच चांगल्या हॉस्पिटलमध्ये माझं नाव नोंदवलं आहे. बिल पण तेच भरणार आहेत. मग अशा देवमाणसांसाठी आपण थोडा त्रास सहन करायला काय हरकत आहे. ट्रेनमध्ये प्रवास करता येणार म्हणून मी आले. दोन दिवसांचं जेवण त्यांच्यासाठी बनवून ठेवलं आहे. आता दोन दिवसांनंतर जाईन. तोपर्यंत मलाही टेन्शन नाही आणि त्यांनाही नाही. हे ऐकल्यावर काय बोलावं ते सुचलं नाही. पण तिला काळजी घेण्याचा सल्ला दिला.

यातील प्रत्येक महिला खंबीर वाटली. कुटुंबाच्या जबाबदारीबरोबरच कर्तृत्वाच भान असलेली. कोरोनाच्या काळात संसर्गाचा धोका स्वीकारून घराबाहेर पडलेली कोरोना योद्धा. पण त्याचा कुठेही गाजावाजा नाही. कर्तव्य आणि जबाबदारीला प्राधान्य देणार्‍या या महिला रेल्वेप्रवासात भेटल्याने नवी स्त्री भेटल्याचा आनंद झाला. कारण कोरोना काळात महिला सहसा घराबाहेर पडताना दिसल्या नाहीत. त्या घरातील जबाबदारी पार पाडत होत्या. तर काही आजही वर्क फ्रॉम होम करत आहेत. बाहेर त्याच पडल्या ज्यांना पर्याय नाही. यात सरकारी व अत्यावश्यक सेवेबरोबरच बँक महिला कर्मचारीही होत्या. पण आता सामान्य महिलांनाही रेल्वे प्रवास करता येणार असल्याने छोट्या मोठ्या आणि खासगी कंपनीत काम करणार्‍या महिलांनाही दिलासा मिळाला आहे. पगार कमी मिळत असल्याच्या चिंतेपेक्षा आपली नोकरी शाबूत आहे याचाच प्रत्येकीला आनंद आहे. हे त्यांच्या बोलण्यावरून समजलं. आता जबाबदारी अधिक वाढल्याचं भानही त्यांना आहे. कोरोनाचा संसर्ग आपल्याला होऊ नये त्याचबरोबर तो घरातल्यांनाही होता कामा नये याची काळजी घेण्याचं दुहेरी आवाहन समोर असल्याचं त्यांनी सांगितले.

कोरोनाची लस केव्हा येणार ते माहीत नाही. यामुळे लशीची प्रतीक्षा न करता रोगप्रतिकारकशक्ती वाढवून कोरोनाला दूर ठेवणे हेच आपल्या हाती आहे. हे एव्हाना सगळ्यांनाच कळलं आहे. हेच ओळखून सामान्य मुंबईकर महिलाही घराबाहेर पडल्या आहेत. ज्यांच्या हातात स्वत:चाच नाही तर संपूर्ण घराचं आरोग्य आहे. त्यांच्या या नव्या प्रवासाला अनेक शुभेच्छा. अनेक संकटं झेलणार्‍या मुंबईकरांमध्ये जबरदस्त स्पिरिट आहे. तेच स्पिरिट घेऊन घराबाहेर पडलेल्या या महिलांच्या हिमतीला दाद द्यायलाच हवी.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -