आदिवासी लोकनायक बिरसा मुंडा

बिरसा मुंडा यांचं सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय क्षेत्रातील योगदान महत्वपूर्ण आहे. आदिवासी समुदायाला संघटित करून त्यांनी उभी केलेली चळवळ, प्रस्थापितांना त्यांनी विचारलेले प्रश्न हे समाजाला दिशा देणारे होते आणि आजही आहेत. वसाहतकालीन आणि स्वतंत्र भारतातील अनेक कायदे आणि धोरणे बिरसाच्या चळवळीतून प्रभावित झालेले आहेत. 15 नोव्हेंबर हा बिरसा मुंडा यांचा जन्म दिवस आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो. त्या निमित्ताने त्यांचा परिचय करून घेण्याचा प्रयत्न.

एकोणिसाव्या शतकात ख्रिस्ती मिशनर्‍यांनी झारखंडमध्ये वेगवेगळ्या शिक्षण संस्था, चर्च यांची स्थापना करून आदिवासींचे वर्ग घेण्यास सुरुवात केली होती. एकीकडे मानवता, दयाभाव, सेवा ह्या गोष्टी शिकवल्या जात होत्या. मात्र त्याच मिशन-यांच्या शाळामधून, वर्गातून आदिवासी संस्कृती दुय्यम, रानटी आहे, त्यामुळे आमची संस्कृती स्वीकारा, असा संदेश दिला जात होता. त्यामुळे साहजिकच आदिवासींमध्ये न्युनगंडाची भावना निर्माण होत होती. अशाच एका शाळेमध्ये वर्ग सुरु असताना एका चौदा वर्षाच्या आदिवासी मुलाने फादरला याबद्दल प्रश्न केला. तो मुलगा म्हणजे ‘बिरसा मुंडा’. त्या फादरचे नाव होते फादर ‘ए नोट्रोट’.

बिरसा मुंडा हा मुंडा या आदिवासी जमातीचा मुलगा. बिरसा मुंडाला त्या फादरने आदिवासी समुदायाचे मागास, रानटी, जंगली, हल्लेखोर असे केलेले वर्णन पटले नाही. त्या फादरला कडाडून विरोध करून त्यांनी आपली समृद्ध मुंडारी आदिवासी परंपरा सांगितली. याचा परिणाम असा झाला की बिरसाला शाळेतून काढून टाकण्यात आले. फादर ए नोट्रोटनीसुद्धा या घटनेनंतर मुंडा समुदाय, त्यांची भाषा याचा अभ्यास करण्यास सुरुवात केली.

15 नोव्हेंबर, आदिवासी महानायक ‘बिरसा मुंडा’ यांचा जन्म दिवस. हा दिवस देशात अनेक ठिकाणी आदिवासी दिवस म्हणूनही साजरा केला जातो. आदिवासी समुदाय अन्नासाठी कंदमूळ, फळ आणि शिकारीवर प्रामुख्याने अवलंबून आहे. अल्प प्रमाणात आणि काही ठिकाणी फिरती स्वरुपाची शेती करणार्‍या आदिवासी जमातींची जवळपास अकरा कोटी लोकसंख्या आज भारतात आहे. प्राचीन काळापासून चालत आलेली आदिवासींच्या रुढी परंपरा, चालीरीती, निसर्गधर्म, न्यायनिवाडा करणार्‍या गणपंचायती आणि सर्वात प्राचीन अस्ट्रोआशियाई ‘भाषाकुळातील’ भाषा जपणार्‍या या आदिवासी जमाती आहेत. कोल, संथाळ, हो, उराव, मुंडा या काही आदिवासी जमाती. ज्यांच्या दैनंदिन व्यवहाराच्या नीती नियमात फरक असले तरी या सर्वांमध्ये निसर्गाधारित उपजीविका आणि निसर्गपूजनाचा समान धागा आहे.

आदिवासींचे जीवन हे जल, जंगल, जमीन यांच्याशी इतके एकरूप आहे की, जंगलाशिवायच्या त्यांच्या जीवनाची कल्पनाही करता येत नाही. त्यांची उपजीविका तर जंगलावर आधारित आहे, त्यांची श्रध्दास्थाने, मनोरंजनाची साधने आणि ठिकाणे इत्यादी हे नदी, नाले, जंगल, झाडे, पर्वत, पक्षी, प्राणी आदींशी जुडलेली असतात. त्यांच्या नित्यक्रमातील एकही बाब अशी नसते की जी ह्या गोष्टीशिवाय पूर्ण होईल. निसर्गाच्या समृद्धीशीच त्याची समृद्धी जोडलेली आहे. म्हणून तो निसर्ग राखून आहे. भारतातील व जगातील सर्वाधिक जंगले ही आदिवासी समुदायांनी राखली आहेत.

आपापल्या धर्माचा प्रचार प्रसार करण्याच्या हेतूने प्रेरित आदिवासींमध्ये अनेक धार्मिक संस्था काम करतात. एकीकडे ख्रिश्चन मिशनर्‍या तर दुसरीकडे हिंदू संघटना. आदिवासींना वनवासी करून त्यांचे हिंदूकरण करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र मूळ आदिवासी स्वतःला हिंदू समजत नाहीत. त्यांच्या प्रथा, परंपरा हिंदूंहून भिन्न आहेत. जनगणना करीत असताना आदिवासींची नोंद एक तर हिंदूंसारखे म्हणून हिंदूमध्ये केली जाते किंवा इतर या वर्गवारीत नोंदवले जाते. पद्मश्री रामदयाल मुंडा यांनी आदिवासींची नोंद करताना ‘आदि धरम’ या वर्गवारीत करावी, अशी मागणी केली होती. आजही यासाठी अनेकदा आंदोलने केली जातात.

प्राचीन काळापासून आदिवासी जमातीमध्ये वेगवेगळा कृषक समाज, व्यापारी, सावकार यांचे हस्तक्षेप सुरू झाले. यामुळे जमाती काहीशा अस्वस्थ होत होत्या. मात्र जेव्हा ब्रिटिश राज्यकर्ते आणि ख्रिश्चन मिशनरींचा आदिवासी जीवनात हस्तक्षेप सुरू झाला तेव्हा त्यातून आदिवासींमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला. सार्‍या जगाला सुसंस्कृत करण्याचा विडा उचलणर्‍या ब्रिटिशांचे आदिवासींबद्दलचे विचार ही रानटी, जंगली असेच होते. आदिवासी टोळ्यांची प्रचंड दहशत त्यांच्यात होती. ब्रिटिशांनी येथील पूर्वीच्या शोषक कृषक, व्यापारी, सावकार यांना हाताशी धरून भटक्या स्वरूपातील आदिवासींना स्थानबद्ध करण्याचा प्रयत्न केला. फिरत्या स्वरुपाची शेती ही हातानी बिया टाकून केली जायची. ब्रिटिशांनी त्यांना एका जागेत बंदिस्त करून माळरान, खडकाळ जमीन, काही ठिकाणी जंगले काढून शेती करण्यास भाग पाडले. शिवाय या शेतीवर ब्रिटिशांनी कर बसविला. ब्रिटिशांनी दुसरी एक गोष्ट केली, ती म्हणजे त्यांनी जंगल ताब्यात घेतले. आदिवासींनी जंगलात जायचे नाही, शिकार करायची नाही, कंदमुळे, फळे गोळा करायची नाही. अशी आदिवासींच्या मूळ प्रवृत्तींच्या विरोधात ब्रिटिशांनी धोरण राबविण्यास सुरुवात केले. ब्रिटिशांची ही नीती जंगलाच्या लाकडापासून नफा कमवायचा होता आणि आदिवासींना त्यांच्या क्षमता संपवून एका ठिकाणी स्थानबद्ध करायचे होते. यातून त्यांच्या राज्यकारभारास अडचण होणार नव्हती.

आजच्या झारखंडमधील खुंटी जिल्ह्यातील उलीहातु गाव. या गावातील सुगना मुंडा आणि करमी हातु यांच्या पोटी 15 नोव्हेंबर 1875 रोजी बिरसाचे जन्म झाले. गुरुवारी जन्म आणि गुरुवार म्हणजे बृस्पतीवार स्थानिक भाषेत बिस्तवार किंवा बेस्तार असे म्हटले जाते. यावरून बिरसा असे नाव ठेवले गेले. जनावरे चरायला नेणे, मुलांचे गट करून त्यांत खेळणे ही सामान्य मुलासारखी त्याचीही दिनचर्या. त्यातच त्याने उत्तम बासरी वाजविण्याची कला अवगत केली होती. आदिवासी गावामध्ये तरुण मुल जमण्याची, गप्पा गोष्टी करण्याची, खेळण्याची एक जागा असते. त्याला ‘आखाडा’ म्हणतात. या आखाड्यात हा बिरसा मुंडा आपले कर्तृत्व दाखवीत असे. बिरसाचे वडील खिस्ती झाले होते म्हणून बिरसा मुंडा यांना दाऊद/डेव्हिड मुंडा असे ही म्हटले जायचे.

बिरसा सर्व गोष्टीकडे चिकित्सकपणे पहायचा. ब्रिटिशांच्या छळाचे आदिवासी समुदायातील असंतोष, ख्रिस्ती मिशनर्‍यांचे आदिवासी समुदायाबद्दलची मते आणि बहुसंख्य लोकांकडून होणारे ख्रिस्तधर्म स्वीकार. या सर्व गोष्टीचा बिरसा विचार करायचा. यामध्ये त्याच्या घरावर बेतलेली गरिबी, बेरोजगारी या सर्वांचा परिपाक म्हणून बिरसा यांनी संघर्षाचा मार्ग अवलंबला. समवयीन तरुणाचे संघटन, आदिवासी परंपरा विशेषतः मुंडारी परंपराचे पुन:जागरण आणि ब्रिटिशांच्या पोलीस चौकीवर हल्ले अशी कारवाई बिरसाच्या नेतृत्वात सुरू झाली. बिरसाच्या या उठावाला आदिवासी समुदायातून मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. ब्रिटिशांनी या गोष्टीचा खूपच धसका घेतला होता. त्यांनी बिरसाला पकडण्यासाठी मोहीम सुरू केली. माहिती देणार्‍याला किंवा पकडून आणणार्‍यांसाठी बक्षिसे जाहीर केली. 3 मार्च 1900 मध्ये बिरसाला अटक करण्यात आली आणि 9 जून 1900 मध्ये तुरुंगातील वातावरण, छळ यामुळे त्यांचा मृत्यू झाला.

बिरसा मुंडाने आदिवासी जीवनामध्ये एक चैतन्य भरण्याचे काम केले. ब्रिटिशांविरोधी उठावांमध्ये प्रमुख मागण्या अशा होत्या की, जंगल ही आदिवासींची पोषणकर्ती आई आहे. तिला बंदिस्त करता काम नये. जाचक असे जमीन कर रद्द करावेत. ब्रिटिशांनी मात्र ह्याकडे दुर्लक्ष करून, एकीकडे जंगले संरक्षित केली. जंगलावर अवलंबित्व असणार्‍या आदिवासी बांधवाना जंगलात जाण्यास मनाई केली. दुसरीकडे जंगलाची अतोनात तोड करणे सुरूच ठेवले. बिरसा मुंडा आणि इतर आदिवासी यांच्या आंदोलनाने ब्रिटिशी कारवाई थांबली नसली तरी त्यांना बराच आळा बसला होता. बिरसाने ‘ब्रिटिश आणि मिशनर्‍याची टोपी एकच आहे’ असे सांगून दोघांचे आदिवासींबद्दलचे दृष्टीकोन आणि धोरणे सारखीच असल्याचे जाणिवेच्या पातळीवर जागृती तयार केली. जी ऐतखाऊ आहेत, दुसर्‍यांचे श्रम लुबाडतात त्यांच्यासाठी ‘दिक्कू’ ही संकल्पना वापरली. आदिवासींनी त्याच्या कुठल्याच नीतीला बळी पडू नये असे सांगितले.

आजचे अनेक तथाकथित विकास प्रकल्पसुद्धा ब्रिटिश धोरणापासून विशेष फारकत घेणारी नाहीत. आदिवासींनी अंगभर कपडे घालून बर्गर-पिझा खाणे म्हणजे ते ‘मुख्य प्रवाहात’ येणे अशी काहींची भाबडी समजूत तर काहींची धूर्त नीती असते. लोकांत जाणीवपूर्वक अशी समजूत निर्माण केली जाते. आदिवासींची संस्कृती, भाषा यांचे आज अनेक नवीन नवीन अभ्यास पुढे येत आहेत. आदिवासी जीवनपद्धतीत कमालीचे व्यवस्थापन, निसर्गाचे निरीक्षण आणि त्यातून नियोजन इ. गोष्टीचा अंतर्भाव असल्याचे समोर येत आहे. ही बाब ध्यानात घेतली गेली तर आपल्या अनिश्चित विनाशाकडे नेणार्‍या विकासनीतीला शाश्वत सर्वसमावेशक विकास नीतीचा पर्याय मिळू शकेल.

-बसवंत विठाबाई बाबाराव: लेखक पर्यावरण शिक्षण विषयाचे अभ्यासक असून सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट एजुकेशन, पुणे या संस्थेत प्रकल्प समन्वयक आहेत.)