घरफिचर्सअजूनही मोहिमेवरच दौडतोय !

अजूनही मोहिमेवरच दौडतोय !

Subscribe

राजकुमार तांगडे –

‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’हे आता केवळ नाटकाचं नसून एका लोकचळवळीचं नाव झालं आहे. जालना जिल्ह्यातल्या शेतीमातीत राबून सोबतच रंगकर्मीपण निभावणाऱ्या साध्यासुध्या तरुणांनी पेललेली ही कलाकृती. रसिकांच्या ओसंडून वाहणाऱ्या प्रतिसादाचा अखंड अनुभव या मनोरंजनातून प्रबोधन करणाऱ्या कलावंतांच्या वाट्याला आला. ‘शिवाजी..’ चा सातशेवा प्रयोग मागच्या सोमवारी मुंबईत ‘यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात’ ताकदीचे दिग्दर्शक-कवी नागराज मंजुळे यांच्या उपस्थितीत झाला. या औचित्याने नाटकाचे लेखक राजकुमार तांगडे यांचं हे प्रवाही मनोगत… 

- Advertisement -

आजपर्यंत महापुरूषांच्या चरित्रावर आधारलेली अनेक नाटकं  महाराष्ट्रानं पाहिली. हे नाटक मात्र आम्ही चरित्रापेक्षा विचारावर आधारित करण्यावर भर दिला. आणि लोकांनीही त्याला भरभरून प्रतिसादही दिला. अगदी आमच्या कल्पनेच्याहीपलिकडे. म्हणुनच आज सहा वर्षांनंतरही हे नाटक अनेक अर्थाने ‘जिवंत’ आहे. या कलाकृतीबरोबरच आमचीही ऊंची वाढली. खरंतर एखाद्या नाटकाचे सातशे प्रयोग होणे ही रंगभुमीसाठी मोठी गौरवाची गोष्ट आहे. कुठल्याही नाटकातील कलाकारांना तर नाटकाच्या पहिल्या-दुसऱ्याच प्रयोगाला लोक ‘अजुन नवीन काय?’ असं सहजपणे विचारतात. जसं आई न्याहारी वाढतानाच तिला आपण ‘दुपारी खायला काय करणार?’ विचारतो. पण या नाटकाच्या बाबतीत मात्र वेगळंच घडलं. प्रेक्षकांनी प्रश्न विचारले, पण काय, तर  परत कुठे शो असेल तर कळवा, आम्हाला आमच्या कुटूंबाला दाखवायचय.. मित्रांना दाखवायचंय. लोकांनी दोन-चार वेळाच नाहीतर चक्क तीस-चाळीस वेळा नाटक पाहिल्याचं सांगितलं. असं काही ऐकलं, की आम्हाला जेष्ठ रंगकर्मी डॉ.श्रीराम लागु यांचे शब्द आठवतात, ‘या नाटकाचे प्रयोग आता प्रेक्षकच घडवुन आणतील!’ आम्ही भविष्यवाणी मानत नाही. म्हणून तो ‘जाणत्याचा अंदाज’ म्हणू. आणि छत्रपती शिवराय आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची समाजाला वाटणारी गरज प्रेक्षकांना खेचुन आणते म्हणुया.

सर्व कलाकार शेतकरी  
छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आणि यासारख्या सर्व महामानवांच्या विचारात समाजाला एकत्र बांधू शकणारी एक चौकट देण्याची क्षमता आहे. हे आपले पुर्वज आहेत. आपल्या पुर्वजांच्या इतिहासाचं विद्रुपीकरण, विचारांचं विकृतीकरण होणार नाही याची काळजी आपणच, म्हणजे त्यांच्या विचाराच्या वारसदारांनी घ्यायला हवी. तरच तो इतिहास आपल्या समाजाचा वर्तमान प्रकाशमान करेल. आम्ही सर्व टीममधले लोक परंपरागत शेतकरी असल्याने शिवरायांच्या विचाराचे थेट वारस लागतो. छत्रपती शिवराय म्हणजे शेतकऱ्यांचा, दिन-दलितांचा, सर्वधर्मीयांचा राजा. पण काही दांभिक राजकीय, धर्मांध लोकांनी शिवरायांचा विचार जाणीवपूर्वक मोडतोड करून, आपल्या सोईने सांगुन समाजाचे धृवीकरण केले. पुढे यातून समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न झाले. अजुनही त्याच्या झळा सोसाव्या लागतात. मग ती कालची औरंगाबादची दंगल असो की  परवाची भिमा-कोरेगावची. दंगलीचे मास्टर-माईंड सोईस्कर या महापुरूषांच्या नावाचा वापर करून जनभावना भडकावत आपल्या पोळ्या भाजतात. त्यासाठी महापुरूषाच्या नावाचा तेलासारखा वापर करतात. समाजाचं सरपण बनवतात. या कटाला खीळ घालण्यासाठीच ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भिमनगर मोहल्ला’ या नाटकाची निर्मीती करण्यात आली.

- Advertisement -

 

संभाजी भगतांच्या संकल्पनेला नाटकात बांधले 
हे नाटक करण्यापुर्वी ‘रंगमळा’ ही जालन्यातल्या शेतकऱ्यांची अलिखीत संस्था शेती-मातीचे प्रश्न घेऊन रंगभुमीवर धडपडत होती. तेव्हाच लोकशाहीत  दीन-दलित-कष्टकऱ्यांचा आवाज बनलेले लोकशाहीर संभाजी भगत महाऱाष्ट्र पिंजुन काढत होते. उमदा अभिनेता कैलास वाघमारे हा आमच्या कुटूंबाचा सदस्य. त्याने आमची संभाजी सरांशी भेट करावली. भागात सरांनाही त्याच काळात ‘राजे शिवाजी यांच्यावर एक जलसा उभारला पाहिजे’ असं आतून वाटत होतं! मग संभाजी भगतांच्या या संकल्पनेला नाटकात बांधण्याचे काम मी केले. एरवी एखादा लेखक नाटक लिहीतो आणि नंतर कलाकारांचा शोध घेतला जातो पण या नाटकात अगदी सर्वच्या सर्व कलाकार हे नाटक लिहायला घेण्याअगोदरच बरोबर होते. त्यामुळे एक प्रकारे कलाकारांचं शिबिरही समांतरपणे होत होतं. अचूक तपशील आणि विज्ञाननिष्ठ लिखाणासाठी काही जाणते तज्ञ आणि पुस्तकांची गरज होती. ती अभ्यासक चंद्रशेखर शिखरे, श्रीमंत कोकाटे, प्रदीप सोळंके यांनी भरून काढली. शहीद कॉं.गोविंद पानसरे, कॉ.शरद पाटील यांच्या विचाराची शिदोरी पण सतत गाठीशी होतीच. हे नाटक लिहून पूर्ण होत असतानाच आम्ही याचं दिग्दर्शन संभाजी तांगडे व कैलास वाघमारेनीच करावं असा आग्रह धरला. तो त्यांनी नम्रपणे नाकारला. पुढे आमच्या ‘रंगमळा’साठी गॉडफादर असणारे अभिनेते नंदू माधव यांनी नाटकाचं वाचन मुंबईला ठेवलं. आम्हा सर्वांच्या आग्रहाखातर ते आमच्या टिममध्ये सामील झाले आणि कैलास व संभाजीनं गळ घातल्यावर ते दिग्दर्शनासही तयार झाले.

ध्येय एकच… शिवराय- भिमराय यांचक विचार पोचवणं
दरम्यान, या नाटकाची निर्मीती करताना सुरवातीलाच खूप सारे मदतीचे हात समोर आले. ज्यांची श्रेयनामावली आम्ही नाटकाच्या मध्यंतरी वाचतोच. त्यात प्रामुख्याने विजयआण्णा बोराडे, चंद्रशेखर शिखरे, ‘केशव गोरे स्मारक ट्रस्ट’चे युवराज मोहीते व कुंभार पिंपळगाव येथील एक-एक महीन्याच्या तालमीचा भार ऊचलणारे मा.ना.अर्जुन खोतकर व लक्ष्मण वडले असे अनेक जण… या नाटकाच्या १४५ दिवस निवासी तालमी झाल्या. त्यात या कलाकारांना खूप काही सोडुन द्याव लागलं. त्यात आमच्या गजेंद्र तांगडेनी अडचन होते म्हणुन बैल विकले, कैलास वाघमारेने तात्पुरती मुंबई सोडली तर नारायणने विटभट्टीवरचं काम सोडलं, मधुकरने शिलाई मशिन चालवणं सोडलं, संभाजी तांगडेने कॉलेजवर शिकवणं तर लहानग्या वसुंधराने चक्क शाळेत जाणं सोडलं. तेव्हा अगदी आमच्या घरच्यांना देखील संशय वाटायला लागला. लोकं ‘नेमकं हे सगळे काय करतात?’ असं विचारू जाऊ लागले. ध्येय एकच, शिवराय आणि भिमराय यांचा विचार पोचवणं !

त्यात एकही ‘स्टार’ नाही
आम्ही शेतकरी..पिकवु शकतो पण विकू शकत नाही. ते स्कील आमच्यात नसतं थवा आम्ही ते मिळवण्याचा प्रयत्न केला तर आमचा मूळ आत्मा हरवण्याची दाट शक्यता होती. हे नाटक जरी लोकसहभागातुन निर्माण झालं असलं तरी ते चालवण्यासाठी सक्षम निर्मात्याची गरज आता भासू लागली. नंदु माधवांनी तीन-चार निर्मात्यांना ते दाखवलं. एखाद्या ऊपवर मुलीला पाहायला येऊन जर चार-पाच ठिकाणच्यांनी नकार दिला तर जी मानसिकता व्हावी तीच आमची झाली होती. निर्माते नुसते पाहून जायचे पण ते कुणालाच पचनी पडेना. एकही ‘स्टार’त्यात नाही. त्यामुळं कुणाचंच मन नाटकावर बसलं नाही. तसं पाहता छत्रपती व बाबासाहेबांचे विचार ह्यांच्यापेक्षा कुठला स्टार मोठा असतोका? मात्र याचं भान त्यांना नसावं. आणि विशेष म्हणजे, तोवर मातीतल्या माणसाला चेहरा देणारा फॅंन्ड्री आणि सैराट आला नव्हता! म्हणुन स्वतः नंदु माधवांनी स्वत:च्या ‘पब्लिक ओपिनियन’ या संस्थेमर्फत हे नाटक चालवलं. जवळजवळ चारशे प्रयोग त्यांनी केले. स्वतः नंदु माधव प्रयोगावर बारकाईने लक्ष ठेवुन होते. नाटकाला विरोध होण्याची सुरूवातच झाली ती मुळी या नाटकाच्या वर्तमानपत्रातील जाहिरातीने. कुठलेच माध्यमसमूह ती लवकर स्वीकारत नव्हते तेव्हा स्वत: पत्रकार युवराज मोहीते व नंदु माधव यांनां जाहीरातीवर लिहाव लागलं, ‘नाव वाचुन दचकू नका. नाटक पहाल सोबत याल. ‘नंदु दादांनी हे नाटक जातीने पोचवलं. त्यानंतर आलेल्या सारा एंटरटेन्मेंट आणि निर्माता भगवान मेदनकरांनी सातशेव्या प्रयोगापर्यंत दमदार मजल मारली. कलासक्त आणि दिलदार माणुस. जसे आम्ही व्यवसायिकाच्या कक्षेत बसत नाही तसेच तेही टिपीकल निर्मात्याच्या प्रतिमेत मावत नाहीत. सुरूवातीला आम्हाला अव्दैत थिएटरचे राहुल भंडारे यांनी हे नाटक चालवण्यासाठी बॅनर पुरवलं. त्यांनी तारखा उपलब्ध करून देणं, स्वतः जातीने हजर राहणं यामुळे हे नाटकं व्यावसाईक रंगभुमीवर टिकू शकलं. यात आम्हाला मोलाचं सहकार्य केल ते माध्यमांच्या प्रतिनीधीनीं… या नाटकाला जिथे जिथे वैचारीक विऱोध झाला तीथे-तीथे आमच्या माध्यमातल्या भावंडांनी आम्हाला सपोर्ट केला. अगदी आमच्या कुंभारपिंपळगाव पासुन ते दिल्लीच्या प्रेक्षकांपर्यंत ते पोचवलं.

महाराष्ट्रभर या नाटकाचे पाठीराखे
या नाटकाला पेललं ते वेगवेगळ्या सामाजिक चळवळींनी. अगदी फुकट दाखवण्यापासुन ते चळवळीला निधी ऊभारण्यासाठी पाच-पाच हजार रुपये तिकीटाचे शो झाले. या नाटकाचे प्रेक्षक हे सर्व स्तरातले राहिलेत. ‘आम्ही आयुष्यात पाहिलं आणि दुसरंही हेच नाटक पाहतोय’ अशी कबुली देणारे प्रेक्षक लाभले. महाराष्ट्रभर या नाटकाचे पाठीराखे आहेत आमचे चाहते आहेत याची जाण आम्हाला तेव्हा झाली जेव्हा आमच्या गाडीला अपघात झाला आणि आमचा एक मावळा आम्ही  गमावला. तेव्हा आम्ही पोचायच्या आत माजलगावच्या जाधव सर आणि इतर कार्यकर्त्यांनी त्यांना औरंगाबादच्या  एम. जी. एम हॉस्पीटलमधे दाखल केलं होतं. हॉस्पिटलची टीमही आमच्यासाठी फरिश्ताच बनून आली. डॉ. शिंदे, रमेश डाके, एकनाथ कदम, ऍड. महेश भोसले, डॉ.रेवत कानिंदे अशी कितीतरी नावं सांगता येतील. झी वाहीनीने आम्हाला आर्थिक मदतीचा हात दिला. या जिवघेण्या प्रसंगातुन स्वतःला सावरून ऊभा राहणारा आमचा प्रविण डाळींबकर खरंच शिवबाचा बाजी-तानाजी वाटतो. शिवराय आणि बाबासाहेबांचा विचार पोचवताना आम्ही कलाकार माणूस बनण्याच्या दिशेने निघालो. आमच्या छोट्या वसुंधराला बावीस प्रतिज्ञा वाचायला मिळाल्या, वैष्णवीने मुख्य भुमीका केलेला ‘क्षितीज’ लघुपट कान्स मधे झळकला. अश्विनी पीएचडी करत डॉ. अश्विनी भालेकर झाली. कैलास वाघमारे अभिनयाच्या मुख्य प्रवाहात येतोय, संभाजी तांगडेनी ‘सैराट’सारख्या सिनेमात आपल्या अभिनयाची चुणूक दाखवली. मिनाक्षी राठोड अभिनीत ‘मयत’ लघुपटाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. मधुकर बिडवे, गजेंद्र तांगडे, प्रविण , नारायण वाघमारे, किशोर उढाण, राजु सावंत, श्रावणी तांगडे सगळेच कलाकार माणुसपणाकडे जाण्याची धडपड करताहेत हीच मोठी ऊपलब्धी आहे. आम्ही जेव्हा नाटकाच्या दौऱ्यावर निघतो तेव्हा. आम्ही मोहीमेवर निघतो. शिवरायांच्या जिरेटोपाचं माप समाजाच्या कवटीशी नाही, तर मेंदुशी जुळवण्यासाठीच्या मोहिमेवर!

Rashmi Manehttps://www.mymahanagar.com/author/rashmi/
गेल्या ११ वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात सक्रिय. प्रिंट, डिजीटल मीडियामध्ये काम करण्याचा अनुभव. मनोरंजन, सामाजिक, सांस्कृतिक विषयांवर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -