घरफिचर्सपितृसत्तेला प्रश्न विचारणार्‍या ‘शोधिनी’!

पितृसत्तेला प्रश्न विचारणार्‍या ‘शोधिनी’!

Subscribe

ही गोष्ट आहे नाशिकजवळच्या एका आदिवासीबहुल गावात राहणार्‍या आशा-द्रौपदा नावाच्या जोडगोळीची. स्त्रियांच्या सक्षमीकरणाची आणि स्त्रीवादाच्या संघर्षाची चर्चा करताना मला हरवेळी या दोघी आठवत राहतात. नुसत्या आठवतच नाही तर आजूबाजूच्या पितृसत्ताक आणि लिंगभावाविषयी संवेदनशील नसणार्‍या व्यवस्थेविषयी बोलताना या दोघी मला कृतीशील वस्तूपाठ घालून देताना दिसतात. या दोघींसारखे धाडस आणि हिंमत इथल्या हरेक मुलीने आणि बाईने दाखवली तर आपणच उभी केलेली ही पितृसत्तेची दमनकारी व्यवस्था आपण पोखरू शकतो ही आश्वासक जाणीव त्या देतात. आणि अशा भक्कम, स्व-जाणीव धारदार असलेल्या मुली तयार करण्याचा एक प्रयत्न नाशिकमध्ये सुरु आहे. नाशिकमधील अभिव्यक्ति मीडिया फॉर डेव्हलपमेंट ही सामाजिक संस्था गेल्या 4 वर्षांपासून ‘शोधिनी’ या एका ग्रामीण भागातील मुलींच्या आयुष्यावर कृती संशोधनाचे काम करते आहे. या प्रयत्नाचा मी एक भाग आहे.

ती म्हणाली, येऊ दे ना त्यांना. बघतेच मी काय करता ते. जास्तीत जास्त चिरून टाकतील या उप्पर काय करणार हाय. असं कसं आम्हाला रेशन देणार न्हाय. द्यावंच लागल. तो हक्क हाय आमचा. आमच्या मागं कुणी नसलं म्हणून काय झालं, मी हाय की खमकी. एकेकाला सरळ करीन. दरवाजाच्या चौकटीवर उभी राहून ती बोलत होती. डोळ्यातला राग फक्त राग आणि चीड नाही तर विद्रोह वाटावा इतक्या तीव्रतेने ती दडपून टाकण्याचा यशस्वी प्रयत्न करणार्‍या व्यवस्थेच्या भिंतीला तडा होत होती. कौरव वस्त्रहरण करत असताना भर सभेत द्रौपदीने कानभर टाहो फोडावा असे तिचे शब्द कानावर आदळत होते. हा टाहो फोडण्याचे बळ कदाचित तिचे ‘द्रौपदा’ हे नावच तिला देत असावं. वय वर्ष 15. उशाशी कुटुंब नाही. 5 वर्षाची असताना तान्ही बहीण झोळीत सोडून आई आपल्या प्रियकरासोबत निघून गेली. काही वर्षांनी वडील वारले. सांभाळ करणारी आत्या वारली. आजोबाही गेले. आता आयुष्यात उरली नसली तरी 13 वर्षाच्या ‘आशा’ नावाच्या बहिणीसोबत ती आशा शोधत राहते. दरवेळी वस्त्रहरण होत असताना वस्त्र पुरवायला कृष्णाचीच वाट पाहण्याची काय गरज? या दोघीच एकमेकीसाठी गरज पडेल तसं कृष्ण होतात. भर सभेत एकमेकीला आणखी लढण्याचा आधार देतात.

तरुण पोरी एकट्या राहतात म्हटल्यावर आपापला फायदा ओरबाडण्यासाठी सगळ्यांची जणू शर्यतच लागलेली असते. त्या दोघी गावच्या रहिवासी असूनही मूलभूत कागदपत्र ग्रामपंचायतीतून मिळत नाहीत, गावाच्या सण समारंभात यांचा सहभाग चुकून खवट शेंगदाणा दातात आल्यासारखा गावकर्‍यांचा चेहरा करणारा ठरतो, सोयी मिळत नाही, रेशन मिळत नाही, सन्मानाची वागणूक मिळत नाही. आधीच मुली आणि त्यातही बेवारस मुली म्हणजे या व्यवस्थेसाठी तर अन्याय करण्यासाठी दुग्धशर्करा योगच! कुठल्याही ढालीविना इथल्या वर्षानुवर्षे रुजलेल्या पुरुषप्रधान व्यवस्थेशी झगडणारी इवलीशी द्रौपदा आणि तिला हरवेळी आधार देऊन आपल्या नावाप्रमाणेच आशा दाखवणारी धाकटी बहीण ‘आशा’ समाजातल्या या पितृसत्ता प्रसवणार्‍या agents ना दरवेळी हरवते. मुली स्वतःच्या गरजा पूर्ण करण्याइतपत स्वतंत्र आणि self sustained होऊ नयेत, तशा त्या झाल्या तर त्या स्वतःचं जग उभारून व्यवस्थेची व्यवस्थागिरी खपवून घेणार नाहीत, प्रश्न विचारतील.

- Advertisement -

म्हणूनच तर त्यांना नेहमी कुठल्यातरी व्यवस्थेच्या, सामाजिक संस्थांच्या कोशात ठेवले जाते. जिथे त्यांचं मुलगी असणं नेहमी आणखी गडद केलं जातं. आपण कसे परावलंबी आहोत हे मनावर बिंबवलं जातं आणि पितृसत्तेने तयार केलेल्या साच्यांच्या गर्दीत त्यांना वाजतगाजत सामील केलं जातं. ही सगळी स्वतःला स्वतःपासून दूर नेणारी आणि स्त्रियांच्या क्षमता क्षीण करणारी किंवा निदान त्या क्षीण आहेत हे दाखवणारी व्यवस्था नाकारणार्‍या या दोन मुली मला ‘आशेचा’ किरण वाटतात.

ही गोष्ट आहे नाशिकजवळच्या एका आदिवासीबहुल गावात राहणार्‍या आशा-द्रौपदा नावाच्या जोडगोळीची. स्त्रियांच्या सक्षमीकरणाची आणि स्त्रीवादाच्या संघर्षाची चर्चा करताना मला हरवेळी या दोघी आठवत राहतात. नुसत्या आठवतच नाही तर आजूबाजूच्या पितृसत्ताक आणि लिंगभावाविषयी संवेदनशील नसणार्‍या व्यवस्थेविषयी बोलताना या दोघी मला कृतीशील वस्तुपाठ घालून देताना दिसतात. या दोघींसारखे धाडस आणि हिंमत इथल्या हरेक मुलीने आणि बाईने दाखवली तर आपणच उभी केलेली ही पितृसत्तेची दमनकारी व्यवस्था आपण पोखरू शकतो ही आश्वासक जाणीव त्या देतात. आणि अशा भक्कम, स्व-जाणीव धारदार असलेल्या मुली तयार करण्याचा एक प्रयत्न नाशिकमध्ये सुरु आहे. नाशिकमधील अभिव्यक्ति मीडिया फॉर डेव्हलपमेंट ही सामाजिक संस्था गेल्या 4 वर्षांपासून ‘शोधिनी’ या एका ग्रामीण भागातील मुलींच्या आयुष्यावर कृती संशोधनाचे काम करते आहे. या प्रयत्नाचा मी एक भाग आहे याचे समाधान तर मोठे आहेच पण तळागाळात रुजलेल्या अशा स्त्रीवादी चळवळीच्या फांद्या अशा जवळून अनुभवण्याची आणि त्या भक्कम करण्यासाठी हातभार लावण्याची अनुभूती आहे.

- Advertisement -

कर्ट लेविन नावाचा सामाजिक अभ्यासक म्हणतो की, कुठल्याही समाजिक संरचना अभ्यासण्याचा सगळ्यात उत्तम मार्ग म्हणजे त्या संरचना बदलणं. लोकांनी, लोकांसाठी तयार केलेल्या व्यवस्था लोकांनाच अन्यायकारक वाटत असतील तर त्या बदलण्यासाठी लोकच हवे असतात. म्हणून मुलींना शिक्षणापासून, स्वतःच्या सन्मानपूर्वक आयुष्यापासून, निर्णय स्वातंत्र्यापासून दूर ठेवणारी पितृसत्तेची ही व्यवस्था बदलण्यासाठी मुलीच स्वतः उभ्या राहतील आणि या सामाजिक क्रांतीची सुरुवात ‘स्वतःच्या मर्जीविरुद्ध लग्न करणार नाही’ अशा एखाद्या अगदी छोट्या पण मुळाशी गेलं तर खूप महत्वाच्या अशा निर्णयापासून करतील या उद्देशाने काम करणार्‍या या दहा गावांमधल्या शंभर मुली, शंभर शोधिनी!

आपले आणि आपल्या गावातल्या मुलींचे प्रश्न काय आहे? गावात मुलींच्या वाढीसाठी पूरक आणि मारक अशा कुठल्या व्यवस्था आहेत? पितृसत्तेचं मूळ असलेल्या या समाजव्यवस्थेचा परिणाम मुलींच्या विकासावर कसा होतो आहे? गावात अशी नेमकी काय गोष्ट मुलींना स्वत:चे शिक्षण पूर्ण करण्यापासून थांबवते? त्या कारणांमुळे शिक्षण सोडावे लागले असले तरी भविष्यात या मुलींच्या उपजीविकेसाठी पारंपरिक शिक्षणाव्यतिरिक्त काही पर्याय उभे करता येऊ शकतील का? पुस्तकातून पुरवल्या जाणार्‍या माहितीला जर आपण शिक्षण म्हणत असू, तर या शाळेत न जाणार्‍या किंवा कधीच शाळेत न गेलेल्या मुलींकडे असणार्‍या आणि कुठल्याच पुस्तकात नसणार्‍या कौशल्यांना आपण कुठल्या व्याख्येत बसवणार आहोत? लग्नापूर्वी मजुरीचे साधन आणि लग्नानंतर मुलं जन्माला घालून घर सांभाळण्याचे ‘साधन’ या पितृसत्तेने ठरवून दिलेल्या साच्यात गुदमरलेली या मुलींची सर्जनशील स्वप्नं काय आहेत? ही स्वप्नं पूर्ण करण्यासाठी व्यवस्थेला झुगारून कुठल्या दिशेने प्रयत्न करता येतील याविषयी व्यवस्थेच्या दृष्टीने स्वप्नवत असणारी त्यांची कल्पना काय आहे? या मुलींच्या आयुष्यातील सगळ्याच समस्यांचे एकमेव उत्तर असणार्‍या ‘लग्न’ या संकल्पनेलाच प्राथमिक प्रश्न विचारून उत्तरापर्यंत पोहोचता येईल का? या आणि अशा अनेक अस्वस्थ करणार्‍या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न या संशोधनाच्या प्रक्रियेदरम्यान होतो आहे.

हे सहभागी पद्धतीने करायचे कृतीसंशोधन असल्याने इथे संशोधनातून आलेल्या निष्कर्षांइतके महत्व बदलासाठी करायच्या कृतीला तर आहेच. पण हे संशोधन कुणी संशोधक म्हणून शिक्षण घेतलेल्या पदवीधराने करायचे नसून ज्यांच्या समस्या सोडवायच्या आहेत त्यांनी स्वतःच करायचे आहे. त्यामुळे यात संशोधक आणि संशोधनाचा विषय अशी दुहेरी भूमिका बजावणार्‍या मुली जेव्हा संधी आणि संसाधनांपासून वंचित ठरलेल्या अशा आपल्यासारख्याच मुलींची आयुष्य जाणून घेण्यासाठी आणि त्यात बदल करण्यासाठी संशोधन करतात तेव्हा तो शोषिताने व्यवस्थेला दिलेला धक्का असतो.

सध्या मासिक पाळी सुरु असताना मंदिरात प्रवेश करून, नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह असताना तब्बल 60 पेक्षा जास्त दिवस टिकून राहिलेले आंदोलन उभारून, आंदोलनांचे नेतृत्व करून, सैन्यात वरच्या पदांवर काम करून, अपारंपरिक ठरवल्या गेलेल्या आणि म्हणून आव्हानात्मक असलेल्या संधींची रोजगारासाठी निवड करून अनेक तडे आपण सारे मिळून व्यवस्थेला देत आहोत. या सार्‍याच्या पार्श्वभूमीवर छोट्या छोट्या गावांमध्ये राहून, आपले काम चटकन फेसबुकवरून जगापर्यंत पोहचवण्याचे प्रिव्हिलेज नसलेल्या या मुलीसुद्धा या प्रवासात खूप मोठे योगदान देत आहेत. त्यांच्या या प्रयत्नांचं कौतक व्हावं आणि सार्‍यांपर्यंत हे काम पोहचून त्यांना बळ मिळावं म्हणून हा लेख.

ज्ञानावरची मक्तेदारी एका विशिष्ठ वर्गाकडे असताना शोषित आणि दुर्लक्षित वर्गाचा त्या ज्ञानाशी काही संबंध नसतो. शोषितांच्या जगण्यातले आणि त्यांच्या अनुभवांवरून आलेले ज्ञान या मुख्य प्रवाहात येत नाही किंवा आपण त्याला ज्ञान म्हणून मान्यता देत नाही. जोपर्यंत इतिहास शिकार्‍याच्या नजरेतून लिहिला जाईल तोपर्यंत शिकार्‍याच्या शौर्याची आणि धाडसाची गोष्टच जगापुढे जाईल, पण हरणाच्या नजरेतून इतिहास लिहिल्याशिवाय त्याचे भेदरलेपण आणि जीव वाचवण्याची धडपड कुणासमोर येणार नाही. म्हणून या Intellectual Hegemony ला आव्हान देण्यासाठी पितृसत्ताक व्यवस्थेत शोषित म्हणून गणल्या गेलेल्या मुलीच आपल्या जगण्याची आणि स्वप्नांची गोष्ट यातून सांगताय. ही गोष्ट सांगताना गोष्टीतली काही नको असलेली आणि भविष्यात येणारी अन्यायकारक वळणं बदलण्यासाठीही त्या काम करताय.

प्रत्येक गावात मुख्य ग्रामसभेच्या आधी महिला ग्रामसभा व्हायला हवी आणि त्यात चर्चा केलेले मुद्दे दुसर्‍या दिवशीच्या मुख्य ग्रामसभेत मांडले जावेत अशी तरतूद आहे. पण ‘शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये आणि बाईने ग्रामपंचायतीची चढू नये’ हे मानल्या जाणार्‍या गावांमध्ये ही तरतूद फक्त कागदावरच उरते. अशाने बायकांचे आणि मुलींचे प्रश्न एकतर ग्रामसभेत मांडलेच जात नाही आणि जरी मांडले गेले तरी त्यावर पुन्हा शिकार्‍याच्या नजरेतून चर्चा होते. स्थानिक प्रशासन आणखी जास्त सहभागी करण्यासाठी उभी राहिलेली ग्रामपंचायतीची व्यवस्था मात्र बायकांना तितकं प्रभावीपणे सहभागी करून घेण्यात कमी पडते आणि सरपंच बाई असली तरी ‘सरपंच पती’ तोर्‍यात पद मिरवतात. अशा काळात आणि अशा गावांमध्ये या मुली ग्रामपंचायतीत जाऊन सरपंच आणि पदाधिकार्‍यांशी बोलल्या.

प्रशासनात महिलांचा सहभाग वाढला पाहिजे आणि त्यासाठी तुम्ही संस्थात्मक प्रोत्साहन दिलं पाहिजे हे सांगितलं. आतापर्यंत कधी आपल्या घरातसुद्धा तोंड न उघडणार्‍या मुली अशा गट करून ग्रामपंचायतीत जाऊन धीराने बोलतात आणि व्यवस्थेतील लिंगभावाशी जोडलेले कच्चे दुवे पक्के करायचं काम करतात. फक्त सभेसाठी वातावरण तयार करणंच नाही तर या सभांमधून काही पक्कं घडावं यासाठीही प्रयत्न करताय. गावात मुलींची लवकर आणि इच्छेविरुद्ध लग्न होतात आणि त्याविरुद्ध लढण्यासाठी एकट्या मुलीची ताकद कमी पडते. शोधिनींनी ग्रामसभांमध्ये हा लग्नाचा विषय मांडत चर्चा करायला सुरुवात केली आणि ही अशी लग्न व्हायला नको यासाठी गावकर्‍यांना पटवण्याचं काम त्या करताय. इतक्या वर्षांपासून रुजलेली एखादी व्यवस्था अशी काही सभांमधून लगेच बदलणार तर नाहीच पण तिला आतून धक्का द्यायला आणि प्रश्न विचारायला सुरुवात होतेय हे आशादायक आहे.

शहरातल्या सारखे मॉल्स, सिनेमा थिएटर किंवा कॅफेजच्या जमान्यात गावात मुलींना भेटायला अशी कुठली ठरलेली जागा नसते. सार्वजनिक जागा असल्या तरी त्या हळहळू फक्त ‘पुरुषांच्या जागा’ होतात. मग विहिरीवर पाण्याला जाताना, नदीवर कपडे धुतांना किंवा शेण काढायला जाताना या गावच्या पोरी एकमेकींना भेटतात आणि मनातल्या चार गोष्टी बोलतात. त्याव्यतिरिक्त कुठलीच जागा ही फक्त त्यांच्यासाठी बनलेली नसते. व्यक्त होण्याच्या, स्वतःच्या आवडीचं असं एक वर्तुळ तयार करण्याचा आणि मैत्री करण्याचा मूलभूत हक्कसुद्धा या मुलींना मिळत नाही. संशोधन करत असताना ही गोष्ट मुलींना पहिल्यांदा जाणवली आणि ती बदलायची असं त्यांनी ठरवलं आणि या निश्चयातून गावात ‘शोधिनी वाचनालय’ सुरु झालं. हे वाचनालय म्हणजे फक्त पुस्तकं वाचण्याची किंवा ठेवण्याची जागा नाही तर इथे शोधिनी आणि गावातल्या मुली रोज जमतात. रोज आपल्या नवीन मैत्रिणींना घेऊन येतात, गप्पा मारतात, स्वतःच्या आत सुरू असलेली खळबळ सांगतात आणि एक भक्कम असं Collective तयार करतायत.

शोषितांचे प्रश्न कधीच वैयक्तिक नसतात ते एका समूहाचे प्रश्न असतात. पण याची जाणीव होण्यासाठी शोषितांचा समूह तयार होणं गरजेचं असतं. हा समूह तयार झाल्याशिवाय शोषण करणार्‍या व्यवस्थेशी झागडणं शक्य होत नाही. शोधिनी वाचनालयात मुली जशाजशा यायला लागल्या तसतसा त्यांना एक समूह मिळाला. आणि अमक्याची नात, तमक्याची मुलगी किंवा ढमक्याची पुतणी ओळख असलेल्या या मुलींचा घोळका आता गावात ‘शोधिनी’ म्हणून ओळखला जातो. मुलींच्या आयुष्यात घडणार्‍या सगळ्या गोष्टींविषयी संवेदनशील असणारा असा हा शोधिनींचा गट प्रसंगी गावात दबाव गट म्हणूनसुद्धा काम करतो. मुलींची ही स्वतःची अशी जागा स्वीकारणं गावासाठीसुद्धा अजिबात सोपं नव्हतं. त्यांनी वाचनालयाचा हा प्रयत्न उलथवून टाकण्याचे प्रयत्न सुद्धा केले. बर्‍याचदा शोधिनी हतबल आणि निराशसुद्धा झाल्या. पण निराशेतून प्रश्न सुटणार नाही या जाणीवेने याविरोधाशी लढायची बळ त्यांना मिळाले.

अक्षरओळख होण्याइतपत शिक्षण मग शेतात किंवा कंपनीत मजुरी आणि मोठी दिसायला लागली की, लग्न असा आणि फक्त असाच वर्षानुवर्षे आयुष्यक्रम असणार्‍या मुलींनी स्वतःच्या आयुष्यात बदल घडवून आणण्यासाठी असे काही पाऊल उचलणे हेच मोठे धैर्याचे काम होते. मुलींचे पालक, गावकरी यांच्यासाठी मुलींच्या हातात आता विळा-कोयता किंवा चुलीची फुंकणीच नाही तर कागद-पेन, संगणकसुद्धा बघणं ही नवीन आणि मुलींभोवती तयार झालेले सामाजिक वर्तुळ भेदणारी गोष्ट होती.

स्वतःच्या मर्जीविरुद्ध लग्न ठरत असताना त्यासाठी भांडून, आईवडिलांना समजावून त्यातून मार्ग काढणे, शिक्षण पूर्ण करण्यासाठी घरातून आणि गावातून मोठाच विरोध असताना ताकदीने स्वतःचे औपचारिक शिक्षण पूर्ण करणे, घरातील आणि आता गावातीलही निर्णयप्रक्रियेत सक्रीय सहभाग घेणे आणि त्यासाठी झगडणे, स्वतःची वेगळी ओळख तयार करणे, त्या ओळखीसाठी सन्मान मिळवणे या आणि अशा कितीतरी छोट्या छोट्या पातळ्यांवर आता शोधिनी भक्कमपणे आपली लढाई लढत आहेत आणि जिंकतसुद्धा आहेत. आपल्याच घरात मुलगा आणि मुलगी यांच्यात आतापर्यंत होणारा भेदभाव आता त्यांना अस्वस्थ करतो. घरात, शाळेत, गावात होणारी लैंगिक हिंसा किंवा तत्सम कृती आता खाली मान घालून सहन न करता त्याविषयी त्या मोकळेपणाने बोलू लागल्या आहेत. कुणीतरी घेतलेला निर्णय चकार शब्द न काढता स्वीकारणार्‍या मुली आता मात्र लहान लहान गोष्टींविषयी चिकित्सक विचार करत आहेत. त्यांच्यावर होणारा अन्याय आणि पिळवणूक गपगुमान सहन न करता आता आपल्या वेदनांना वाचा फोडून त्यावर पर्याय शोधण्याचा प्रयत्न त्या करत आहेत.

शोधिनींनी आपल्या गावातल्या मुलींच्या शिक्षणाच्या अडचणी काय आहेत, गावात मुलींची लवकर लग्न होण्याची कारणं काय आहेत, गावात हिंसा होते आणि त्याचा मुलींवर कसा परिणाम होतो इथपासून ते मासिक पाळी, निर्णयस्वातंत्र्य, मजुरी करणार्‍या मुलींचे प्रश्न अशा कितीतरी विषयांवर संशोधन केले आहे. या संशोधनातून आलेले निष्कर्ष आणि शिफारशी तर खूप महत्वाच्या आणि ग्रामीण भागातील मुलींच्या आयुष्याचे चित्र आपल्या सर्वांसमोर उभं करणार्‍या आहेतच. पण लाल रिबीन बांधलेल्या आणि हातात विळा कोयता असलेल्या या मुलींनी हातात कागद पेन घेऊन गावभर मुलींना भेटत, माहिती जमा करत फिरणं हे गावाच्या पातळीवर एका मोठ्या सत्तेला आणि Stereotype ला आव्हान देणारं होतं.

मुली म्हणजे चूल-मूल आणि या मुलींच्या आयुष्यात लहानपण आणि लग्न यामधल्या काळात फक्त रिकाम्या जागा भरण्यासाठी येणारी शाळा हे चित्र बुद्धीवळणी पडले असल्यामुळे मुलींनी असं काहीतरी संशोधन करणं हे गावाला पटायला वेळच लागला. किंबहुना, ते अजूनही पूर्ण पटलेलं नाही. आतापर्यंत घर, शाळा, विहीर, नदी, पिठाची गिरणी, लाकुडफाटा आणण्याची जागा यापलीकडे गाव माहीत नसलेल्या मुली या संशोधनाच्या निमित्ताने गावभर फिरल्या. जात, वर्ग, धर्म किंवा लिंग यानुसार झालेले गावाचे विभाजन कागदावर पाहणे आणि हा विभाजनावर आधारलेला गावगाडा मुलींच्या विकासासाठी कसा प्रतिकूल प्रतल तयार करतो हे समजणे मुलींसाठी नकारात्मक आश्चर्याचे होते.

गावांची आणि मुलींची निवड करण्यापासून ते इथपर्यंत शोधिनींचा हा प्रवास मी पाहिलाय. मुलींना त्याच त्या ठरलेल्या साच्यातून बाहेर पडण्याची फक्त साधी एक संधी जरी मिळाली तरी त्या संधीचा वापर करून त्या कुठपर्यंत पोहचतात हे दाखवून देणारं हे काम आहे. स्त्री म्हणून स्वतःचा सन्मान करणं शिकवणारं, आपले वेगळे अस्तित्व निर्माण करायला शिकवणारं, अधिकार-हक्कांबाबतची युगानुयुगाची झोप मोडणारं हे काम माझ्या आतली बाई जिवंत ठेवतंय.

गावात प्रत्यक्ष काम करणार्‍या, संशोधन करणार्‍या अशा 10 गावांमधून फक्त 100 शोधिनी असल्या तरी या माध्यमातून त्या आपल्या आजूबाजूच्या अनेक मुलींना भेटतात, त्यांना आपल्या कामात आणि उद्दिष्टात जोडून घेतात. चर्चा करतात. त्यांच्या या चर्चा आता अधिक चिकित्सक आणि आशयघन होत आहेत, स्वतःच्या आयुष्यातील निर्णयांवर त्यांचे नियंत्रण येते आहे, घराच्या निर्णयप्रक्रियेत त्यांचा सहभाग वाढतो आहे, गावाच्या स्थानिक प्रशासनात त्यांचा हस्तक्षेप महत्वाचा ठरतो आहे. गावागावांमध्ये मुलींच्या आयुष्यात होणारा हा बदल भवतालात होऊ घातलेल्या एखाद्या मोठ्या परिवर्तनाची ठिणगीसुद्धा ठरू शकतो, ती ठरावी अशी आशा. आमेन!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -