घरफिचर्सवड असतो बापागत!

वड असतो बापागत!

Subscribe

शाळा, कॉलेजची मुले, ग्रामस्थ आणि कार्यकर्ते यांच्या मदतीने सातारा, बीडसारख्या दुष्काळी भागात अभिनेता सयाजी शिंदे आणि लेखक दिग्दर्शक अरविंद जगताप यांनी हिरवाई नटवली आहे. आज दगड, धोंडे आणि ओसाड माळरानावर अनेकविध हिरवीगर्द झाडे डोलू लागतात, फळाफुलांनी बहरून जातात, अनेक प्रकारचे पक्षी आपला आसरा शोधत मधूर गायन करतात तेव्हा एक निसर्ग नव्याने उभा राहतो. जो शाश्वत असून आदिम काळापासून त्याने हाच भरवसा देऊन माणसाला जगवले आहे. आज याच शाश्वत पायावर उभे राहून सयाजी आणि अरविंदने 12 आणि 13 फेब्रुवारीला बीडमध्ये हिरव्यागार डोंगरावर (आधी ओसाड असलेल्या) जगातले पहिले वृक्ष संमेलन घेतले. विशेष म्हणजे या वृक्ष संमेलनात वडाच्या झाडाला अध्यक्ष करण्यात आले होते. &......................................

वृक्ष वल्ली आम्हां सोयरीं वनचरें ।
पक्षी ही सुस्वरें आळविती ॥

येणें सुखें रुचे एकांताचा वास ।
नाही गुण दोष अंगा येत ॥

- Advertisement -

आकाश मंडप पृथ्वी आसन ।
रमे तेथें मन क्रीडा करी ॥

कंथाकुमंडलु देहउपचारा ।
जाणवितो वारा अवसरु ॥

- Advertisement -

हरिकथा भोजन परवडी विस्तार ।
करोनि प्रकार सेवूं रुची ॥

तुका म्हणे होय मनासी संवाद ।
आपुला चि वाद आपणांसी ॥

संत तुकारामाचा हा अभंग माणसाच्या जीवनात झाडांचे पर्यायाने निसर्गाचे महत्व किती मोठे आहे ते सांगतो… पण, आपल्या संतांनी सांगितलेल्या वाटेवरून आपण सर्वजण गेलो असतो तर जीवनातील कित्येक दुःखांना आज आपण सहज दूर करू शकलो असतो. आपल्या कित्येक पिढ्या या निर्सगाने जगवल्या आहेत, कुठलाही कर न मागता! पण, जे फुकट मिळते त्याची माणसाला किंमत नसल्यामुळे जंगल, वनराई, आपल्या आजूबाजूची झाडे आपण सहज नष्ट केली. दहा झाडे तोडताना एक नवीन रोप लावण्याचे भान आपण ठेवले नाही. हा निसर्गावरचा अत्याचार काही दहा वीस वर्षे सुरु नाही, तो गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने होत आहे आणि आज त्याची किंमत जग मोजत आहे. ग्लोबल वॉर्मिंगच्या रूपात… अती पाऊस, अती उन्हाळा आणि अती थंडीने सारे जग उलटपालट करून टाकले आहे. जागतिक पर्यावरण अभ्यासकांच्या मते ही तर सुरुवात आहे. याचे भयानक परिणाम तर अजून जगाला बघायचे आहेत. सोनेरी इतिहास पुसून टाकत वर्तमानाच्या शुल्लक सुखासाठी भविष्याची राखरांगोळी करून माणूस कुठले सुख मिळवणार आहे? असा विचार येतो तेव्हा एक ‘सह्याद्री देवराई’ च्या संकल्पनेतून दुष्काळी भागात नंदनवन फुलवणार्‍या अभिनेते सयाजी शिंदेचे खूप कौतुक वाटते.

सयाजीला तितकीच समर्थ साथ देणार्‍या लेखक दिग्दर्शक अरविंद जगतापच्या पाठीवर शाबासकीची थाप द्यावीशी वाटते. या दोघांनी शाळा, कॉलेजची मुले, ग्रामस्थ आणि कार्यकर्ते यांच्या मदतीने सातारा, बीडसारख्या दुष्काळी भागात हिरवाई नटवली आहे. आज दगड, धोंडे आणि ओसाड माळरानावर अनेकविध हिरवीगर्द झाडे डोलू लागतात, फळाफुलांनी बहरून जातात, अनेक प्रकारचे पक्षी आपला आसरा शोधत मधूर गायन करतात तेव्हा एक निसर्ग नव्याने उभा राहतो. जो शाश्वत असून आदिम काळापासून त्याने हाच भरवसा देऊन माणसाला जगवले आहे. आज याच शाश्वत पायावर उभे राहून सयाजी आणि अरविंदने 12 आणि 13 फेब्रुवारीला बीडमध्ये हिरव्यागार डोंगरावर (आधी ओसाड असलेल्या) जगातले पहिले वृक्ष संमेलन घेतले तेव्हा महाराष्ट्राने नेहमीच वेगळ्या वाटेवरचे पहिले पाऊल कसे टाकले, याची खात्री पटते आणि मन हिरवेगार होऊन गेले…

विशेष म्हणजे या वृक्ष संमेलनात वडाच्या झाडाला अध्यक्ष करण्यात आले… आणि या अध्यक्षाचे महत्व पटवून देताना सयाजी सांगतो :

वड असतो बापागत
भक्कम उभा पाठीशी
बाराही मास फळ देतो
नाही ठेवत उपाशी !!!

सह्याद्री देवराईने पालवनच्या ओसाड माळरानावर हिरवाई निर्माण करण्याचा निर्णय घेतला तेव्हा या दगड धोंड्यात काय होणार? असा प्रश्न बिनकामाच्या लोकांनी नेहमीप्रमाणे निर्माण केला होता. पण, सयाजी आणि त्याच्या टीमच्या सततच्या धडपडीने ओसाड माळरान हिरवाईने आज नटून गेले आहे ते सुख पाहण्याचा आगळा आनंद वृक्ष संमेलनाच्या निमित्ताने लोकांनी अनुभवला. कोकणात, गोव्यात देवराई आज प्रत्येक गावात दिसतात. देवळाच्या आजूबाजूचा परिसर हा या गर्द देवराईने बहरून गेलेला असतो. त्यातील वड, उंबर आणि पिंपळाची झाडे जणू मुळ पुरुष असल्यासारखे उभे असतात. अनेक शतकांचा काळ लोटून आणि पाऊस, उन्हे अंगावर घेऊनही ते जागचे हलत नाही. त्यांच्या पारंब्या जमिनीत जाऊन एक वर्तुळाकार अवकाश निर्माण होते तेव्हा जैवविविधता नटून आलेली असते.

अशा निसर्ग जपण्याच्या प्रक्रियेने पाऊस वेळेवर येऊन आपल्याला जपणार्‍या माणसांवर तो वर्षाव हा करणारच असतो, त्यात काही नवीन नसते. निसर्ग चक्र हातात हात घालून जणू नाचणार असते… खरेतर या देवराई निर्माण झाल्यात त्या देव आणि कोकण- गोव्यातील माणसांच्या अतूट नात्यामुळे. देवळाच्या बाजूची झाडे तोडायची नाहीत. त्याला हात लावला तर तुमचे काही खरे नाही, हा अलिखित नियमच या भागाला निसर्ग संपन्न करून गेला आहे. बाकी कोकणच्या माणसाला आळशी म्हणा किंवा आणखी काय म्हणा तो देवराईला हात तर लावणार नाही, पण आपण जेथे राहील तेथे आधी चार झाडे लावेल, त्याची मुलांप्रमाणे काळजी घेईल. भले तो अल्पसंतुष्ट असेल, पण त्याला निर्सगभान आहे.

हेच निसर्गभान सयाजी आणि त्याच्या टीममध्ये दिसते. म्हणूनच राज्यभर ओसाड जागी देवराई फुलवण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. सयाजीचे मूळ गाव सातार्‍यात. आपल्याला सातार्‍याचा फक्त हिरवागार भाग माहीत आहे, पण तितकाच दुष्काळी भाग असून कोकणात एक दिवस पडणारा पाऊस तेथे वर्षभराचा असतो किंवा तो दोन तीन पाऊस पडत नाही. व्यंकटेश मांडगुळकरांच्या ‘माणदेशी माणसे’ मधून या परिसरातील दुष्काळी माणसांच्या व्यथा समोर येतात तेव्हा अंगावर सरसरून काटा उभा राहतो. आजही त्यात बदल झालेला नाही. अशा विराट परिस्थितीत देवराया उभ्या करून पाऊस आणण्याचे काम सयाजी आणि त्याची टीम करत आहे. मुख्य म्हणजे माणदेशी माणसांची दुःखं स्वतः सयाजी यांनी अनुभवली आहेत. तरुण असताना धरणावर सुरक्षा रक्षकाचे काम करणारा सयाजी नंतर मुंबईत आला आणि सहकारी बँकेत नोकरीला लागला. ही नोकरी करताना त्याने आपले नाट्यप्रेम जपले.

उत्तम बंडू तुपे यांच्या ‘झुलवा’ कादंबरीवर आधारित वामन केंद्रे यांनी याच नावाने सादर केलेल्या नाटकात सयाजीचा पुरुष असूनही परिस्थितीने बाई केलेला परसू आजही नाट्यप्रेमींच्या मनात घर करून आहे. एका प्रसंगी त्याच्यावर गावातील गुंड लैंगिक अत्याचार करतात तेव्हा साडी वर करून सयाजीने केलेला आकांत एका मोठ्या नटाची साक्ष देणारा होता. मराठी रंगभूमी आणि सिनेमांनंतर सयाजीने दक्षिणी चित्रपटांमध्ये आपल्या नावाचा डंका वाजवला. खूप मोठा नट म्हणून त्याला तेथे मान आहे. त्याच्या या प्रवासाचा मी साक्षीदार आहे. आपल्या धडपडीच्या काळात तो सायन चुनाभट्टीला स्वदेशी मिलच्या समोरील डोंगरावरील झोपडपट्टीत राहायचा, याच ठिकाणी आमचेही घर होते. संवेदनशील सयाजीला ‘सातच्या आत घरात’ नोकरीत सुरुवातीलाही रस नव्हता. लग्न झालेल्या एका धडपड्या नटाची ती अपरिहार्यता होती. पण, तो कधी निराश झाला नाही. जीवनाकडे बघण्याच्या याच सकारात्मक दृष्टीकोनाने त्याला आज श्रीमंत आणि लोकप्रिय नट बनवले आहे. मात्र आज एशोआरामात लोळण्याचे दिवस असताना तो आपली मुळे विसरलेला नाही आणि ती त्याने सह्याद्री देवराईच्या रूपाने लाखो झाडे उभी करून मला काय करायचे, अशा वृत्तीने पडून राहिलेल्या समाजाला दाखवून दिले आहे.

दगड धोंड्यांमध्ये झाडे लावताना आणि ती जगवताना सयाजीच्या टीमला खूप कष्ट पडले. वाईट म्हणजे हे मोठे काम काही जणांच्या डोळ्यात खुपले, सातार्‍याला त्यांनी मोठी झालेली झाडे तोडली. पण, मोठे काम उभारणार्‍या प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्याला अशा प्रसंगांना तोंड द्यावे लागत असल्यामुळे अशा प्रसंगांनी निराश न होता सयाजीने पुढे आणखी जोरात काम करत माळराने फुलवली आहेत आणि त्याचा एक भाग म्हणजे बीडच्या पालवणचे ओसाड माळरान होय! गेल्या तीन वर्षांत वन विभागाने दिलेल्या 200 हेक्टर क्षेत्रात तब्बल 2 लाख, 90 हजार, 317 झाडे लावली आहेत. सरकार, वृक्षप्रेमी आणि लोकसहभागातून ‘येऊन येऊन येणार कोण? झाडांशिवाय आहेच कोण?’ अशा घोषणा देत ग्रामीण युवकांमध्ये वृक्षप्रेम निर्माण करून हा दुष्काळी भाग हिरवागार केला आहे. झाडे लावणे आणि ती जगवणे हे काही एकट्याचे काम नाही. त्यासाठी लाखो हात एकत्र येण्याची गरज असते.

यशोगाथा अशाच तयार होत असतात आणि हे प्रत्यक्ष दाखवण्यासाठी सयाजीने वृक्ष संमेलन आयोजित केले होते. साहित्य संमेलनाप्रमाणे येथेही अध्यक्ष आहे, तसेच ग्रंथदिंडीप्रमाणे वृक्षदिंडी काढण्यात आली. तसेच बीड जिल्ह्यातील सर्व शाळांचे विद्यार्थी आणि नागरिकांना वृक्ष रूपातून 27 नक्षत्रे, सप्त ऋषी, पंचवटी आणि रॉक गार्डन पाहायला मिळाले. साहित्य संमेलनाप्रमाणे भरपूर पुस्तकांची खरेदी केली जाते तशी अगदी कमी किंमतीत वृक्ष रोपांची लोकांनी खरेदी केली. झाडे जगवण्याचा संदेश दूरपर्यंत जाण्यासाठी सयाजीने संमेलनाला येताना प्रत्येकाने एक तांब्या पाणी आणा, असे आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. एखादे झाड लावून भागत नाही, त्याला जगवावे लागते, हेच यामधून अधोरेखित झाले. वृक्ष संमेलनाचा सांगता सोहळाही भारी होता. गरुड आणि अजगर यांच्या हजेरीने संमेलनाची सांगता झाली. एका पक्षीप्रेमीच्या मदतीने तंदुरुस्त झालेल्या गरुडाला आकाशात मुक्त भरारी देण्यात आली. त्याचबरोबर आधी जखमी असलेला, पण बरा झालेल्या अजगरालाही जंगलात सोडण्यात आले.

लोकसहभागातून एखादी चळवळ उभारल्यास त्याचे सोने होते, हे आधी आपल्या कामातून पोपटराव पवार यांनी दाखवून दिले होते. दुष्काळी हिवरे बाजार गावाला सुजलाम सुफलाम करत त्यांनी या गावाला जगाच्या नकाशावर नेले. आता सयाजी शिंदेंची सह्याद्री देवराई आणि वृक्षसंमेलन महाराष्ट्राला आणि देशालाही दिशा देणारे ठरो…!

Sanjay Parab
Sanjay Parabhttps://www.mymahanagar.com/author/psanjay/
गेली ३२ वर्षे पत्रकारितेचा अनुभव. राजकीय, पर्यावरण, क्रीडा आणि सामाजिक विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियामध्ये कार्यरत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -